Saturday, 23 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.11.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 November 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज-दुपारी बारा वाजेपर्यंत पहिला निकाल तर संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता

निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांच्या बैठकांची सत्रं सुरू; नेत्यांकडून दावे प्रतिदावे

पैसे वाटपाच्या कथित आरोप प्रकरणी भाजप नेते विनोद तावडे यांची काँग्रेसला कायदेशीर नोटीस

छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या पद्म फेस्टिव्हलचा आज समारोप

आणि

बॉर्डर गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात पहिल्या दिवशी वेगवान धावपट्टीचे १७ बळी

****

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. प्रथम टपाली मतांची, तर साधारण साडेआठ वाजल्यापासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरच्या मतांची मोजणी सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिली. सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणी होत असून, नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी स्वतंत्र मोजणी केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. दुपारी बाराच्या सुमाराला पहिला निकाल हातात येण्याची शक्यता असून, निकालाचं पूर्ण चित्र मात्र, संध्याकाळी स्पष्ट होईल, असंही एस. चोक्कलिंगम यांनी नमूद केलं.

****

या मतमोजणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना काल प्रशिक्षण देण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. विजयी उमेदवारांना आज मिरवणूक काढण्याची परवानगी मिळणार नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं..

“विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीच्या संदर्भामध्ये जसा निकाल घोषित होतो, तसं वातावरण थोडं टेन्स असतं. त्यामुळे परिसरामध्ये कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कोणालाही मिरवणुकीची परवानगी देणार नाही तशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत.’’

****

आजची मतमोजणी आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात सहकार्याचं आवाहन केलं आहे. 

“मतमोजणीच्या बंदोबस्ताचं नियोजन योग्य पध्दतीने केलेलं आहे. जमावबंदीचे आदेश ही आहे. शहरामध्ये महत्वाचे जे काही संवेदशील ठिकाणं आहेत तर त्याच्यावरती आमचं लक्ष आहे आणि कायदा आणि सुवस्था मोडणाऱ्यांवर निश्चितच कडक आणि प्रभावी कारवाई केली जाईल.’’

****

छत्रपती संभाजीनगर शहरात असलेल्या तीन विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गात बदल करण्यात आले आहेत. नागरिकांना या बदलाची नोंद घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काल मतमोजणी केंद्रांची पाहणी करून मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातल्या चारही मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, निमलष्करी दल आणि स्थानिक पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

****

बीड जिल्ह्यात पहिला निकाल परळीचा तर सर्वात शेवटचा निकाल आष्टी मतदार संघाचा लागेल अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात शांतता ठेवावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

****

जालना जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी होणार असून, त्यासाठीची आवश्यक तयारी निवडणूक विभागाकडून करण्यात आली आहे. 

****

लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल मतमोजणी कक्षांना भेट देऊन पाहणी केली. तसंच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी चौदा टेबलांवर मतमोजणी होणार आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद आणि परंडा या चार विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १४ टेबलांवर, एकूण ३८७ कर्मचारी मतमोजणी करणार आहेत.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या १२ विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी एकूण एक हजार २५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

दरम्यान, मतमोजणी आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर कालपासून राज्यातल्या सगळ्याच प्रमुख पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू असून, नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी काल भाजप नेत्यांची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भाजप प्रदेश कार्यालयात काल आढावा घेतला.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या उमेदवारांची काल बैठक झाली. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नाही, निकालानंतर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते एकत्र बसून यावर निर्णय घेतील, असं चेन्निथला यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार बनवण्याचा प्रयत्न करू, असंही त्यांनी म्हटलं आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांकडूनही विविध प्रकारची राजकीय चाचपणी सुरु आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षानं मतमोजणीसाठी महाराष्ट्रात निरीक्षक म्हणून ज्येष्ठ नेते अशोक गहलोत, भूपेश बघेल आणि जी परमेश्वर यांची नियुक्ती केली आहे.

****

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सुप्रिया श्रीनेत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. निवडणुकीत पैसे वाटल्याचे खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी बिनशर्त माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असा इशारा या नोटीशीच्या माध्यमातून तावडे यांनी दिला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन उद्या सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सी बी एस ई नं सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप अर्थात एकुलती कन्या शिष्यवृत्ती-योजनेसाठी अर्ज मागवले आहेत. २०२४ मध्ये सीबीएसईची दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या शिष्यवृत्तीसाठी सीबीएसईच्या संकेतस्थळावर येत्या २३ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा पुढच्या वर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात घेतली जाणार आहे. या परीक्षांचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आगामी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा एक डिसेंबर रोजी, तर मुख्य परीक्षा २६ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक तसंच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धत असणार आहे. पुढची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ रोजी घेतली जाईल, तर मुख्य परीक्षेचा दिनांक नंतर जाहीर करण्यात येईल. २०२५ च्या जाहिरातीनुसारची राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीची असणार आहे. यासोबतच महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा, वनसेवा, सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेचंही वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या पद्म फेस्टिव्हलचा आज समारोप होत आहे. आज या समारोहात धावपटू पद्मश्री सुनिता रानी आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ स्मिता आणि रवींद्र कोल्हे यांच्या मुलाखती होणार असून, संत साहित्याचे अभ्यासक पद्मश्री यू म पठाण यांची चित्रीत मुलाखत दाखवली जाणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

****

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत काल पहिल्या दिवशी पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर १७ फलंदाज बाद झाले. भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. भारताचा पहिला डाव १५० धावांत संपुष्टात आला. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या नितीश रेड्डीनं सर्वाधिक ४१ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाला सात बाद ६७ धावसंख्येवर रोखलं. पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया ८३ धावांनी पिछाडीवर आहे.

****

येत्या २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत दिल्ली इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकारिता परिषदेमध्ये इफकोच्या संचालक डॉक्टर वर्षा कस्तुरकर या भारताच्या प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत. देशातल्या सहकारी संस्थांचं काम आंतरराष्ट्रीय सहकार क्षेत्राला जोडण्यामुळे भारताची जागतिक महासत्ता बनण्याची वाटचाल सोपी होईल, असा विश्वास कस्तुरकर यांनी व्यक्त केला.

****

हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात केलेल्या स्वच्छ आणि शुद्ध हवा सर्वेक्षणात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने पाचवा क्रमांक पटकावला आहे. या सर्वेक्षणात सांगली शहराने प्रथम तर कल्याण, चंद्रपूर आणि अमरावती शहरांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक पटकावला आहे. 

****

धाराशिव जिल्ह्यातल्या सतरा हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत १२ हजार ७५८ क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली असून, यापैकी सुमारे ५० टक्के सोयाबीनचे हमीभावाप्रमाणे तीन कोटी नऊ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसाच्या आत रक्कम जमा केली जाणार आहे.

****

No comments:

Post a Comment