Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 December 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
• देशातल्या पहिल्या नदी जोड प्रकल्पाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी
• हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील-सौर कृषी वाहिनी लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त
• मराठवाडा विकासाच्या विविध निर्णयांवर अद्याप अंमलबजावणी नाही-अंबादास दानवे यांची टीका
• येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण
आणि
• वेस्ट इंडीजचा ११५ धावांनी पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाची मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी
****
देशातल्या पहिल्या नदी जोड प्रकल्पाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी होत आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते केन बेतवा नदी जोड प्रकल्पासह विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज प्रारंभ होत आहे. या निमित्तानं देशभरात एक हजार १५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी पंतप्रधान आज करतील. एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
हरित उर्जेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प दोन अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नारंगवाडी इथल्या प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज उपलब्ध होईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...
शेतकऱ्यांना एकूण १६ हजार मेगावॅट एवढी वीज आपल्याला द्यावी लागते, ती आपल्याला सात रुपये, आठ रुपये पडायची आणि शेतकऱ्यांकडून आपण सव्वा रुपये, दीड रुपये वसूल करायचो. पण आता ही आठ रुपयाची वीज सौरऊर्जेमुळे तीन रुपयांमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून भविष्यात शेतकऱ्यांना मोफत वीजेची योजना सरकारवर बोजा बनणार नाही. आणि दिवसा वीज शेतकऱ्यांना सस्टेनेबली आपल्याला देता येईल आणि भविष्यामध्ये या हरित ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये हरितक्रांती आणाल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
****
राज्य मंत्रिमंडळानं छत्रपती संभाजीनगर इथं बैठक घेऊन मराठवाड्याच्या विकासाचे विविध निर्णय घेतले होते, त्यावर अद्याप अंमलबजावणी केली नसल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे सभागृहात मांडल्याचं दानवे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
१६ नोव्हेंबर २०२३ ला राज्य मंत्रीमंडळ बैठक झाली होती. त्याच्यात मराठवाड्याच्या विकासाचे मुद्दे या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले होते. या विषयावर मी सातत्यानं या अधिवेशनात आवाज उठवलेला आहे. याच्यावर फक्त घोषणा सरकारच्या झालेल्या आहेत. आणि सरकार तसं नवीन जरी असलं तरी मागचं सरकार आणि हे सरकार काय वेगवेगळं अशातला काही भाग नाही.
****
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं. विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तीही काल करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री व्ही के सिंह आता मिझोरामचे राज्यपाल असतील.
****
राष्ट्रीय ग्राहक दिन काल पाळण्यात आला. ग्राहक व्यवहार विभागानं आज सार्वजनिक वापरासाठी 'जागो ग्राहक जागो ॲप', 'जागृती ॲप' आणि 'जागृती डॅशबोर्ड' ला प्रारंभ केला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या ॲप तसंच डॅशबोर्डचं अनावरण करण्यात आलं. ऑनलाईन व्यवहारात कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर जागो ग्राहक जागो ॲप ग्राहकांना सतर्क करतं. बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबधीची तक्रार करण्यास जागृती ॲप ग्राहकांना सक्षम करतं तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेतं, असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ग्राहकांनी वस्तू किंवा सेवा खरेदी करतांना खबरदारी बाळगावी आणि खरेदीची पावती आवर्जून घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष शिल्पा डोलारकर यांनी केलं आहे.
तुम्ही जेव्हा पण कुठे वस्तू खरेदी करताल, कोणतीही सेवा घेताल, तेव्हा प्रत्येक गोष्टीची पावती घेणं, प्रत्येक गोष्टीचे प्रॉपर दस्त- डॉक्युमेंट जमा करणे हे जरूर यायला याबाबत तुमचे जर कुठे फसवणूक झाली तर तुम्ही ग्राहक आयोगात येऊन तुमची तक्रार दाखल करू शकतात.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून, ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
अहल्यानगर शहर आणि जिल्ह्यात अनेक घरं तसंच चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.
****
मुंबईतल्या स्पंदन आर्ट संस्थेचे १९ वे मोहम्मद रफी पुरस्कार काल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. दिवंगत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना जाहीर झालेला मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार, त्यांचे पुत्र अंदलिब सुलतानपुरी यांनी स्वीकारला. गायक जावेद अली यांना मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अनुक्रमे एक लाख रुपये तसंच ५१ हजार रुपये तसंच सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद-आयसीसीने चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. १९ फेब्रुवारीला कराचीत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यानं या स्पर्धेला सुरुवात होईल. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशसोबत तर २३ फेब्रुवारीला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. उपांत्य फेरीचा पहिला सामना चार मार्चला दुबईत तर पाच मार्चला लाहोर इथं होणार आहे. अंतिम सामना नऊ मार्चला लाहोर इथं होणार आहे. मात्र उपांत्य तसंच अंतिम फेरीत भारत दाखल झाल्यास, हे सामने दुबईत होतील, असं आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी सांगितले आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये भारतानं काल वेस्ट इंडीजचा ११५ धावांनी पराभव करत मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल वडोदरा इथं झालेल्या या सामन्यात भारतानं दिलेलं ३५९ धावाचं लक्ष्य गाठतांना, वेस्ट इंडीजचा संघ ४७ व्या षटकांत २४३ धावांवर सर्वबाद झाला. या मालिकेतला अखरेचा तिसरा सामना परवा खेळवला जाणार आहे.
****
माती आणि पाणी यांचा विकास झाला तरच शेतकऱ्यांचं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, असं प्रतिपादन राजस्थानातले पाणी आंदोलनातले ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्रसिंह राणा यांनी केलं आहे. काल अंबाजोगाई इथं डॉ.द्वारकादास लोहिया लोकसहभाग पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कृषिभूषण तथा जलतज्ज्ञ विजय अण्णा बोराडे यांना डॉ.द्वारकादास लोहिया लोकसहभाग पुरस्कार प्रदान करण्यात आला, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र आणि ५१ हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सत्काराच्या उत्तरात बोराडे यांनी, सेंद्रीय शेती वाढवण्याचं आवाहन केलं.
****
राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात तीन जानेवारी पर्यंत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम राबवण्यात येत आहे. हिंगोली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाये यांनी या मोहिमेबाबत अधिक माहिती दिली..
या मोहिमेअंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये ९९ पथक तयार करण्यात आलेली आहेत. हे पथक अति जोखीमग्रस्त भागांमध्ये टीबी सदृश्य रुग्णांचा सर्वे करत आहे, की ज्यांना टीबी सदृश्य लक्षणे आहेत, जसा दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, संध्याकाळच्या वेळी ताप येणे, भूक मंदावणे किंवा थुकीमध्ये रक्त येणे.
****
‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’-कुसुम मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९५२ संशयितांची तपासणी करण्यात आली, त्यात ५५ नवे रुग्ण आढळले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी ही माहिती दिली. यापैकी २१ जण सांसर्गिक तर ३४ जण असांसर्गिक असून, या सर्व रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले असल्याची माहिती धानोरकर यांनी दिली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने काल छत्रपती संभाजीनगर, नांदेड तसेच लातूरसह अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. परभणी, बीड प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात काल भूकंपसदृष्य धक्के जाणवले. हरसूल परिसरासह पेठ तालुक्यातील अनेक गावांना काल रात्री साडे आठ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जमिनीतून मोठा आवाज होऊन दोन धक्के जाणवल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर भरधाव कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. काल दुपारी इगतपुरी नजिक हा अपघात घडला.
****
हवामान
राज्यात छत्रपती संभाजीनगर, अनेक जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment