Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 29 December 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशाच्या सामूहिक शक्तीचा जिवंत दस्तावेज मन की बात कार्यक्रमाच्या आतापर्यंत प्रसारीत ११६ भागांद्वारे निर्माण झाला असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’च्या ११७व्या भागाद्वारे देशवासियांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या काळातल्या संवादादरम्यान युवा नवोन्मेषकाच्या कल्पनांनी आपल्या प्रभावित केलं तर कधी यशानं गौरवान्वित केलं असं त्यांनी नमूद केलं. आपला भारत विविधतेत एकतेसह पुढे जात असून खेळाच्या मैदानापासून विज्ञान, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत भारत नवीन शिखरं गाठत असल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. आपण देशवासीयांनी एका कुटुंबाप्रमाणे मिळून प्रत्येक आव्हानाचा सामना केला आणि नवीन यश संपादन केलं आहे. देशभरात खेळ-तंदुरुस्तीबाबत विविध उपक्रम सुरु असून जनता तंदुरुस्तीला दिनचर्येचा भाग बनवत असल्याबद्दल मोदी यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं. काश्मीरमधल्या स्कीईंग पासून गुजरातमधील पतंग महोत्सवापर्यंत, सायकलचा रविवार तसंच सायकलचा मंगळवार या सारख्या अभियानातून सायकल चालवण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचं ते म्हणाले.
छत्तीसगडच्या बस्तर इथं आयोजित अनोख्या बस्तर ऑलिंपिकचा त्यांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला. खिलाडूवृत्ती समाजाला जोडण्याचं सशक्त माध्यम असल्यानं,आपल्या भागातील अशा क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देत हॅश टॅग : खेलेगा भारत - जीतेगा भारतद्वारे गुणवंत खेळाडूंच्या कथा सामायिक करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार भारतात वर्ष २०१५ पासून २०२३ दरम्यान मलेरिया रुग्ण आणि त्यामुळं होणाऱ्या मृत्यूमध्ये ८० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. तसंच कर्करोगविरोधी लढाईत जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिक लान्सेटच्या अभ्यासानं देशात मोठी आशा निर्माण केली असून भारतात वेळेवर कर्करोगावरील उपचार सुरू होण्याची शक्यता वाढली आहे, असं ते म्हणाले. यानुसार कर्करोग रुग्णावरील उपचार तीस दिवसांच्या आत सुरू होणं आवश्यक असल्यानं आयुष्मान भारत योजना पैशांचा हातभार लावून दिलासा देत असल्यानं महत्वपूर्ण ठरल्याचं मोदी यांनी सांगितलं.
२०२५जवळ आलं असून या वर्षातही मन की बातच्या माध्यमातून आपण आणखी प्रेरणादायी प्रयत्न मांडू, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं येणाऱ्या कुंभमेळ्याशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती ११ भारतीय भाषांत मिळणार असल्याचं सांगून यात सहभागी होत EktaKaMahaKumbh या हॅशटॅगसह सेल्फी टाकण्याचं आवाहन त्यांनी केलं.
राज्यघटना लागू होण्यास येत्या २६ जानेवारीला ७५ वर्ष पूर्ण होत असून मार्गदर्शक प्रकाश- दीपस्तंभ असलेली राज्यघटना, काळाच्या प्रत्येक निकषावर सिद्ध झाली आहे असं मोदी म्हणाले. यापार्श्वभूमीवर constition75.com संकेतस्थळाद्वारे राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून तुमची ध्वनीचित्रफीतही टाकू शकता अशी महिती ही त्यांनी दिली.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या भटुंबरे इथं आज सकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास भाविकांची बस आणि ट्रकचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर अन्य २५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक वयस्क महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातल्या कामशेत या गावातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेले प्रवासी या बसमध्ये होते. अपघातातल्या जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. धूळ नियंत्रित करण्यासाठी तातडीनं करायच्या उपाययोजना, बांधकामांच्या कामावर देखरेख, मलब्याचं व्यवस्थापन आणि एमएमआरडीएच्या प्रकल्पस्थळांवरील वाहन वाहतुकीचं नियमन यांचा नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समावेश आहे. याचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे.
****
भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत, मेलबर्न इथं सध्या खेळल्या जात असलेल्या चौथ्या सामन्यात, आजच्या चौथ्या दिवस अखेर, ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावात नऊ बाद २२८ धावा केल्या आहेत. याद्वारे ऑस्ट्रेलियानं एकूण ३३३ धावांची आघाडी घेतली आहे. जसप्रति बुमराहनं पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी करताना चार गडी बाद केले. मोहम्मद सिराजनं तीन गडी बाद करून त्याला योग्य साथ दिली. मार्नस लाबुशेनं सर्वाधिक ७० तर पॅट कमीन्सनं ४१ धावा केल्या. या दोघांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था सहा बाद ९१ असताना सोबत येत धावसंख्येला आकार दिला.
****
नवीन नांदेडमधील कौठा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकानं शनिवारी ही कारवाई केली. या बांगलादेशी नागरिकाविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासोबत असणाऱ्या दोन जणांना हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूरजवळ अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
नवीन वर्षाच्या आरंभावेळी संतनगरी शेगाव इथं होणारी भक्तांची गर्दी लक्षात घेता मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे. संत श्री गजानन महाराज संस्थान मधील श्रींचं समाधी स्थळ, आणि मंदिरातील सर्व विभाग भक्तांच्या दर्शनासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री खुलं राहणार असल्याचं मंदिर संस्थानतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment