Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 December 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वर इथं आयोजित पोलीस आणि गुप्तवार्ता संघटनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पोलिसदल आणि सुरक्षेसंबंधीच्या विविध बाबींवर विचार मांडले तसंच काही सूचना केल्या. पंतप्रधान मोदी तीन दिवसीय अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत आज सलग दुसऱ्या दिवशीही सहभागी झाले आहेत. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी आव्हानांवर उहापोह करण्यात येत आहे. भारताच्या विकासात अडथळा आणणाऱ्या बाबी, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि तस्करी, देशांतर्गत नक्षलवादाचे आव्हान या विषयांचा समावेश आहे. या परिषदेला 200 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज या परिषदेचा समारोप होत आहे.
****
नागालँड राज्याचा आज 62 वा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे. 1963 मध्ये नागालँड देशातील 16 वे राज्य बनले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागालँडला स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्थापनादिनानिमित्त नागालँड इथं हॉर्नबिल उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
फसवणूक करून धर्मांतर करण्याच्या विरोधात, राजस्थान सरकारनं विधानसभेत 'दी राजस्थान प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्वर्जन ऑफ रिलिजन बिल २०२४' सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात वंचित कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तुंना मोठी मागणी होती. या कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तुंची विक्री पाच कोटी ८५ लाख एवढी झाली. या व्यापार मेळ्यात महाराष्ट्रासह १८ राज्यांतील कारागिरांच्या वस्तु विक्रीसाठी ठेवल्या होत्या.
****
भारतीय वंशाचे काश पटेल यांची अमेरिकेच्या फेडरल ब्यूरो ऑफ इंवेस्टिगेशन-एफबीआय च्या प्रमुख पदावर नियुक्ती झाली आहे. अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नियुक्ती केली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे अमेरिकन वैज्ञानिक जय भट्टाचार्य यांना अमेरिकेच्या आरोग्य संघटना आणि वित्त पोषण संस्था तसंच नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या संचालकपदावर नियुक्त केलं आहे.
****
आज जागतिक एड्स दिन पाळला जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली इंदोर इथं देवी अहिल्या विद्यापीठात मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सही रास्ते पर चलें ही या वर्षीच्या एड्स दिनाची संकल्पना आहे. 2030 पर्यंत एचआईवी/एड्सच्या निर्मुलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
****
फेंगल चक्रीवादळाच्या परिणामामुळं पुदुच्चेरी इथं गेल्या २४ तासांत ४८ सेंमी पावसाची नोंद झाली आहे. कृष्णानगर भागात पाणी साचल्यामुळं सैन्यदलाच्या जवानांनी रहिवाशांना या भागातून बाहेर काढलं. हवामान विभागानं आज तामिळनाडूसाठीही रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशातील किनारी भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसनी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तसंच महाराष्ट्रातही बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
****
हिंगोली जिल्ह्याला इसापूर धरणातून रब्बी हंगामासाठी तीन पाणीपाळ्या तर उन्हाळी हंगामात चार पाणीपाळ्या देण्याच्या नियोजनास पाटबंधारे विभागानं मान्यता दिली. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा आणि त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल, असं विभागानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्हा कृषी विभागाकडून परवा, तीन डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय सीताफळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. लातूर जिल्हा क्रीडा संकुल इथं हा महोत्सव साजरा केला जाणार असून, या सीताफळ महोत्सवात जिल्ह्यात उपलब्ध विविध प्रजातीची सिताफळं शेतकऱ्यांमार्फत विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
****
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा आज पंतप्रधान एकादश संघासोबत कॅनबेरा इथं सराव सामना सुरु आहे. भारतीय संघान नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा पंतप्रधान एकादश संघानं ७ बाद २०० धावा केल्या होत्या. हर्षित राणानं चार तर प्रसिद्ध कृष्णानं एक बळी टिपला.
****
No comments:
Post a Comment