Sunday, 1 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 December 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप

·      महायुती सरकारमध्ये खातेवाटपाची चर्चा लवकरच पूर्ण होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

·      विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या बनावट चित्रफितप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

·      फेंगल चक्रीवादळामुळं राज्यात मराठवाड्यासह बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट

आणि

·      सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधुने पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद, महिला दुहेरीतही भारतीय खेळाडूंना जेतेपद

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वर इथं आयोजित पोलीस आणि गुप्तवार्ता संघटनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पोलिसदल आणि सुरक्षेसंबंधीच्या विविध बाबींवर विचार मांडले तसंच काही सूचना केल्या. पंतप्रधान मोदी तीन दिवसीय अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत आज सलग दुसऱ्या दिवशीही सहभागी झाले होते. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी आव्हानांवर उहापोह करण्यात आला. भारताच्या विकासात अडथळा आणणाऱ्या बाबी, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि तस्करी, देशांतर्गत नक्षलवादाचे आव्हान या विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. देशभरातील २०० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची या परिषदेला उपस्थिती होती.

****

महायुतीमध्ये सरकार स्थापन करण्याविषयी चर्चा सुरु आहे. लवकरच सर्व चर्चा मार्गी लागून जनतेसाठी काम करणारं सरकार स्थापन होईल, असं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यात दरे या आपल्या मूळ गावी माध्यमांशी संवाद साधला. सरकारमध्ये खातेवाटपावरून मतभेद नाहीत. तसंच मुख्यमंत्रीपदाविषयी आपली भूमिका गेल्या आठवड्यातच स्पष्ट केल्याचं शिंदे म्हणाले.

एक बैठक आमची अमितभाईंच्या बरोबर झालेली आहे. दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची. आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक-बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा. या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे. जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, एवढी मेजॉरिटी दिली. आता चांगलं सरकार स्थापन व्हावं ही जी अपेक्षा जनतेची आहे, ती आम्ही पूर्ण करणार. आणि जनतेबरोबर आम्ही उत्तरदायीत्व आहोत. त्यामुळे आता विरोधकांना काही काम राहिलं का?

****

ईव्हीएमच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवरही एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. अपयश आल्यानंतर आता ईव्हीएमचा मुद्दा पुढे केल्याचं शिंदे म्हणाले.

ई व्ही एम ची चर्चा चालू आहे. झारखंड मध्ये ते जिंकले आणि त्याच बरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले, तेव्हा काही ई व्ही एम चांगलं होतं? आत्ता पण लोकसभेत त्यांचा एक माणूस जिंकलाय पोटनिवडणुकीमध्ये. त्यामुळे कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये असेल, झारखंड मध्ये असेल, यामध्ये विरोधी पक्षाला देखील यश मिळालंय. त्यामुळे लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग या विजयामध्ये आहे. आणि लाडक्‍या भावांना त्यांनी भरभरून प्रेम दिलंय. लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिलंय. लाडक्या शेतकऱ्यांनी दिलंय. या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेजॉरिटीनं आलंय.

****

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर फिरत आहे. या ध्वनिचित्रफितीतल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलीसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समाजमाध्यमावरच्या निवेदनातून दिली.

गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीने आपल्या ध्वनीचित्रफितीत इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रामध्ये फेरफार करून ते हॅक केल्याचा केलेला दावा खोटा आणि तथ्यहीन असल्याचंही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र हे स्वतंत्र यंत्र असून, त्याला कोणत्याही नेटवर्क, वाय-फाय किंवा ब्लूटूथला जोडता येत नाही, त्यामुळं या यंत्रासोबत छेडछाडीची कोणतीच शक्यता नाही. सर्वोच्च न्यायालयानंही अनेक वेळा या यंत्रांवर विश्वास व्यक्त केला असल्याचं निवडणूक कार्यालयानं म्हटलं आहे.

****

सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमधल्या मारकडवाडी गावानं केलेली फेरमतदानाची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली आहे. मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटवर होणारं मतदान योग्य आहे की नाही, याची मॉकपोलव्दारे चाचणी देान्ही बाजूच्या उमेवारांच्या उपस्थितीत झाली. त्यावरचे आक्षेप त्याचवेळी नोंदवायचे होते, असं आयोगानं म्हटलं आहे. निकाल लागून दोन आठवडे झाल्यामुळे फेरमतदानही घेता येणार नाही, असा खुलासाही त्यांनी केला आहे.

****

तेलंगणात, मुलुगु जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत किमान सात नक्षलवादी ठार झाले. या नक्षल्यांमध्ये राज्य समितीचा सचिव आणि इतर दोन राज्य समिती सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांचे खबरे असल्याचं सांगून त्यांनी दोन आदिवासींना ठार मारल्यानंतर काही वेळातच ही चकमक झाली.

****

सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळं २०१०च्या तुलनेत २०२३ मध्ये एड्स संक्रमणांचं प्रमाण ४४ टक्क्यांनी कमी झालं आहे, तर एड्स रुग्णांच्या मृत्यूमध्ये ७९ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी दिली. नड्डा यांच्या उपस्थितीत इंदोर इथं मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. २०३० पर्यंत एचआईवी निर्मुलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, असं त्यांनी सांगितलं.

****

हवामान विभागानं आज तामिळनाडूसाठीही रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशातील किनारी भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसनी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रिवादळाचा प्रभाव पुढील पाच ते सहा तासात कमी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. काल रात्री तामिळनाडू आणि पुद्दुचेरी किनारपट्टीवर कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान या चक्रीवादळानं धडक दिली. त्यामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरी इथं जोरदार पाऊस झाला. याचा परिणाम बस, रेल्वे आणि विमान सेवांसह सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाला होता. ही वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

****

दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. तिनं आज लखनऊमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या वू ल्यु यू हिचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. त्यापूर्वी भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीनं महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. त्यांनी चीनच्या जोडीचा २१-१८, २१-११ असा पराभव केला. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेनचा मुकाबला सिंगापूरच्या खेळाडूशी होत आहे.

****

नंदुरबार जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या ३३ रुग्णवाहीकेचे आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. याव्यतिरीक्त शासनाकडून नर्मदा नदी काठावरील अतिदुर्गम भागातील गावांसाठी बोट अँम्ब्युलन्स आणि अजून नवीन २२ रुग्णावाहीकांची मागणी केली असल्याचं गावित यांनी सांगितलं.

****

जातीपातींना शास्त्रात स्थान नाही, तरीही जातीभेद सुरूच आहेत, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. ते आज नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. आपली संस्कृती एका भाषेपुरती आणि जातीपुरती मर्यादित नाही, ती सर्वांची आहे, मात्र गेल्या दीडशे वर्षात संकुचित वृत्ती वाढत आहे, असं भागवत म्हणाले. फक्त आपल्यापुरतं पाहायची वृत्ती योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्याला इसापूर धरणातून रब्बी हंगामासाठी तीन पाणीपाळ्या तर उन्हाळी हंगामात चार पाणीपाळ्या देण्याच्या नियोजनास पाटबंधारे विभागानं मान्यता दिली. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा तसंच इसापूर उजवा कालवा आणि त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल, असं विभागानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवा अंतर्गत सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. २५ ते २८ डिसेंबर दरम्यान विद्यापीठ परिसरात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. एकूण ३६ कलाप्रकारांचे सहा रंगमंचावरून सादरीकरण होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी केलं आहे.

****

No comments:

Post a Comment