▼

Tuesday, 24 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.12.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 December 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात आजपासून वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे. ३१ डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती याबाबतच्या वृत्तात दिली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशात दिली होती.

****

ग्राहक व्यवहार विभागानं आज राष्ट्रीय ग्राहक दिनी, सार्वजनिक वापरासाठी 'जागो ग्राहक जागो ॲप', 'जागृती ॲप' आणि 'जागृती डॅशबोर्ड' चा प्रारंभ केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक रोखणे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे हा या ॲपचा उद्देश आहे. जागो ग्राहक जागो ॲप ग्राहकांना ऑनलाइन व्यव्हारादरम्यान कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर सावधगिरी बाळगण्यासाठी सतर्क करते. जागृती ॲप वापरकर्त्यांना बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबधीची तक्रार करण्यास सक्षम करते तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्य प्रदेशातील खजुराहो इथं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध विकासकामांचा प्रारंभ करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते केन-बेतवा या देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी करण्यात येणार आहे, तसंच अकराशे 53 नव्या ग्रामसुशासन इमारतींचीही पायाभरणी करण्यात येणार आहे.  केन-बेतवा नदीजोड प्रकल्पामुळं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

****

चालू आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यांत देशातून स्मार्टफोन निर्यातीनं एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. सरकारच्या उत्पादन प्रोत्साहन योजनेमुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत स्मार्टफोनची निर्यात ४५ टक्क्यांनी वाढल्याचं वैष्णव म्हणाले.

****

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी सौर कृषी पंपांसाठी स्वतंत्र वीज वितरण प्रणाली उभारण्याची मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारपरिषदेत बोलत होते. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात आणि विदर्भ, मराठवाड्यात नवीन गुंतवणूक आणण्यात अपयश आल्याची टीका त्यांनी केली.

****

नंदुरबार जिल्ह्यात घोडे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोडे बाजारानं अवघ्या दहा दिवसात तीन कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. १४ डिसेंबरपासून या घोडे बाजाराला सुरवात झाली आहे. यात देश भरातल्या विविध प्रांतातून २ हजार २१० घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले होते. यात सहाशे ५७ घोड्यांची खरेदी विक्री झाली असून यातून ३ कोटी २ लाख ५४ हजार रुपयांची उलाढाल नोंदवल्या गेली आहे. या बाजारात एक घोडा सुमारे ५ लाख ५१ हजार रुपये किंमतीला विक्रीला गेल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढचे ६ दिवस हा बाजार सुरु राहील, अशी माहीती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

****

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठं, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी, ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दरवर्षी १ ते १५ जानेवारी दरम्यान राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय विभागीय ग्रंथालयात १ ते १५ जानेवारी दरम्यान सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा, ग्रंथप्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे. तसंच यानिमित्त विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहिम सुद्धा राबविण्यात येणार आहे.

****

राज्यातील  विविध भागांमध्ये कालपासून ढगाळ वातावरण आहे. गुरुवार, २६  डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर २७  डिसेंबर  रोजी  खानदेश, मध्य महाराष्ट्र , उत्तर  मराठवाडा,  आणि पश्चिम विदर्भातील  विविध  ठिकाणी तसंच  २८  डिसेंबर  रोजी  खानदेश,  मराठवाडा  आणि विदर्भातील काही भागांमध्ये  मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता  वर्तविण्यात आली आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघात सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे.  बडोद्यात होणाऱ्या या सामन्याला दुपारी दीड वाजता प्रारंभ होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत एक सामना जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. या मालिकेपूर्वी नवी मुंबईत दोन्ही संघात झालेली तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिकाही भारतीय महिला संघाने दोन-एकने जिंकली आहे.

****

गोंदिया इथं २५ते २८ या डिसेंबर दरम्यान दिव्यांग मुलामुलींच्या चौथ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत २० राज्यातील स्पर्धक सहभाग घेणार आहेत. गोंदिया गोलबॉल स्पर्धेचे अध्यक्ष राजकुमार कुथे आणि आरती लिमजे यांनी ही माहिती दिली.

****

No comments:

Post a Comment