Tuesday, 24 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 December 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील-सौर कृषी वाहिनी लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त

·      मराठवाडा विकासाच्या विविध निर्णयांवर अद्याप अंमलबजावणी नाही-अंबादास दानवे यांची टीका

·      येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण

आणि

·      राज्यात येत्या २६ तारखेपासून तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

****

हरित उर्जेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प दोन अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नारंगवाडी इथल्या प्रकल्पांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज उपलब्ध होईल, असं फडणवीस यावेळी म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांना १६ हजार मेगावॅट इतकी वीज देण्यात येते. हे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणण्याचं काम दोन वर्षापासून सुरू असून, टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर उर्जेवर आणण्यात येतील, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात आजपासून वर्ग होणार आहे. ३१ डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती याबाबतच्या वृत्तात दिली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशात दिली होती.

****

राज्य मंत्रिमंडळानं छत्रपती संभाजीनगर इथं बैठक घेऊन मराठवाड्याच्या विकासाचे विविध निर्णय घेतले होते, त्यावर अद्याप अंमलबजावणी केली नसल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे सभागृहात मांडल्याचं दानवे यांनी सांगितलं. ते म्हणाले

१६ नोव्हेंबर २०२३ ला राज्य मंत्रीमंडळ बैठक झाली होती. त्याच्यात मराठवाड्याच्या विकासाचे मुद्दे या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले होते. या विषयावर मी सातत्यानं या अधिवेशनात आवाज उठवलेला आहे. याच्यावर फक्त घोषणा सरकारच्या झालेल्या आहेत. आणि सरकार तसं नवीन जरी असलं तरी मागचं सरकार आणि हे सरकार काय वेगवेगळं अशातला काही भाग नाही.

****

चालू आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यांत देशातून स्मार्टफोन निर्यातीनं एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. सरकारच्या उत्पादन प्रोत्साहन योजनेमुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत स्मार्टफोनची निर्यात ४५ टक्क्यांनी वाढल्याचं वैष्णव म्हणाले.

****

 

 

एक देश एक निवडणूकसाठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक ८ जानेवारी रोजी होणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी ही समिती आपला अहवाल सादर करेल. या समितीमध्ये लोकसभेचे २७ आणि राज्यसभेचे १२ असे एकूण ३९ सदस्य आहेत.

****

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं. प्रियांक कानुनगो आणि निवृत्त न्यायमूर्ती डॉ. विद्युत रंजन सारंगी यांची आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

****

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईच्या शिवाजीपार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेनेगल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या कामाला पुढील पिढ्यांचीही प्रशंसा मिळत राहील, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण करत, वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व आणणारे बेनेगल अजरामर राहतील, असं म्हटलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सोनेरी अध्याय संपला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

****

ख्रिस्ती बांधवांचं आराध्य असलेल्या भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ उद्या साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून, ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.

अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात अनेक घरं तसंच चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.

****

राष्ट्रीय ग्राहक दिन आज पाळण्यात येत आहे. ग्राहक व्यवहार विभागानं आज सार्वजनिक वापरासाठी जागो ग्राहक जागो ॲप’, ‘जागृती ॲपआणि जागृती डॅशबोर्डला प्रारंभ केला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या ॲप तसंच डॅशबोर्डचं अनावरण करण्यात आलं. ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक रोखणे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे हा या ॲपचा उद्देश आहे. ऑनलाईन व्यवहारात कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर जागो ग्राहक जागो ॲप ग्राहकांना सतर्क करते. तर बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबधीची तक्रार करण्यास जागृती ॲप ग्राहकांना सक्षम करते तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेते, असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

ग्राहकांनी वस्तू किंवा सेवा खरेदी करतांना खबरदारी बाळगावी आणि खरेदीची पावती आवर्जुन घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष शिल्पा डोलारकर यांनी केलं आहे.

तुम्ही जेव्हा पण कुठे वस्तू खरेदी करताल, कोणतीही सेवा घेताल, तेव्हा प्रत्येक गोष्टीची पावती घेणं, प्रत्येक गोष्टीचे प्रॉपर स्त- डॉक्युमेंट जमा करणे हे जरूर यायला याबाबत तुमचे जर कुठे फसवणूक झाली तर तुम्ही ग्राहक आयोगात येऊन तुमची तक्रार दाखल करू शकतात.

****

राज्यात येत्या २६ तारखेपासून तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. २६ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा, आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघात सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज वडोदरा इथं खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघाने पाच बाद ३५८ धावा करत, वेस्ट इंडीजसमोर ३५९ धावाचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं, तेव्हा वेस्ट इंडीज संघाच्या सहा षटकात बिनबाद वीस धावा झाल्या आहेत.

****

राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात तीन जानेवारी २०२५ पर्यंत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम राबवण्यात येत आहे. हिंगोली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाये यांनी या मोहिमेबाबत अधिक माहिती दिली.

या मोहिमेअंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये ९९ पथक तयार करण्यात आलेली आहेत. हे पथक अति जोखीमग्रस्त भागांमध्ये टीबी सदृश्य रुग्णांचा सर्वे करत आहे, की ज्यांना टीबी दृश्य लक्षणे आहेत, जसा दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, संध्याकाळच्या वेळी ताप येणे, भूक मंदावणे किंवा थुकीमध्ये रक्त येणे.

****

जालना जिल्ह्यातल्या जाफ्राबाद-चिखली मार्गावर एसटी बस अपघातात चालक-वाहकासह १५ प्रवासी जखमी झाले. आज सकाळी कोळेगाव घाट चढत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही बस वीस फूट खोल खड्ड्यात कोसळली. अपघातातल्या जखमी प्रवाशांना चिखली इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

महावितरणच्या अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असणार आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील ५ हजार १६८ लघु आणि उच्चदाब थकबाकीदार ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तसच ४ हजार ४३५ वीजग्राहकांनी ७ कोटी २८ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

बीड पोलिसांनी काल एकाच दिवसात सुमारे ६३ अवैध धंद्यांवर कारवाई केली. जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक नवनित काँवत यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातल्या २८ पोलिस ठाण्यांनी एकाच दिवसात ही कारवाई केली. जुगार, अवैध मद्य विक्री प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नांदेड इथं मोर्चा काढण्यात आला. परभणी, बीड प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

लातूर इथंही काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख, लातूरचे खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी फेरी काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

****

बांगलादेशात भारतीय आणि हिंदुसह अन्य अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आज नाशिक इथं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने एका मॉलमधील बांगलादेशात उत्पादीत झालेल्या कपड्यांची होळी करण्यात आली.

****

No comments:

Post a Comment