Thursday, 2 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.01.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 02 January 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.

****

दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या गडचिरोली दौऱ्याबाबत समाज माध्यमावर टाकलेल्या पोस्ट वर पंतप्रधानांनी ही प्रतिक्रिया दिली. गडचिरोली जिल्ह्यातली विकासकामं, अहेरी ते गर्देवाडा बस सेवेला प्रारंभ, ११ नक्षलवाद्यांचं आत्ममसर्पण यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांनी, दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग मोकळा होईल, असं नमूद केलं.

****

दरम्यान, पंतप्रधान मोदी उद्या नवी दिल्ली इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये अशोक विहार इथं झोपडपट्टीतल्या रहिवाशांसाठी बांधलेल्या सुमारे सतराशे सदनिकांचं उद्घाटन करण्यात येणार असून, पात्र लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करण्यात येणार आहेत. यासोबतच दोन नगर पुनर्विकास योजना, द्वारका इथं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एकीकृत कार्यालय परिसराचं उद्घाटन, दिल्ली विद्यापीठात तीन नवीन योजनांचा शुभारंभ देखील पंतप्रधान करणार आहेत.

****

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरु आहे. कर्तव्यपथावर संरक्षण दलाच्या सैनिकांकडून संचलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी तिकिटांची विक्री आजपासून सुरू झाली. सर्वसामान्य लोक आमंत्रण डॉट एम ओ डी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरुन किंवा आमंत्रण ॲप वरुन थेट तिकिटं खरेदी करू शकतात.

****

चाळीस वर्षांपूर्वी भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर बंद असलेल्या युनियन कार्बाइड कारखान्यातून सुमारे ३७७ टन घातक कचरा विल्हेवाटीसाठी हलवण्यास कालपासून सुरुवात झाली. हा विषारी कचरा १२ सीलबंद कंटेनर ट्रकमधून इंदूर जवळच्या पिथमपूर औद्योगिक परिसरात हलवला जात आहे. धोकादायक कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी विशेष रस्ता मोकळा करण्यात आला असल्याचं, भोपाळ गॅस दुर्घटनेतल्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंग यांनी सांगितलं. १९८४ साली दोन आणि तीन डिसेंबरच्या मध्यरात्री युनियन कार्बाइड या कीटकनाशक निर्मिती कारखान्यातून अत्यंत विषारी मिथाइल आयसोसायनेट वायूची गळती झाली, त्यामुळे हजारो लोक मरण पावले आणि हजारो लोकांना गंभीर आणि दीर्घकाळ भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागत आहे

****

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्याच्या बाहेर करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणात पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्वत सभेला आजपासून प्रारंभ झाला. श्रीमंत अमरजीत राजे बारगळ यांच्या हस्ते या दोन दिवसीय विद्वत परिषदेचं उद्घाटन झालं. सामाजिक, धार्मिक, पर्यावरण संवर्धन आणि रोजगार निर्मिती सारखे उपक्रम यशस्वीरित्या राबवलेल्या अहिल्याबाईंचं जीवनकार्य प्रेरणादायी असल्याचं बारगळ यांनी नमूद केलं. विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉक्टर वाल्मीक सरोदे यांनी याप्रसंगी बोलतांना, अहिल्यादेवी यांचे सुयोग्य प्रशासन, जल व्यवस्थापनाचे तंत्र, व्यापार वाढीसाठीचे प्रयत्न, घाटांची निर्मिती, कररचनेतील योगदान ईत्यादी बाबींचा अभ्यास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

****

नांदेड जिल्ह्यात भोकर इथं उद्या २० व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनात लोकसंवाद पुरस्कारासह विविध सेवा समर्पण पुरस्कारांचं वितरण, प्रसिद्ध समिक्षक भु.द. वाडीकर यांची मुलाखत, ग्रंथप्रदर्शन यासारखे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 

****

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाचं एकोणसाठावं प्रदेश अधिवेशन आजपासून लातूर इथं सुरु होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात उद्या शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. या अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे. 

****

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. १५ जानेवारी पर्यंत राबवण्यात येणाऱ्या या पंधरवड्यात वाचन जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

****

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात खामगाव इथं उद्या तीन जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होईल.

****

No comments:

Post a Comment