Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
· प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा राज्य सरकारचा
निर्णय
· संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीस
सरकार अनुकूल;सदर प्रकरणावर आपल्या मंत्रिपदाचा परिणाम नाही-धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
· राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर-डी गुकेश आणि मनू भाकरसह चौघांना खेलरत्न-तर स्वप्नील
कुसळे आणि सचिन खिल्लारी सह ३२ जणांना अर्जुन पुस्कार
आणि
· शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न समाज घडवावा-ज्येष्ठ समीक्षक
डॉ सुधीर रसाळ यांचं आवाहन
****
प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक
आयडी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब
करण्यात आलं. राज्यातील सर्व सामाजिक विकास महामंडळं एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा
तसंच मंत्रालयात येणाऱ्या तक्रारी जिल्हास्तरावर सोडवण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्याचा
निर्णयही राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर
पत्रकारांशी बोलतांना या निर्णयांबाबत माहिती दिली.
सामान्यांकरता देखील युनिक आयडी तयार करण्यास आम्ही
निर्णय घेतलाय. त्यातनं या या कामांवर आपल्याला नीट लक्ष
ठेवता येईल. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन देखील करता येईल. दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील
केलेला आहे, की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळं आपण तयार केलेली आहेत, यांचा समन्वय
राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर
ही सगळी महामंडळं, त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील. जेणेकरून सगळी महामंडळ योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील
मंत्रालयामध्ये येणारे ७०% तक्रारी
या जिल्हास्तरावर सुटण्यासारख्या असतात. त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबेस्ट ग्रीव्हन
रीड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो आहोत, की
जेणेकरून जिल्हास्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या
कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या सुधारणेमुळे शासकीय
थकबाकीपोटी सरकारजमा झालेल्या सुमारे ४ हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत
दिल्या जाणार आहेत. प्रचलित बाजारमूल्याच्या २५% रक्कम जमा करून मूळ खातेदारांना किंवा
त्यांच्या वारसांना या जमिनी परत मिळवता येतील. याबाबतचं विधेयक विधीमंडळाच्या आगामी
अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळाचं कामकाज 'ई ऑफिस'च्या
धर्तीवर 'ई-कॅबिनेट'
स्वरुपात करण्याचं सूतोवाच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात
आलं.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राज्य
मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज
मंत्रालय सुरक्षेचा आढावा घेतला. कृत्रीम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने सुरक्षा व्यवस्था
अधिक भक्कम करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
****
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी
विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती
दिली. ते म्हणाले –
मी माननीय उज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सांगितले की मला एक दोन दिवस द्या. कारण
या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे.
त्यानुसार मी निर्णय घेणार आहे. मला असं वाटतं त्यांनी जर
होकार दिला, तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू.
आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे
ही मागणी केली आहे. याशिवाय या प्रकरणातल्या आरोपींना बीडच्या पोलिस कोठडीतून इतरत्र
हलवण्याची मागणीही केल्याची माहिती धस यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. ते म्हणाले
–
ज्या
सरकारी वकिलाने तिथे बाजू मांडण्यास नकार
दिलेला आहे त्याचं सरकारी अधियोक्तापद
काढून घ्यावं. बीडमध्ये प्रकरण चालवावं, परंतु हे लोक बीडच्या लॉकअप मध्ये ठेवू नयेत.
ते एक तर संभाजीनगरच्या हर्सलुला हलवावेत, नाहीतर नाशिकच्या जिल्हा
हलवावेत.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी मात्र,
हा खटलाच बीड जिल्ह्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी चालवावा अशी मागणी
केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी ही मागणी केली.
हा
खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून इतरत्र चालवला पाहिजे. अजून एक मोबाईल जप्त केला
या मोबाईलमध्ये काय काय आहे, कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचा सीडीआर रेकॉर्ड अजूनही
पोलिसांनी सीआयडीला जाहीर केलेलं नाही. मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर
आपल्या मंत्रिपदी राहण्यामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचं, अन्न
नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून
सर्व आरोपींना फासावर चढवण्याची मागणी मुंडे यांनी केली. ते म्हणाले –
एक
तर पोलीस प्रशासन, सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं
तपास करतंय. आमच्या दृष्टीने दिवंगत संतोष
देशमुखची ज्यांनी हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन, राहिलेले
जे काही आरोपी त्यात लगेचच
चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्याकारांना फाशीची शिक्षा मिळावी. हा तपास
न्यायलीन पण होणार आहे. त्यामुळे त्या तपासाशी कुठल्याही
प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊच शकत नाही.
****
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा
करण्यात आली. बुद्धिबळपटू डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत
सिंग, पॅरा ॲथलीट प्रविणकुमार आणि नेमबाज मनू भाकर या चौघांना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न
पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कोल्हापूरचा नेमबाज स्वनिल कुसळे आणि सांगलीचा पॅरा ॲथलीट
सचिन खिल्लारीसह ३२ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
नेमबाजीच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांच्यासह
तीन जणांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. दिव्यांग जलतरणपटू पद्मश्री मुरलीकांत
पेटकर आणि ॲथलीट सूचा सिंग यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फिजीकल
इज्युकेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कारासह तीन
विद्यापीठांना मौलाना अबुल कलाम आझाद चषक जाहीर झाला.
१७ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु
यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे
अध्यक्ष अजित पवार यांनी सर्व पुरस्कार विजेत्याचं विशेष अभिनंदन करत आगामी यशस्वी
वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न
समाज घडवावा,
असं आवाहन ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी केलं आहे. आकाशवाणीला
दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ रसाळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहित्याबाबत अभिरुची निर्माण
करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले –
लहानपणापासून मुलांना जर वाचायची सवय लावली, विद्यार्थ्याला, त्याचे अभिरुची जर शाळेच्या
अभ्यासक्रमातून घडवली, तर चांगला अभिरुची संपन्न असा एक
शिक्षित समाज आपण घडवू शकतो. दुर्दैवानं मराठी शिक्षण
पद्धतीमध्ये हे फारसं होताना दिसत नाही. प्राथमिक आणि पूर्व
माध्यमिक या वर्गांमध्ये भाषिक शिक्षण दिलं जावं. पण
माध्यमिक स्तरावर म्हणजे आठवीपासून शालांत परीक्षेपर्यंत जी पाठ्यपुस्तकं आहेत, त्यामध्ये निवड ही अभिरुची वाढेल या दृष्टीने
करावी.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे निवृत्त उपसंचालक
राधाकृष्ण मुळी यांनी डॉ रसाळ यांची घेतलेली ही मुलाखत आकाशवाणीवरून उद्या आणि परवा
अशा दोन भागात सकाळी साडे अकरा वाजता, प्रसारित केली जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या सावित्रीबाई फुले
महिला एकात्म समाज मंडळाचे वार्षिक सामाजिक पुरस्कार आज जाहीर झाले. जळगाव जिल्ह्यात
चोपडा इथल्या मानव सेवा तीर्थ संस्थेचे नरेंद्र पाटील यांना “डॉक्टर रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार” तर बीड जिल्ह्यातल्या
संत मीराबाई आईसाहेब संस्थानच्या मठाधिपती हरिभक्त परायण राधाताई
सानप यांना “डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार” जाहीर झाला आहे. एकवीस हजार रुपये आणि सन्मानपत्र असं पुरस्कारांचं स्वरूप
आहे. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या चार तारखेला हे पुरस्कार प्रदान केले जातील.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्वत सभेला आजपासून प्रारंभ
झाला. श्रीमंत अमरजीत राजे बारगळ यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. सामाजिक, धार्मिक, पर्यावरण
संवर्धन आणि रोजगार निर्मिती सारखे उपक्रम यशस्वीरित्या राबवलेल्या अहिल्याबाईंचं जीवनकार्य
प्रेरणादायी असल्याचं बारगळ यांनी नमूद केलं. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती
वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित केलेल्या या विद्वत सभेचा उद्या समारोप
होणार आहे.
****
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी
प्रदेशाच्या एकोणसाठाव्या अधिवेशनाचं आज लातूर इथं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे
यांच्या हस्ते उद्घाटन झालं. बागडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात विविध विषयांवर मार्गदर्शन
केलं. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात उद्या दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार
आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं संत
ज्ञानेश्वर उद्यान २६ जानेवारीपर्यंत पर्यटकांसाठी खुले करण्याच्या दृष्टीने उर्वरीत
कामे पूर्ण करण्याची सूचना खासदार संदिपान भुमरे यांनी केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात
झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या कामांसाठी २७ कोटी रुपये निधी उपलब्ध करून
देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment