Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 January 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
• संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीस सरकार अनुकूल.
• जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर सकारात्मक परिणाम, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन.
• शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न समाज घडवावा-ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचं आवाहन.
आणि
• ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत रोहित शर्माला विश्रांती, जसप्रीत बुमराह संघाचा कर्णधार.
****
प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. राज्यातले सर्व सामाजिक विकास महामंडळं एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा, तसंच मंत्रालयात येणाऱ्या तक्रारी जिल्हास्तरावर सोडवण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना या निर्णयांबाबत माहिती दिली..
सामान्यांकरता देखील युनिक आयडी तयार करण्यास आम्ही निर्णय घेतलाय. त्यातनं या या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन देखील करता येईल. दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे, की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळं आपण तयार केलेली आहेत, यांचा समन्वय राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं, त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील. जेणेकरून सगळी महामंडळ योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील मंत्रालयामध्ये येणारे ७०% तक्रारी या जिल्हास्तरावर सुटण्यासारख्या असतात. त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबेस्ट ग्रीव्हन रीड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो आहोत, की जेणेकरून जिल्हास्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या सुधारणेमुळे शासकीय थकबाकीपोटी सरकारजमा झालेल्या सुमारे चार हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत.
मंत्रिमंडळाचं कामकाज 'ई ऑफिस'च्या धर्तीवर 'ई-कॅबिनेट' स्वरुपात करण्याचं सूतोवाच या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलं.
****
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले...
मी माननीय उज्वल निकमजी यांना फोन करून विनंती केलेली आहे. त्यांनी मला सांगितले की मला एक दोन दिवस द्या. कारण या केसला अधिक वेळ द्यावा लागणार आहे. त्यानुसार मी निर्णय घेणार आहे. मला असं वाटतं त्यांनी जर होकार दिला, तर निश्चितपणे त्यांची अपॉइंटमेंट आम्ही करू.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र, हा खटलाच बीड जिल्ह्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी चालवावा अशी मागणी केली. छत्रपती संभाजीनगर इथं काल पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले,
हा खटला केजच्या ऐवजी बीड जिल्हा सोडून इतरत्र चालवला पाहिजे. अजून एक मोबाईल जप्त केला या मोबाईलमध्ये काय काय आहे, कोणाकोणाचे फोन आले, कोणाकोणाचा सीडीआर रेकॉर्ड अजूनही पोलिसांनी सीआयडीला जाहीर केलेलं नाही. मला वाटतं हे जाहीर करायला पाहिजे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आपल्या मंत्रिपदी राहण्यामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचं, अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फासावर चढवण्याची मागणी मुंडे यांनी केली,
एक तर पोलीस प्रशासन, सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करतंय. आमच्या दृष्टीने दिवंगत संतोष देशमुखची ज्यांनी हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन, राहिलेले जे काही आरोपी त्यात लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्याकारांना फाशीची शिक्षा मिळावी. हा तपास न्यायलीन पण होणार आहे. त्यामुळे त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊच शकत नाही.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी स्थापन विशेष तपास पथक - एसआयटी आणि सीआयडीच्या अधिकार्यांनी बीड जिल्ह्यात तपासाला सुरुवात केली आहे. या पथकांनी काल दोन बैठका घेऊन तसंच बीड, केज, मस्साजोग अशा विविध ठिकाणी भेट देऊन संबंधितांची चौकशी केली.
****
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. या निमित्तानं शैक्षणिक संस्थांसह विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले महोत्सवाला कालपासून पुणे इथं सुरूवात झाली. यात देशभरातून ६०० कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार सहभागी झाले आहेत.
****
जम्मू काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० हे दहशतवादाला खतपाणी घालत होतं, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते काल दिल्लीत 'जम्मू काश्मीर ॲण्ड लद्दाख-थ्रू द एजेस' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरात दगडफेकीच्या घटना थांबल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले...
धारा 370 समात्प होने के बाद आतंकवादी घटनाओं मे सत्तर प्रतिशत से ज्यादा कमी हुई है। वो ये सिद्ध करता है कि धारा 370 आतंकवाद की पोषक थी। 2018 में २१०० घटनाये पथराव की हुई थी 2024 मे एक भी घटना पथराव की नही हुई हैं।
****
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. बुद्धिबळपटू डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा ॲथलीट प्रविणकुमार आणि नेमबाज मनू भाकर या चौघांना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कोल्हापूरचा नेमबाज स्वनिल कुसाळे आणि सांगलीचा पॅरा ॲथलीट सचिन खिल्लारीसह ३२ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला.
नेमबाजीच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांच्यासह तीन जणांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला असून, दिव्यांग जलतरणपटू पद्मश्री मुरलीकांत पेटकर आणि ॲथलीट सूचा सिंग यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. १७ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी सर्व पुरस्कार विजेत्याचं अभिनंदन करत आगामी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
पारंपारिक शेतीकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळण्याचं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. ते काल अहिल्यानगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातल्या बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी परिसंवादात बोलत होते. या परिसरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन चौहान यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
शालेय अभ्यासक्रमात योग्य बदल करून अभिरुचीसंपन्न समाज घडवावा, असं आवाहन ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी केलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत रसाळ यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहित्याबाबत अभिरुची निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले..
लहानपणापासून मुलांना जर वाचायची सवय लावली, विद्यार्थ्याला, त्याचे अभिरुची जर शाळेच्या अभ्यासक्रमातून घडवली, तर चांगला अभिरुची संपन्न असा एक शिक्षित समाज आपण घडवू शकतो. दुर्दैवानं मराठी शिक्षण पद्धतीमध्ये हे फारसं होताना दिसत नाही. प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक या वर्गांमध्ये भाषिक शिक्षण दिलं जावं. पण माध्यमिक स्तरावर म्हणजे आठवीपासून शालांत परीक्षेपर्यंत जी पाठ्यपुस्तकं आहेत, त्यामध्ये निवड ही अभिरुची वाढेल या दृष्टीने करावी.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे निवृत्त उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांनी डॉ रसाळ यांची घेतलेली ही मुलाखत आकाशवाणीवरून आज आणि उद्या अशा दोन भागात सकाळी साडे अकरा वाजता, प्रसारित केली जाणार आहे.
****
बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला अखेरचा सामना आजपासून ऑस्ट्रेलियात सिडनी इथं खेळवला जात आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा तीन बाद ५७ धावा झाल्या होत्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देऊन जसप्रीत बुमराहकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे वार्षिक सामाजिक पुरस्कार काल जाहीर झाले. जळगाव जिल्ह्यात चोपडा इथल्या मानव सेवा तीर्थ संस्थेचे नरेंद्र पाटील यांना, "डॉक्टर रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार" तर बीड जिल्ह्यातल्या संत मीराबाई आईसाहेब संस्थानच्या मठाधिपती हरी भक्त परायण राधाताई सानप यांना "डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार" जाहीर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं उद्या चार तारखेला हे पुरस्कार प्रदान केले जातील.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्वत सभेचा आज समारोप होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित केलेल्या या विद्वत सभेचं श्रीमंत अमरजीत राजे बारगळ यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं.
****
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाच्या एकोणसाठाव्या अधिवेशनाचं काल लातूर इथं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. बागडे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात आज शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे.
****
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काल ‘विद्यापीठ वाचत आहे’ हा उपक्रम राबवण्यात आला.
****
No comments:
Post a Comment