Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 23 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज
१२८ वी जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी त्यांनी आदरांजली वाहिली आहे. सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम
दिवस म्हणून साजरी केली जाते. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत सुभाषचंद्र बोस यांचं योगदान
अतुलनीय असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन
खरगे यांनी संसदेच्या संविधान सदन इथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन
केलं.
मुंबई इथं मंत्रालयात पाणीपुरवठा
आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे
यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.
दरम्यान, सांस्कृतिक मंत्रालयानं नेताजींच्या जन्मस्थानी ओडिशातल्या कटक इथं तीन दिवसांचा उत्सव आयोजित केला
आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब
ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. महाराष्ट्राचा विकास आणि सार्वजनिक
कल्याणाप्रतीची बाळासाहेबांची वचनबद्धता स्मरणीय असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावरील
संदेशात म्हटलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यातल्या रेल्वे अपघातातील
१२ मृत प्रवाशांमध्ये ८ पुरुष, एक दहा वर्षीय बालक आणि तीन महिलांचा समावेश आहे. सर्व मृतदेह
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ठेवले आहेत, यातील पाच मृतदेहांची ओळख पटली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२५७-२२१७१९३
या क्रमांकावर हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
****
फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या
इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन
प्रवेशपत्र, महाराष्ट्र
राज्य माध्यमिक उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑनलाईन उपलब्ध केलेल्या या
प्रवेशपत्रामध्ये काही दुरुस्त्या असल्यास सदर दुरुस्त्या ऑनलाईन पध्दतीनं करायच्या
असून त्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित
शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय
नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन शाह यांच्या
हस्ते होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष २०२५ निमित्तानं वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या
विविध कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि देशभर नव्यानं स्थापन झालेल्या १०,००० नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात
अमित शाह यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
****
नागपुरातील दीक्षाभूमी, ताजबाग, रामटेक
आणि इतर धार्मिक स्थळं यांच्या विकासाबाबत लवकरच बैठका घेऊन उपाययोजना करणार आहे,
असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. महसूल मंत्री
आणि नागपूर तसंच अमरावतीच्या पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नागपूरमध्ये प्रथमच
आयोजित मीट द प्रेस या कार्यक्रमात ते बोलत होते.
****
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील
ढाळेगाव इथं चार हजारांहून अधिक कोंबड्यांच्या पिलांचा अचानक मृत्यू झाला. उदगीर इथं
काही दिवसापूर्वी बर्ड फ्ल्यूमुळे कावळे दगावले होते. त्यामुळं जिल्हा प्रशासन आणि
पशुसंवर्धन विभागाचं शीघ्र कृती दल ढाळेगावमध्ये दाखल झालं आहे. मृत पक्ष्यांचे वैद्यकीय
नमुने पुणे जिल्ह्यातील औंध इथल्या राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
कडाक्याच्या थंडीत पोल्ट्री शेड मधील पक्षांना विजेच्या अभावी उबदारपणा मिळाला नाही.
तसंच सर्व पक्षी एकत्रित येऊन गुदमरल्यामुळे मृत झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज जिल्हा पशुसंवर्धन
अधिकारी डॉ.बी.यु. बोधनकर यांनी व्यक्त केलाय.
****
कृष्णा नदीतील पुराचं पाणी मराठवाड्यात
नेण्याचं नियोजन असून त्याबाबतच्या प्रकल्पास जागतिक बँकेनं मंजूरी दिली आहे. जागतिक
बँकेचं एक पथक उद्या, २४
तारखेला यासाठी सांगली दौऱ्यावर येत आहे. या भागातील सांडपाणी प्रकल्पाची, अवर्षण प्रवण भागाची पाहणी पथकाकडून केली जाणा आहे. तसंच पथक कृष्णा नदी आणि
परिसरात राहणाऱ्या कुटुंबांच्या भेटी घेणार आहे. या प्रकल्पासाठी तीन हजार २०० कोटी
रुपये खर्च अपेक्षित आहे, त्यापैकी दोन हजार ३३८ कोटी रुपयांचं
अर्थसहाय्य जागतिक बँक करणार आहे.
****
प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात
मौनी अमावस्येनिमित्त गर्दीची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे विभागानं दीडशे अतिरिक्त रेल्वे
सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महाकुंभमेळ्यात आतापर्यंत नऊ कोटी ७३ लाख भाविकांनी कुंभस्नान
केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
No comments:
Post a Comment