Thursday, 23 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.01.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 January 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०

****

विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून निरंतर प्रेरणा मिळते - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 

मराठवाड्यातल्या कृषि विद्यापिठाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि संशोधनावर अधिक भर द्यावा - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं आवाहन. 

कृष्णा नदीतलं पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या प्रकल्पासंदर्भात जागतिक बँकेचं पथक उद्या सांगली दौऱ्यावर.  

राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाची सुरुवात. 

आणि

१९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर ६० धावांनी विजय.   

****

विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून निरंतर प्रेरणा मिळते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२८ वी जयंती आज पराक्रम दिवस म्हणून साजरी होत असून, यानिमित्त दिलेल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान बोलत होते. नेताजींनी आरामदायी जीवनाचा मार्ग न पत्करता भारताच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात परिश्रम घेतले, आपणही विकसित भारताच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी अशा प्रकारे मेहनत घ्यायला हवी, असं पंतप्रधान म्हणाले, 

नेताजी ने देश की स्वतंत्रता के लिए आजाद हिंद फौज बनाई, इसमें देश के हर क्षेत्र हर वर्ग के वीर और वीरांगनाएं शामिल थीं। सबकी भाषाएं अलग-अलग थीं, लेकिन भावना एक थी देश की आजादी। यही एकजुटता आज विकसित भारत के लिए भी बहुत बड़ी सीख है। तब स्वराज के लिए हमें एक होना था, आज विकसित भारत के लिए हमें एक रहना है।

देशाच्या एकतेला बाधा आणणाऱ्या शक्तींपासून दक्ष राहायला हवं असं पंतप्रधान म्हणाले. आज भारत गुलामीच्या मानसिकतेमधून बाहेर पडत आहे. वारशाचा अभिमान बाळगत विकासाच्या वाटेवर चालत आहे. याच बळावर जागतिक स्तरावर भारताचा आवाज बुलंद होत असून, जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा दिवस दूर नाही, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. 

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली अर्पण केली. संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली.

****

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त राजभवन इथं आदरांजली वाहिली. 

****

केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हस्ते झालं. जगातल्या इतर निवडणूक यंत्रणांचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्यासह तेरा निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे जवळपास ३० प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत. निवडणूक व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणींविषयी या परिषदेत चर्चा होणार आहे. लोकशाही असलेल्या देशात निवडणुकीचं भवितव्य हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर, तसंच राजकीय प्रचारात आणि निवडणूक कार्यपद्धतीत कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर, यावर अवलंबून असल्याचं, राजीव कुमार यावेळी म्हणाले.

****

उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत जवळपास दहा कोटी भाविकांनी कुंभस्नान केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज कुंभमेळा परिसरात भेट देऊन आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या कक्षांच्या वतीनं सुरु असलेल्या प्रसिद्धी व्यवस्थेची पाहणी केली. प्रसार भारतीनं या महाकुंभसाठी व्यापक प्रसिद्धीसाठी व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलं. महाकुंभसंबंधी अनेक रोचक तथ्यं आकाशवाणी तसंच दूरदर्शनचे प्रतिनिधी सामान्यांपर्यंत पोहोचवत असल्याचं ते म्हणाले. प्रयागराज इथं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानाच्या या पर्वाच्या माध्यमातून एकात्मतेची भावना वृद्धींगत होत असल्याचं जाजू यावेळी म्हणाले.

दरम्यान, महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त गर्दीची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे विभागानं दीडशे अतिरिक्त रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

****

मराठवाड्यातल्या कृषि विद्यापिठाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि संशोधनावर अधिक भर द्यावा, असं आवाहन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सव्वीसावा दीक्षांत समारंभ आज राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. वातावरणाशी जुळवून घेत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होईल, अशा प्रकारच्या बि-बियाण्यांवर संशोधन करून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेचा विद्यापीठाने भाग बनावं, असं राज्यपाल म्हणाले. 

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे या कार्यक्रमास उपस्थित होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या समारंभात राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

कृष्णा नदीतलं पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याचं नियोजन असून, त्याबाबतच्या प्रकल्पास जागतिक बँकेनं मंजूरी दिली आहे. जागतिक बँकेचं एक पथक उद्या, २४ तारखेला यासाठी सांगली दौऱ्यावर येत आहे. या भागातल्या सांडपाणी प्रकल्पाची, अवर्षण प्रवण भागाची पाहणी पथकाकडून केली जाणार आहे. तसंच पथक कृष्णा नदी आणि परिसरात राहणाऱ्या कुटुंबांच्या भेटी घेणार आहे. या प्रकल्पासाठी तीन हजार २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, त्यापैकी दोन हजार ३३८ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जागतिक बँक करणार आहे.

****

साखर कारखानदारीत काळानुसार बदल आवश्यक असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज ते बोलत होते. एफआरपी अर्थात रास्त किफायतशीर दरात वाढ होते त्या प्रमाणात एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत वाढत नाही, या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

दरम्यान, या कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या रांजणी इथल्या नॅचरल शुगर या सहकारी साखर कारखान्याला या वर्षीचा वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचा सर्वोत्कृष्ट डिस्टीलरी, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन असे तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.  

****

राज्यातल्या सर्व एस टी बस स्थानकांमध्ये राबवण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांसोबतच लोकांनीही सहभागी व्हावं आणि ती एक लोकचळवळ व्हावी,  असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. मुंबईत कुर्ला बसस्थानक इथं या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते आज बोलत होते. बसस्थानक ही सार्वजनिक जागा असून, तिथे स्वच्छता ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचं सरनाईक म्हणाले.

****

महिला क्रिकेटमध्ये, १९ वर्षांखालील टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने श्रीलंकेवर ६० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी निर्धारित षटकात ११८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल श्रीलंकेचा संघ २० षटकात नऊ बाद ५८ धावाच करु शकला. 

****

जळगाव जिल्ह्यात परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या १३ झाली आहे. त्यातल्या १० जणांची ओळख पटली असून, त्यात एक लहान मूल आणि तीन महिलांचा समावेश आहे.

****

महसूल विभागात अंतर्भाव झालेल्या अनेक नवीन संगणकीय प्रणालींची कार्यपद्धती प्रशिक्षणातून जाणून घ्यावी, असं आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी ग्राम महसुल अधिकाऱ्यांना केलं. छत्रपती संभाजीनगर इथं आज ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. सध्याच्या काळात आपल्या कामाच्या स्वरुपाचं आकलन करुन त्यानुसार प्रशिक्षण घ्यावं, या प्रशिक्षणाचा अंतिम उपयोग हा लोकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा स्वामी यांनी व्यक्त केली.

****

सुप्रसिध्द कवी, नाट्यकथा लेखक प्राध्यापक अनिल पंढरीनाथ सोनार यांचं आज  पहाटे धुळ्यात, वार्धक्यामुळे निधन झालं, ते ७९ वर्षांचे होते. सोनार हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारणीचे माजी सदस्य तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष होते. 

****

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातला रहिवासी असलेल्या आरोपीस जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सश्रम जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. २५ ऑगस्ट २०१८ रोजी ही घटना घडली होती.

****


No comments:

Post a Comment