Friday, 24 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.01.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 January 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन पाच लोकांचा मृत्यू झाला तर अनेक लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कंपनीमध्ये काम सुरू असताना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज जवळपास पाच किलोमीटर पर्यंत ऐकू गेल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक परधाडे इथल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींची केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज भेट घेऊन चौकशी केली. त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना भेटून दिलासा देत, शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जात असल्याचं सांगून त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या. या दुर्घटनेत जखमींवर पाचोरा इथं प्राथमिक उपचार करण्यात आले होते. त्यानंतर सर्व नऊ जखमींना जळगावच्या गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

****

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. देशभर नव्यानं स्थापन झालेल्या १० हजार नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात यावेळी करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात अजंग गावात आयोजित सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना शहा उपस्थित राहणार आहेत. 

****

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्लीत अर्थसंकल्पा निमित्त शिरा महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. येत्या एक फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, या अर्थसंकल्पाच्या तयारीचा अखेरचा टप्पा म्हणून हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. केंद्रीय वित्त राज्य मंत्री पंकज चौधरी तसंच वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

****

देशभरातल्या दोनशे विद्यापीठांमध्ये कृत्रीम बुद्धिमत्तेशी निगडित अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह कृत्रीम बुद्धिमत्ता क्षेत्रातही भारत जगाचं नेतृत्व करू शकतो, असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. ते म्हणाले

भारत को एआई का युझ केस कॅपीटल बनना है। जिर तरह से आयटी इंड्स्ट्री में भारत ने लीड ली। और उसके लिए बडे प्रयास करेंगे। एआई के लिए दो सौ युनिवर्सिटीस्‌ मे एआई के बहोत अच्छे कोर्सेस चालु करेंगे, जिससे की स्टुडंट एआई को अपयोग मे लाके सीख सके। नये मॉडेल्स बना सके। नये ॲप्लीकेशन बना सके और When they come out of the college, they should be AI ready.

****

देशभरातल्या विविध औषधी निर्माण कंपन्यांनी निर्मित केलेली १३५ औषधं ही मानक गुणवत्तेनुसार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्रीय औषध प्रयोगशाळा तसंच राज्य औषधी प्रयोगशाळांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये केलेल्या चाचण्यांमधून ही बाब स्पष्ट झाली. गुणवत्ता मानकं पूर्ण करत नसणाऱ्या अशा बनावट औषधांची ओळख पटवण्यासाठी तसंच बाजारातून हटवण्यासाठी सर्व राज्यांच्या सहकार्यानं सातत्यानं तपासणी करण्यात येत असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

जलसंपदा विभाग महाराष्ट्राला जलसमृद्ध करुन शेतकऱ्याला सुखी आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करु शकतो. आपण साऱ्यांनी एकजुटीने काम करावं आणि महाराष्ट्राला जलसमृद्ध करावं, असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथे जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

जलसंपदा विभाग हा शेतकरीभिमुख व्हावा, शेतकऱ्यांशी संवाद वाढवा, यासाठी आपण प्रयत्न असून, पाणी व्यवस्थापन, सिंचनाचे निकष, वॉटर ऑडीट या संकल्पनांवर या विभागानं काम करण्याची गरज विखेपाटील यांनी व्यक्त केली. सिंचनाचं नवं तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून, उपलब्ध पाण्याचा प्रभावी वापर करण्याविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षित केलं पाहिजे, असंही विखे पाटील यांनी यावेळी संबंधितांना सूचित केलं.

****

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतल्या कर्तव्य पथावर नियोजित सोहळ्यासाठी पालघर जिल्ह्यातले  विश्वास मोहिते यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मोहिते यांनी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत आपल्या घरावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज बचत होत असल्याचं मोहिते सांगतात.

****

No comments:

Post a Comment