Friday, 24 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.01.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 January 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.

****

दावोसमध्ये झालेल्या गुंतवणुकीपैकी ९८ टक्के थेट परदेशी गुंतवणूक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती.

मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन. 

भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं प्रतिपादन.

राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाची सुरुवात. 

आणि

१९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर ६० धावांनी विजय.  

****

स्वित्झर्लंडच्या दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचादरम्यान महाराष्ट्रानं केलेल्या सामंजस्य करारांच्या एकंदर गुंतवणुकीपैकी ९८ टक्के गुंतवणूक ही थेट परदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दावोस इथून काल वार्ताहर परिषदेत बोलताना त्यांनी, या गुंतवणुकीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी ग्वाही दिली. 

या ज्या काही गुंतवणुकीचं एक महत्वाचं जे काही याचं फिचर असेल तर याच्यामध्ये जवळपास अठ्ठाण्णव टक्के जी गुंतवणूक आहे, ही फॉरेन डायरेक्ट इनव्हेसमेंट आहे. ती एफडीआय एफआय च्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे. त्यामुळे ही गुंतवणूक आपल्या देशाकरता आपल्या राज्याकरता यासाठी महत्वाची आहे, ही गुंतवणूक ही थेट विदेशी गुंतवणूकीच्या स्वरुपात येत आहे. आपल्याला कल्पना आहे की थेट विदेशी गुंतवणूकीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि त्यात जॉबची निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. आणि एक प्रकारे आपली जी काही त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे. ती विस्तारीत होते एक्सपांड होते.


या परिषदेदरम्यान महाराष्ट्रानं एकंदर ६१ सामंजस्य करार केले असून त्यामुळे १५ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातल्या सर्व भागात आणि क्षेत्रात गुंतवणूक आल्यानं राज्‍याचा समतोल विकास होईल, असा ‍विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

दरम्यान, दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारातल्या २८ पैकी २० कंपन्या राज्यातल्या असताना दावोस दौरा कशासाठी असा सवाल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्याचवेळी गेल्यावर्षी झालेल्या सामंजस्य करारापैकी किती अंमलात आले याची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना केलं.

दावोसमध्ये सर्व गुंतवणूकदार एकत्र येतात, त्यामुळं इथे येणं आवश्यक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,

जे एफडीआय आहे त्यामुळे त्यांची अशी इच्छा असते की त्यांचे जे ग्लोबल पार्टनर आहेत. त्यांचे जे इनव्हेस्टर आहेत. किंवा त्यांच्या सोबत जे लोकं टेक्नॉलॉजी मांडताय अशा सगळ्यांच्या प्रेझेन्स मध्ये एमओयु झाले पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतय नेटवर्कींगचं कनेक्टींच एक महत्वाचं सेंटर आहे. इथला तुमचा प्रेझेन्स हा जे काही जगभरातले उद्योजक असतात, जे इनव्हेस्टर असतात त्यांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप करतो.

****

दरम्यान, दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचे ऐतिहासिक सामंजस्य करारांची प्रथा सलग तिसऱ्या वर्षी कायम राहिली असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात काही हजार कोटींची गुंतवणूक यानिमित्ताने येणार असून, औद्योगिक क्षेत्रात समतोल राखण्याचं कामही महायुती सरकारने केलं, असं सामंत म्हणाले.

****

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष २०२५ निमित्तानं वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि देशभर नव्यानं स्थापन झालेल्या १० हजार नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात यावेळी करण्यात येणार आहे. 

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात अजंग गावात आयोजित सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना शहा उपस्थित राहणार आहेत.  

****

भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते काल परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य आयात करणाऱ्या देशाची भूक भागवून सध्या देश कृषि उत्पादन निर्यातीमध्ये जगात अग्रेसर ठरत आहे, असं ते म्हणाले. मराठवाड्यातल्या कृषि विद्यापिठाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि संशोधनावर अधिक भर द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे या कार्यक्रमास उपस्थित होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या समारंभात राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२८ वी जयंती काल पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त दिलेल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून निरंतर प्रेरणा मिळते, असं नमूद केलं. 

****

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. 

यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काल मुंबईत मेळावा झाला. यावेळी बोलताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, वेळ येईल तेव्हा स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं. 

****

साखर कारखानदारीत काळानुसार बदल आवश्यक असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते. एफआरपीच्या प्रमाणात एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत वाढत नाही, या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री तसंच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

दरम्यान, या कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या रांजणी इथल्या नॅचरल शुगर या सहकारी साखर कारखान्याला या वर्षीचा वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचा सर्वोत्कृष्ट डिस्टीलरी, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन असे तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.  

****

राज्यातल्या शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. तूर खरेदी केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने करावी, तसंच नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण  येणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. हमी भावाने ३०० केंद्रांवरून तीन लाख मेट्रीक टन तूर खरेदी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या सर्व एस टी बस स्थानकांमध्ये राबवण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांसोबतच लोकांनीही सहभागी व्हावं आणि ती एक लोकचळवळ व्हावी,  असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. मुंबईत कुर्ला बसस्थानक इथं या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते काल बोलत होते. बसस्थानक ही सार्वजनिक जागा असून, तिथे स्वच्छता ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचं सरनाईक म्हणाले.

****

महिला क्रिकेटमध्ये, १९ वर्षांखालील टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने श्रीलंकेवर ६० धावांनी विजय मिळवला. काल झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी निर्धारित षटकात ११८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल श्रीलंकेचा संघ २० षटकात नऊ बाद ५८ धावाच करु शकला. 

****

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात नवी दिल्लीत मूळच्या बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या देवडी इथल्या फ्लाईंग ऑफीसर दामिनी देशमुख या परेड कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. याबद्दल दामिनी यांचे वडील माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,

दामिनीचे आर्मी परेडसाठी सलेक्शन झाले, ही गोष्ट आमच्या कुटुंबासाठी खूपच अभिमानाची आहे. आम्हाला त्याचा खूप आनंद झालेला आहे.

****

महसूल विभागात अंतर्भाव झालेल्या अनेक नवीन संगणकीय प्रणालींची कार्यपद्धती प्रशिक्षणातून जाणून घ्यावी, असं आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी ग्राम महसुल अधिकाऱ्यांना केलं. छत्रपती संभाजीनगर इथं ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. सध्याच्या काळात आपल्या कामाच्या स्वरुपाचं आकलन करुन त्यानुसार प्रशिक्षण घ्यावं, या प्रशिक्षणाचा अंतिम उपयोग हा लोकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा स्वामी यांनी व्यक्त केली.

****

जालना जिल्ह्यात येत्या ३० ते १३ फेब्रुवारी दरम्यान स्पर्श -कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. यासंर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून तालुकास्तरावर नवीन आयुष्यमान कार्ड काढण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. 

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज कर समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना त्यांचे मालमत्ता कराबाबत आक्षेप, तक्रारी निकाली काढण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी हे शिबिर घेण्यात येतं.  

****

नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे आणि उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना १७ हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. 

****


No comments:

Post a Comment