Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 January 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• सहकार चळवळीच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकतेची आवश्यकता केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त
• एसटीच्या भाड्यात सुमारे १५ टक्के वाढ-एक फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीचीही दरवाढ
• प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती देशाला संबोधित करणार
• राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
• उदगीर इथल्या कोंबड्यांचे मृत्यू बर्ड फ्लु मुळे नसल्याचं तपासणी अहवालातून स्पष्ट
****
सहकार चळवळीच्या विस्तारासाठी शिस्त आणि व्यावसायिकतेची आवश्यकता केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत काल आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वर्षात सहकाराच्या विस्तारासाठी, सहकारात शिस्तीसाठी, सहकारी संस्थांच्या समृद्धीसाठी काम करू, प्रत्येक व्यक्ती सहकारी चळवळीत जोडला जाऊन खऱ्या अर्थानं सहकारातून समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन शहा यांनी दिलं. ते म्हणाले..
‘‘यही वर्ष के अंदर सहकारिता के विस्तार के लिये हम काम करेंगे। सहकारीता क्षेत्र के अंदर शिस्त और सूचिता आये, इसके लिये भी काम करेंगे। यही वर्ष के अंदर सहकारी संस्थायें समृद्ध बने इसके लिये भी काम करेंगे। और यही वर्ष के अंदर कई नये क्षेत्र के अंदर सहकारीता की रीच बढें और भारत का हर व्यक्ति किसी ना किसी प्रकार से सहकारीता से जुडे इस दिशा में हम बहोत आगे बढेंगे।’’
यावेळी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षातील कार्यक्रमाच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन , राष्ट्रीय शहरी सहकार वित्त आणि विकास महामंडळाच्या मुंबईतल्या कार्यालयाचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात अजंग इथं सहकार परिषदेलाही काल शहा यांनी संबोधित केलं. सहकार चळवळ आणि विज्ञान यांची सांगड घातल्यास आजही कृषिक्षेत्र लाभदायक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीने प्रवासी भाड्यात सुमारे १५ टक्के दरवाढ लागू केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. येत्या एक फेब्रुवारी पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये देखील तीन रुपयांनी वाढ होणार आहे. महामंडळाला कर्मचाऱ्यांची दोन हजार कोटी रुपयाची देणी द्यायची आहेत. यासाठी प्रवाशांनी सहकार्य करावं, असं आवाहन सरनाईक यांनी केलं आहे.
****
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल - ई डब्ल्यू एस घटकातल्या विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात EWS प्रमाणपत्र सादर केलं नसेल, तरी अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून हे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
****
भंडारा इथल्या आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन आठ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जखमी झाले. कंपनीमध्ये काम सुरू असताना काल सकाळी हा स्फोट झाला. स्फोट झालेली इमारत संपूर्णतः जमीनदोस्त झाली असून या मलब्याखाली दबलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
****
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्रात आतापर्यंत आणलेली गुंतवणूक आणि त्यातून निर्माण झालेले रोजगार यावर एक श्वेतपत्रिका काढावी, असं आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत होते. राज्यात येणाऱ्या मोठी गुंतवणुकीचं स्वागतच केलं पाहिजे, मात्र केलेले करार आणि वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
****
देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करतील. सायंकाळी ७ वाजेपासून आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन राष्ट्रपतींचं संबोधन हिंदी आणि इंग्रजी भाषेतून प्रसारित करण्यात येईल.
****
देशभरात आज पंधरावा मतदार दिन साजरा केला जात आहे. नथिंग लाइव वोटिंग, आय वोट फोर श्योर'' हा या वर्षाच्या मतदार दिनाचा विषय आहे. या औचित्यानं आज नवी दिल्लीत आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू सहभागी होतील. निवडणुक प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्य तसंच जिल्ह्याधिकाऱ्यांना सर्वोत्तम प्रक्रिया पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या गौरवण्यात येणार आहे.
दरम्यान, मतदार दिनानिमित्तानं आज सर्वत्र मतदार जनजागृती फेऱ्यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
संरक्षण मंत्रालयाच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून अंकुश चव्हाण यांनी नुकताच पदभार स्वीकारला. चव्हाण यांनी केंद्रीय संचार ब्यूरो आणि मुंबई दूरदर्शनसह विविध पदांवर १५ वर्ष कार्य केलं आहे. त्यांच्याकडे सोलापूरचं केंद्रीय संचार ब्यूरो, तसंच पुण्यातला प्रकाशन विभाग या दोन कार्यालयांचा अतिरिक्त प्रभारही सोपवण्यात आला आहे.
****
बेटी बचाओ - बेटी पढाओ योजना दशकपूर्ती अभियानाअंतर्गत परभणी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीने पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं काल महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी विषयी जनजागृती आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आल्याचं उपस्थित महिलांनी सांगितलं.
‘‘माझं नाव मनिषा अंबादास चापके. कात्नेश्वर येथील ग्राम पंचायत सदस्य आहे मी. आमच्या शाळेमध्ये भरपूर कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाअंतर्गत आम्हाला माहिती सांगण्यात आली. महिलांच्या आरोग्याविषयी, आर्थिक सक्षमीकरण याबाबत आम्हाला माहिती सांगण्यात आली.’’
‘‘माझं नाव शुभांगी अंकुश चापके. आज आम्हाला महिला सक्षमीकरण या विषयावर खूप चांगली माहिती देण्यात आली. मला सी एम जी पी याबद्दल माहिती नव्हती. मला खूप चांगल्या प्रकारची माहिती भेटली. आणि मी कागदपत्रं तयार करत आहे. आणि याच्यावर मी माझा नवीन उद्योग सुरू करणार आहे.’’
****
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतल्या कर्तव्य पथावर नियोजित सोहळ्यासाठी बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातल्या आवरगाव ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच, अमोल सर्जेराव जगताप तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या खानापूर चित्ताचे सरपंच राम जाधव यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला,
‘‘आम्ही ग्रामीण भागामध्ये चांगलं उल्लेखनीय काम केलेलं आहे. ग्राम पंचायतचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. वेगवेगळे पुरस्कार आम्ही ग्राम पंचायतच्या माध्यमातून प्राप्त केलेले आहेत. सर्व प्रकारच्या सुविधा आम्ही गावासाठी उभ्या केलेल्या आहेत. स्वच्छ, सुंदर व हरित गाव आम्ही निर्माण केलेलं आहे. हे सर्व काम पाहून आम्हाला भारत सरकारने आमंत्रित केलं, त्याचा खूप आनंद आहे.’’
‘‘मला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या लाल किल्ला येथील समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून माझी निवड झालेली आहे. या सन्मानासाठी मी भारत सरकार यांचा खूप खूप आभारी आहे.’’
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या सायाळ इथले प्रगतिशील आणि सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करणारे शेतकरी रत्नाकर ढगे हे देखील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी काल दिल्लीला रवाना झाले.
****
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात परवा झालेल्या ४ हजारांहून अधिक कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यु बर्ड फ्लु मुळे झाला नसल्याचं तपासणी अहवालात स्पष्ट झालं आहे. काही दिवसांपूर्वी उदगीरमध्ये काही कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचे निष्पन्न झालं होतं, या पार्श्वभूमीवर पशू संवर्धन विभागाने कोंबड्यांच्या पिल्लांच्या मृत्युनंतर तातडीने तपासण्या केल्या होत्या.
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील सर्व लहान-मोठे कुक्कुट प्रक्षेत्र, घोड्याचे तबेले आणि वराह प्रक्षेत्राची नोंद करण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी केलं आहे.
****
राज्य शासनाच्या वतीने रस्ता सुरक्षा माह राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरीकांना काळजीपूर्वक वाहन चालवण्याचं आवाहन केलं आहे.
‘‘रस्त्यावर वाहन चालवताना पूर्ण खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी. वाहनांची नियमित तपासणी करावी. त्याचबरोबर कोणतंही नशापान करून वाहन चालवू नये. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांचे जे वाहन आहेत, त्या वाहनांची सुद्धा नियमित तपासणी करावी. त्या गाडीवर असलेले जे वाहनचालक आहेत, त्यांच्यासुद्धा आरोग्य तपासणीचा कार्यक्रम संस्थांनी घ्यावा. धन्यवाद.’’
****
हिंगोली शहरालगत बळसोंड भागात मांडूळाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने काल अटक केली. त्यांच्याकडून एक मांडूळ साप जप्त करण्यात आला. अटक केलेल्या पाच जणांपैकी तिघेजण वाशिम जिल्ह्यातील आहेत, या प्रकरणी वन्यजीव अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
****
धाराशिव जिल्ह्यातील आत्तापर्यंत नोंदणी केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी केवळ २१ टक्के शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राहिलेल्या ७९ टक्के शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करता यावी, यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या पडेगाव ग्रामपंचायतीने उभारलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक अभ्यासिकेचं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काल उद्घाटन झालं.
****
No comments:
Post a Comment