Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 25 January 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. मराठीचे शिक्षक म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केलेले चपळगांवकर यांनी, ७० च्या दशकात बीड इथं वकिली केली, आणि ८० च्या दशकात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९९९ साली न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतरही ते साहित्य क्षेत्रात अखेरपर्यंत सक्रीय राहिले. माजलगाव इथं झालेलं मराठवाडा साहित्य संमेलन तसंच वर्धा इथं झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासह विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं त्यांनी भुषवली होती. चपळगांवकर यांची अनंत भालेराव-काळ आणि कर्तृत्व, कर्मयोगी संन्यासी, कहाणी हैदराबाद लढ्याची, कायदा आणि माणूस, विधीमंडळ आणि न्यायसंस्था, मनातली माणसे, संस्थानी माणसे, हरवलेले स्नेहबंध, आदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, यासह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र ज्ञान महामंडळानं, चपळगांवकर यांची समग्र माहिती देणाऱ्या एका संकेतस्थळाचं नुकतचं लोकार्पण केलं आहे. चपळगांवकर यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना आदरांजली वाहिली आहे, चपळगावकर यांच्या निधनानं सामाजिक मुद्यांवर परखड भाष्य करणारा कृतीशील विचारवंत हरपला आहे, त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, वैचारिक चळवळीची हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी शोक व्यक्त केला. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात आज पहाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामध्ये जीवित किंवा मालमत्तेचं कोणतंही नुकसान झालं नाही. राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २ पूर्णांक ४ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू दुंडा तहसीलमधील खुरकोट आणि भरणगाव वनक्षेत्र होते. काल सकाळीही उत्तरकाशीमध्ये दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते.
****
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होत असलेले राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे एनसीसीचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि चित्ररथांच्या कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी संवाद साधला. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व नागरिकांनी अत्यंत जबाबदारीनं आपापली कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सर्वच सहभागींनी विविध राज्यांच्या लोकांशी संवाद साधून एक भारत श्रेष्ठ भारत भावनेला बळकटी द्यावी, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगरसह राज्यात वीस शहरांमध्ये सहाशेहून अधिक ठिकाणी ई-वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक कचरा संकलनाचा मोठा उपक्रम राबवला जाणार आहे. यात मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी आणि बीड या शहरांचा समावेश आहे. ई-कचरा निर्मितीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. २०२१-२२ मध्ये देशात १६ लाख टन ई-कचरा तयार झाला होता. शिसं, पारा, कोबाल्ट, निकेल असे यातले रासायनिक घटक मानवासाठी आणि पर्यावरणासाठी घातक ठरतात. त्यांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट आणि पुनर्वापर हा त्यावरचा उपाय आहे. ही बाब लक्षात घेऊन, पुण्यातल्या पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशननं काही संस्थांच्या मदतीनं ई-यंत्रण नावाची व्यापक ई-कचरा संकलन मोहीम आखली आहे. उद्या प्रजासत्ताक दिनी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत या ठिकाणच्या सहाशेहून अधिक केंद्रांवर नागरिकांकडून ई-कचऱ्याचं संकलन केलं जाणार आहे.
****
नांदेड इथल्या श्री सचखंड गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांच्या सेवेला २५ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त आज नांदेड इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी नऊ वाजता श्री अखंड पाठ साहिबची समाप्ती होईल. सायंकाळी श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवनमध्ये विशेष गुरुमत समागम, सन्मान सोहळा आणि आभार कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांमध्ये देश विदेशातील संत महापुरुष, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी सहभागी आहेत.
****
भारत आणि इंग्लंड संघात दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज होणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम् मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना होईल.
****
No comments:
Post a Comment