Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
• छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचाण्णवावी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी.
• राज्यभरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद.
• शिवरायांचा सकलजनवाद हा खरा महाराष्ट्रधर्म-लेखक डॉक्टर प्रकाश पवार यांचं प्रतिपादन.
• पुणे ते दिल्ली धावत्या रेल्वेत ‘मराठी साहित्ययात्री संमेलनाला’ प्रारंभ.
आणि
• नवव्या आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचाण्णवावी जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे. शिवाजी महाराजांचं शौर्य आणि न्यायबुद्धी तसंच त्यांच्या असामान्य नेतृत्वानं रचलेला स्वराज्याचा पाया, यांनी पुढच्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईत राजभवनात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यालाही राज्यपालांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मुंबई महानगरपालिकेनं क्रीडा भवन इथे घेतलेल्या शिवजयंती उत्सवात राज्यपाल सहभागी झाले.
****
शिवजयंतीचा मुख्य सोहळा पुण्यात साजरा झाला. किल्ले शिवनेरीवर झालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरता मंदिरांपेक्षाही मोठे असून त्यांच्या जतन आणि संवर्धनाचं काम राज्य शासनाच्या वतीनं सातत्यानं सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. स्वतंत्र आणि आत्माभिमानी भारत आज आपण पाहतो आहोत, त्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेऱणा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं, ते म्हणाले..
आज आपण स्वतंत्र भारत पाहतोय. आत्माभिमानी अशा प्रकारचं एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश आपण पाहतोय. याच्या पाठीशी कोण असेल तर ती छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहे. राज्यकारभार कसा चालवायचा याची जी मानवता त्यांनी सांगितली आहे. आपल्याला कल्पना आहे. ते केवळ योद्धे नव्हते तर उत्तम प्रशासक होते. पर्यावरण असेल, जलसंवर्धन असेल, जंगल संवर्धन असेल, वेगवेगळ्या प्रकारचं संवर्धन असेल या सगळ्या व्यवस्थापन शास्त्राचे गुरु हे छत्रपती शिवराय होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं. तर, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.
****
पुण्याजवळ आंबेगाव इथं उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
शिवजयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. पुण्यात काढण्यात आलेल्या पदयात्रेत, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगडावरही सुमारे तीन हजार शिवप्रेमींच्या उपस्थितीसह ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक परिसरातून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, यांच्या हस्ते शिव प्रतिमेचं पूजन करुन पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.
****
नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह शेकडो विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले.
****
जालन्यात काढण्यात आलेल्या जय शिवाजी जय भारत पदयात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विविध क्षेत्रातले मान्यवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली इथे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं
****
लातूर इथे जय शिवाजी, जय भारत पदयात्रेत ढोल-ताशांच्या तालावर विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम आणि झांज पथकांनी केलेल्या सादरीकरणांनी उपस्थितांची मनं जिंकली.
****
धाराशीव इथं “जय शिवाजी जय भारत पदयात्रा” उत्साहपूर्ण वातारणात पार पडली. शहरातल्या विविध शिक्षण संस्थांमधले सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी झाले.
****
शिवरायांचा सकलजनवाद हाच खरा महाराष्ट्रधर्म असल्याचं प्रतिपादन राजकीय भाष्यकार आणि ’सकलजनवादी शिवराय’ या ग्रंथाचे लेखक डॉक्टर प्रकाश पवार यांनी केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त झालेल्या व्याख्यानात ते आज बोलत होते. युरोपियन आणि मोगलांची विचारसरणी हिंसेचं गौरवीकरण करत होती, त्यावेळी महाराजांनी वाटाघाटी, चर्चा आणि संवादाद्वारे सर्वसामान्य रयतेची मतं राज्यकारभारात आणली, असं मत डॉक्टर पवार यांनी यावेळी मांडलं.
****
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या 'सेवांकुर भारत : वन वीक फॉर द नेशन' या लघुपटाचं प्रकाशन करण्यात आलं, प्रत्येकानं एक आठवडा राष्ट्रकार्यासाठी दिल्यास देशाला गतवैभव प्राप्त होईल, असं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं.
****
शासनातर्फे मुंबईत इंदू मिल इथे उभारण्यात येणार असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साडेतीनशे फूट उंचीच्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीच्या कामाची पाहणी आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली. शिरसाट यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगती, इत्यादींचा आढावा घेऊन शिल्पकार राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
****
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात लाखो भाविकांचा ओघ सुरू आहे, आज दुपारी बारापर्यंत सुमारे पासष्ट लाख लोकांनी पवित्र संगमावर स्नान केलं. संक्रांतीपासून आतापर्यंत छप्पन्न कोटी बारा लाख भाविकांनी महाकुंभात पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आरबीआय-डेटा, या नावाचं एक मोबाईल ॲप सुरू केलं आहे. या ॲपवरून लोकांना भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित व्यापक आकडेवारी मिळू शकेल. या ॲपच्या मदतीनं नागरिकांना त्यांच्या आसपासच्या वीस किलोमीटर परिघातल्या बँकिंग सुविधांची माहितीही मिळू शकणार आहे.
****
दिल्ली इथं होत असलेल्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आयोजित पुणे ते दिल्ली ‘मराठी साहित्ययात्री संमेलनाला’ आजपासून प्रारंभ झाला. पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान धावत्या रेल्वेत हे संमेलन होत आहे. या विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचं नाव देण्यात आलं असून, रेल्वेच्या डब्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची नावं देण्यात आली आहेत. ढोल-ताशा, मृदुंग आणि टाळपथकांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन तसंच महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर या पुण्यातून ही रेल्वे निघाली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनीही या विशेष रेल्वेत साहित्यिकांसोबत प्रवास केला.
दरम्यान, दिल्ली इथं होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी आपलं मत व्यक्त केलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी, अशा घोषणेनंतर जाहीर होणारा विशेष निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा भालेराव यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
साहित्य महामंडळ दरवर्षी महाराष्ट्राबाहेर जी संमेलन घेतं, त्यापाठीमागचा उद्देश हा असतो की ज्या मराठी भाषीक लोकांना आपण मराठी भाषेत त्यांच्यासोबत आहोत असं वाटावं. इथ जास्तीत जास्त परप्रांतीय इतर भाषीक लेखक कार्यक्रमाला येतील आणि त्याच्यासमोर मराठी भाषेचं वैभव कस जाईल याचा वेगळा विचार महामंडळाने करावा असं मला वाटतं. देशाचं सर्वोच्च नेतृत्व पंतप्रधान स्वत: उद्घाटनासाठी येत आहेत. जर त्यांनी स्वतंत्र निधीची तरतूद केली, काही वेगळे उपक्रम सुरु केले तर कदाचीत काही फरक पडेल, नाही तर नुसतच मराठी भाषेला दर्जा दिल्याचं प्रमाणपत्र देऊन त्याचा फारसा भाषेसाठी उपयोग होणार नाही. पण तशी निधीची तरतूद करतील अशी अपेक्षा आपण करुयात.
****
नवव्या आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. पाकिस्तान आणि दुबईत या स्पर्धेतले सामने होत असून, आज पहिला सामना कराची इथं पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघादरम्यान सुरू आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या ४४ षटकांत चार बाद २४० धावा झाल्या होत्या.
दरम्यान या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना उद्या दुबईत बांग्लादेशविरुद्ध होणार आहे.
****
मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईच्या खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. मुंबई संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून मिलिंद रेगे यांची ओळख होती.
****
No comments:
Post a Comment