Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
• नवी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन.
• उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभ तसंच संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचं उद्घाटन.
• राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात, जालना जिल्ह्यात पेपर फुटल्याची बातमी चुकीची असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा.
आणि
• महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना आजपासून नांदेड इथं सुरुवात.
****
नवी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. विज्ञान भवनात सुरु असलेल्या या कार्यक्रमात संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, ९७व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे, निमंत्रक संजय नहार, उपस्थित आहेत.
भाषा बोलली तर ती जिवंत राहते, कारण भाषा ही जैविक गोष्ट आहे, भाषा ही जोडणारी गोष्ट असली पाहिजे, असं तारा भवाळकर यांनी यावेळी भाषेची महती सांगताना नमूद केलं. एक स्त्री साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही, तर गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा असल्याचं त्यांनी सांगितलं.
विविध प्रादेशिक भाषांबद्दल पंतप्रधान संवेदनशील असतात, असं उषा तांबे यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं. मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं अधिक जवळ आणणारं हे संमेलन असून, इतर भाषिकांच्या सूचनाही यात विचारात घेतल्या जातील, असं त्यांनी सांगितलं.
महिला साहित्यिकाला संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला याबद्दल आनंद व्यक्त करत असल्याचं, शरद पवार यावेळी म्हणाले.
काश्मीरी गायिकेनं गायलेलं महाराष्ट्र राज्यगीत या उद्घाटन सोहळ्याचं आकर्षण ठरलं.
संमेलनानिमित्त आज सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. त्यात विविध साहित्यिक, राजकारणी, साहित्य प्रेमी, चित्ररथ सहभागी झाले होते.
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचं दुसरं उद्घाटन सत्र होणार आहे. त्यात गेल्या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि या संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांचं भाषण होईल.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे.
दरम्यान, पीएम उषा प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या चार इमारतींचं आभासी पद्धतीनं भूमिपूजन, आणि संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेत आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटनही उपराष्ट्रपती करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात वेरुळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिरालाही उपराष्ट्र्पती भेट देणार आहेत.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पश्चिम क्षेत्रीय परिषदेची सत्ताविसावी बैठक होणार असून, दुपारी ते जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी, बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात शहा यांच्या उपस्थितीत, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना, या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. यंदा राज्यातल्या पाच हजार १३० मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून, १६ लाख ११ हजार ६१०विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याची बातमी चुकीची असल्याचा खुलासा, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केला आहे. याठिकाणी काही स्थानिक झेरॉक्स दुकानदारांनी काही बनावट प्रश्नपत्रिका विकल्याचं आणि खरी प्रश्नपत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर न आल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले…
दहावीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करुन देण्यात आली अशी बातमी प्रसार माध्यमांवर होती, तर त्या बातमीमध्ये तथ्य नाहीये. सर्वच केंद्रावरीत जालन्यामध्ये कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आणि तो रेजिस्टंट मध्ये काही लोकांनी तेथे विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही.
मात्र, पेपर कॉपीमुक्त ठेवण्यासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्याशी काही पालकांनी वाद घातल्याचं आणि या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात १५३ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होत असून, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरता सात भरारी पथकांसह १५६ बैठे पथक नियुक्त केले आहेत. विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी याकरता स्वच्छ आणि मोकळी हवा येईल असे परीक्षा केंद्र निवडण्यात आले आहेत.
****
राज्यातल्या खेळाच्या मैदानांचा फक्त खेळासाठीच वापर व्हावा; तसंच या मैदानांमध्ये खेळाडूंसाठी स्वच्छतागृहं आणि चेंजिंग रूम उभारण्याच्या सूचना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. मुंबईतल्या ओव्हल, आझाद आणि क्रॉस मैदानातल्या भूखंडांच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक नवीन धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा एसटी भाड्यात सवलत, अशा कुठल्याही योजना बंद होणार नाहीत, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली.
****
मुंबई उच्च न्यायालयात तीन अतिरिक्त स्थायी न्यायमूर्तींच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं मंजुरी दिली आहे. यामध्ये न्यायमूर्ती शैलेश प्रमोद ब्रह्म, फ़िरदोश फिरोज पूनीवाल आणि जितेंद्र शांतिलाल जैन यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांचा कार्यकाळ एक वर्ष वाढवायलाही कॉलेजियमनं मंजुरी दिली.
****
छत्रपती संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर न काढल्याबद्दल महाराष्ट्र सायबर विभागानं विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विकिपीडियाचं संपादन करणाऱ्या, कॅलिफोर्निया इथल्या विकिमीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवूनही हा मजकूर हटवण्यात न आल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर विभागानं दिली आहे.
****
सहायक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा-सेट, येत्या १५ जूनला होणार असून, या परीक्षेसाठी २४ फेब्रुवारीपासून अर्ज करता येणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने ही माहिती दिली. उमेदवारांना २४ फेब्रुवारी ते १३ मार्च या दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाद्वारे अर्ज भरता येणार आहेत. तर, विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १४ ते २१ मार्च अशी मुदत देण्यात आली आहे.
****
महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना आजपासून नांदेड इथं सुरुवात झाली. श्री गुरूगोविंद सिंघजी क्रीडा संकुलात राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं. तर, खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कोणत्याही राज्याची, जिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरते, महसूल कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे आणि दर्जेदार कामांमुळे देशात महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली असल्याचं, राजेशकुमार यावेळी म्हणाले. अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना, कर्मचाऱ्यांवरील ताण तणाव हलका करण्यासाठी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा उपयोगी पडत असल्याचं सांगितलं.
येत्या तेवीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांसाठी महसूल विभागाचे सुमारे अडीच हजार कर्मचारी नांदेडमध्ये आले आहेत. यामध्ये क्रीडा स्पर्धांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद तालुक्यात शिवजयंतीच्या औचित्यानं प्राचीन शिवकालीन तलावातला गाळ काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, या योजनेतून वेरूळ इथल्या डमडम तलावात हे काम सुरू झालं असून, ज्या शेतकऱ्यांना शेतासाठी गाळ पाहिजे असेल,त्यांनी तो घेऊन जावा, असं प्रशासनानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या बसस्थानकात आज दुपारी चालकाचे नियंत्रण सुटल्यानं एक बस अचानक प्रवासी उभे असलेल्या प्लॅटफॉर्मवर चढली. या घटनेत एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला, तर पाचजण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
लातूर जिल्ह्यात साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळानं वर्ष २०२४-२५ करता थेट कर्ज योजनेसाठी प्रस्ताव मागवले आहेत. या योजनेसाठी मातंग समाजातल्या इच्छुक लाभार्थ्यांनी येत्या पाच मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment