▼

Friday, 21 February 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.02.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 21 February 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २१ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त आज सकाळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनाचं उद्घाटन दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर यांच्यासह संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील. तालकटोरा क्रीडा संकुलातल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात, मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कवी संमेलन, विविध परिसंवाद, असे कार्यक्रम होणार आहेत.

या साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करत एकूण चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

****

एकोणिसावं अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन आजपासून छत्रपती संभाजीनगर इथल्या आमखास मैदानावर सुरू होत आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक राणा या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचं उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले उपस्थित होते. येत्या दोन मार्च पर्यंत चालणा-या या महोत्सवात मराठीसह बंगाली, तामिळ, इंग्रजी, अशा वेगवगळ्या भाषांमधल्या नाटकांचं सादरीकरण होणार आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगाव इथे संत श्री गजानन महाराजांचा १४७ वा प्रगट दिन उत्सव साजरा झाला. तेरा फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या महोत्सवात काकडा, गाथा, भजन, प्रवचन, हरिपाठ, हरिकीर्तन यासह विविध धर्मिक कार्यक्रम झाले. यावर्षी प्रगट दिन उत्सवात १००१ दिंड्यांनी सहभाग घेतल्याचं आणि जिल्हाभरातल्या मंदिरांमध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे एकतीस लाख लोकांनी पवित्र स्नान केलं. उत्तर प्रदेशातल्या विविध कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांनाही आता महाकुंभाचं पवित्र स्नान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या या उपक्रमाअंतर्गत, प्रयागराजमधल्या त्रिवेणी संगमाचं पवित्र पाणी कैद्यांना कारागृहाच्या आवारातच उपलब्ध करून देण्यात येत आहे.

दरम्यान,महाकुंभाच्या शेवटच्या आठवड्यात, प्रवासी वाहतुकीत झालेली वाढ नियंत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वेनं तयारी केली आहे. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून स्थानकांच्या बाहेर अतिरिक्त  विशेष व्यवस्था तयार करण्यात आली असून, प्रवाशांना त्यांच्या गाड्यांच्या सुटण्याच्या नियोजित वेळेनुसार स्थानकावर प्रवेश दिला जात आहे.

****

२३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल एका सांगता झाली. या महोत्सवात जागतिक चित्रपट स्पर्धेमध्ये हाल्फदान उलमन तोंडेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नॉर्वेच्या ‘आरमंड’ या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचं महाराष्ट्र शासनाचं ‘प्रभात’ पारितोषिक मिळालं; तर संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचं पारितोषिक रावबा गजमल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सांगळा’ या चित्रपटाला मिळालं. मराठी चित्रपट महामंडळाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचा पुरस्कार 'स्नो फ्लॉवर' या चित्रपटासाठी गजेंद्र अहिरे यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अनिल दाभाडे यांना तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार छाया कदम यांना जाहीर करण्यात आला.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पश्चिम क्षेत्रीय परिषदेची सत्ताविसावी बैठक होणार असून, दुपारी ते जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी, बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात शहा यांच्या उपस्थितीत, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना, या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण, तसंच वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे.

****

लातूर शहर महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्‍यांसाठी शासनामार्फत बावीस कोटी रुपयांचा निधी प्राप्‍त झाल्यामुळे लातूर शहरातल्या सर्व लाभार्थीना महानगरपालिकेमार्फत दोन दिवसात निधी वाटप करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आलेला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिका-यांशी संपर्क साधून या निधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन लातूर महानगरपालिकेचे आयुक्‍त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे.

****

मध्य आसामच्या वर चक्रीवादळाची स्थिती उत्पन्न झाल्यामुळे देशाच्या ईशान्य भागात आज विजा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

No comments:

Post a Comment