Thursday, 27 February 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.02.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 27 February 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ फेब्रुवारी २०२ सकाळी .०० वाजता.

****

मराठी भाषा गौरव दिन आज साजरा होत आहे. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यविश्वात दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता म्हणून, २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस, “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन केलं असून, राज्यातल्या जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "मायमराठी जपा, सन्मान करा, संस्कृतीचं संवर्धन करा", असं त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नाशिकच्या शिरवाडे वणी इथं "कवितेचे गाव" साकार होत असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. याठिकाणी कुसुमाग्रजांचं साहित्य, कविता आणि अन्य थोर साहित्यिकांचं लेखन संग्रहित केलं जाणार आहे.

****

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याची काल सांगता झाली. मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या या महाकुंभामध्ये ६६ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केलं. भारतीय वायु दलानं घाटांवर पुष्पवृष्टि करुन भाविकांना संस्मरणीय आनंद दिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व भाविक, संत आणि कल्पवासी यांना शुभेच्छा दिल्या. भाविकांनी संपूर्ण जगाला राष्ट्रीय एकता आणि समर्पणाचा संदेश दिला असल्याचं ते म्हणाले. महाकुंभ २०२५ हा इतिहासातील अध्यात्मिकता आणि मानवी संमेलनाचं एक सर्वात मोठं केंद्र ठरला. महाकुंभ पर्वात देशाचे सांस्कृतिक बंध दृढ करण्यात प्रसारभारतीनं महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत सेहगल यांनी म्हटलं आहे.

****

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओ आणि भारतीय नौदलानं ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरून, पहिल्याच नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या उड्डाण चाचणी घेतली. या चाचण्यांमधून भारतीय नौदलाच्या सीकिंग हेलिकॉप्टरमधून जहाजावर क्षेपणास्त्र टाकण्याची क्षमता सिद्ध झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ, भारतीय नौदल आणि उद्योगांचं अभिनंदन केलं. या चाचण्यांमुळे क्षेपणास्त्राचे मॅन-इन-लूप वैशिष्ट्य सिद्ध झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे.

****

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये केंद्र सरकारनं कपात केल्याचा काँग्रेसचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला आहे. अल्पसंख्याक, मागासवर्गीय इत्यादी विविध शिष्यवृत्या केंद्र सरकारनं कमी केल्याचा आरोप कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला होता. मात्र केंद्र सरकारनं अल्पसंख्याकांचं कधी नव्हे इतकं सक्षमीकरण केलं असून, शिष्यवृत्ती, संधी आणि पारदर्शकतेत वाढ झाली असल्याचं रिजिजू यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आर्थिक मदत देण्यासाठीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारनं सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. पॅरिस ऑलिंपिकनंतर, एक नवीन ऑलिंपिक चक्र सुरू झालं आहे, त्यामुळे बदलती परिस्थिती लक्षात घेता निकषांचा आढावा घेण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचं, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं सांगितलं. समिती १५ दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करेल.

****

आसाममध्ये आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर पाच क्षमतेच्या या भूकंपाचे धक्के राज्यात सर्वत्र जाणवले. हा सर्व भाग भूकंप प्रवण क्षेत्रात असून मंगळवारी बंगालच्या उपसागरात पाच पूर्णांक एक क्षमतेचा धक्का बसला होता.

****

उत्तराखंडमधल्या गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे येत्या तीस एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उघडण्यात येणार आहेत. काल महाशिवरात्रीला याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. केदारनाथ धामाचे दरवाजे येत्या दोन मे रोजी सकाळी सात वाजता तर बद्रिनाथाचे दरवाजे येत्या चार मे ला उघडणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात आग्यामोहोळाने केलेल्या हल्ल्यात भास्कर खिल्लारे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. सेनगाव तालुक्यातल्या बाभूळगाव शिवारात काल सकाळी ही घटना घडली.

****

चंद्रपूर जिल्ह्यात काल दोन स्वतंत्र घटनांमध्ये सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. राजुरा तालुक्यात वर्धा नदीवर अंघोळीसाठी गेलेले तीन युवक नदीपात्रात बुडाले, तर दुसऱ्या घटनेत सावली तालुक्यात तीन सख्ख्या बहिणी वैनगंगा नदीच्या पात्रात बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आयसीसी पुरुषांच्या चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं अफगाणिस्ताननं इंग्लंडवर आठ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी ३२६ धावांचं आव्हान पेलताना इंग्लंडचा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत सर्वबाद ३१७ धावा करु शकला. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झदरान यानं या स्पर्धेतल्या विक्रमी १७७ धावा केल्या. या पराभवामुळे इंग्लंडचा संघ या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. स्पर्धेत अद्याप एकही सामना न जिंकलेल्या पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात अंतिम गट सामना आज रावळपिंडी इथं होणार आहे.

****

No comments:

Post a Comment