Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 23 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मार्च
२०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
नागपूर इथं
शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे
निर्देश
·
कांदा निर्यातीवरचं २० टक्के शुल्क एक एप्रिलपासून हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
·
म्हैसमाळ इथं सी-डॉप्लर रडार लवकरच कार्यान्वित करणार-खासदार डॉ भागवत
कराड
·
पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सावाची काल्याच्या
कीर्तनाने सांगता
आणि
·
आएपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स
बंगळुरूचा कोलकाता नाईट रायडर्सवर विजय; खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या
खेळाडुंची काल चार सुवर्ण पदकांची कमाई
****
नागपुर इथं शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले
आहेत. ते काल नागपूर इथं आढावा बैठकीत बोलत होते. या दंगलीमध्ये मालमत्ता तसंच वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
झालं असून, या नुकसानासंदर्भात पंचनामे करुन येत्या तीन ते चार दिवसात
नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. दंगलखोरांच्या
मालमत्तेची विक्री करुन, संपूर्ण नुकसान भरपाई दंगलखोरांकडून वसुल
करण्यात येईल, यासाठी महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागातर्फे संयुक्त कारवाई
करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करून दंगल भडकण्यास कारणीभूत ठरलेल्यांवरही कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. ते म्हणाले..
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
कांदा निर्यातीवरचं २० टक्के शुल्क एक एप्रिलपासून हटवण्याचा
निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या
महसूल विभागानं जारी केलं. १३ सप्टेंबर
२०२४ पासून हे शुल्क आकारण्यात येत होतं. चालू आर्थिक
वर्षात १८ मार्चपर्यंत साडेअकरा लाख मेट्रीक टनांहून अधिक कांद्याची
निर्यात झाली आहे. लासलगाव आणि पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या महिन्यात कांद्याची
आवक वाढल्यानं दर कमी झाले आहेत.
****
राज्यात साखरेचं उत्पादन घटल्यानं साखर कारखान्यांपुढे
अनेक प्रश्न उभे राहिले आहेत, असं राष्ट्रीय सहकारी कारखाना संघाचे
अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं
आहे. ते काल पुण्यात बोलत होते.
त्यासंदर्भात लवकरच
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा
यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्याकरता
विनंती करणार असल्याचं पाटील म्हणाले.
****
लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर कमी लोकसंख्येच्या राज्यांना, अधिक लोकसंख्येच्या राज्यांच्या तुलनेत कमी प्रतिनिधीत्व मिळेल, अशी शक्यता सुळे यांनी वर्तवली.
****
केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळातर्फे महाराष्ट्र वीज महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण कंपनी म्हणून गौरवण्यात आलं. नवी दिल्लीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
****
हवामानाचा अचुक अंदाज घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या म्हैसमाळ इथं लवकरच सी-डॉप्लर रडार कार्यान्वित
करण्यात येणार असल्याची माहिती, खासदार डॉ भागवत कराड यांनी दिली. ते काल छत्रपती
संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हे रडार बसवण्यासाठी वन विभागाने जागा उपलब्ध करून दिली असून, हे देशातलं
४०वं रडार असेल. डॉप्लर बसवल्यानंतर चारशे किलोमीटरपर्यंत त्रिज्येचं हवाई
अंतर स्कॅन केलं जाणार असल्याची माहिती, कराड यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथल्या औरंगजेबाच्या कबरीचा राष्ट्रीय स्मारक दर्जा रद्द करण्यासाठी नाशिक इथले
सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्र शासनाने
१९५१ मध्ये घेतलेल्या या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं असून, केवळ काही
अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे हा दर्जा देण्यात आला होता, हा निर्णय
घेताना तत्कालीन लोकप्रतिनिधींची संमती घेण्यात आलेली नव्हती, असं रतन लथ यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना २०२५साठीचा
‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुष्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.
सतीश देसाई यांनी काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा पुरस्कार प्रदान
सोहळा लवकरच होणार असून, यात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या
चार सैनिकांचा आणि एका वीरमातेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
****
जालना इथले सुप्रसिद्ध उर्दू शायर दिवंगत राय हरिश्चंद्र साहनी
यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा 'दु:खी राज्यकाव्य पुरस्कार' नाशिक इथले कवी-गीतकार प्रकाश होळकर यांना, तर ना. धों.
महानोर राज्य पुरस्कार कोल्हापूर इथले साहित्यिक रफीक सूरज यांना घोषित झाला आहे. काल जालना इथं या पुरस्कारांची
घोषणा करण्यात आली. येत्या गुढीपाडव्याला जालना इथं हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
प्रसिद्ध हिंदी लेखक, कवी आणि निबंधकार विनोद कुमार शुक्ल यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
झाला आहे. ८८ वर्षांचे शुक्ल, हा पुरस्कार मिळवणारे हिंदीतले बारावे, तर
छत्तीसगडचे पहिलेच साहित्यिक आहेत. ‘दीवार में एक खिडकी रहती थी’, ‘नौकर की कमीज’ ही कादंबरी आणि ‘सब कुछ होना बचा रहेगा’ हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहे.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सावाची काल काल्याच्या
कीर्तनाने सांगता झाली. यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज बेलदारवाडीकर यांचं काल्याचं
कीर्तन झालं. नाथसमाधी मंदीरात नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते काल्याची दहिहंडी फोडण्यात आली. हजारो भाविक यावेळी उपस्थित होते.
****
इंडियन प्रीमियर लीग - आएपीएल क्रिकेटच्या
१८व्या हंगामात काल सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता
नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला. कोलकाता इथं झालेल्या या सामन्यात, कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात आठ बाद १७४ धावा केल्या. प्रत्यूत्तरात बंगळुरुच्या संघाने हे लक्ष्य १७ व्या षटकात तीन गडी गमावत पूर्ण केलं.
****
नवी दिल्लीत सुरू
असलेल्या खेलो इंडिया पॅरा क्रिडा स्पर्धेत कालच्या
तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चार सुवर्ण आणि चार रौप्य पदकांची कमाई केली. भालाफेक मध्ये महिलांच्या गटात
भाग्यश्री जाधवने, पुरुषांच्या १००
मीटर धावण्याच्या
शर्यतीत प्रणव देसाईने, महिलांच्या थाळीफेक
प्रकारात अक्कुताई उलभागट ने आणि ४००
मीटर धावण्याच्या प्रकारात नाशिकच्या दिलीप गावित यांनी सुवर्णपदक जिंकलं.
****
वाचन संस्कृती लोप पावत नसून, काळाच्या गतीने धावण्यात आपण कमी पडत असल्याचं प्रतिपादन, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा ग्रंथोत्सवाचा काल समारोप झाला, त्यावेळी यांनी हे मत मांडलं,
बाईट - ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापुरकर
आमदार विक्रम काळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ग्रंथोत्सव चळवळीला बळ मिळावं, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं काळे यांनी सांगितलं. इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल ग्रंथोत्सवाला भेट दिली.
लातूर जिल्हा ग्रंथोत्सवाचाही
काल समारोप झाला. साहित्य समीक्षक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी यावेळी बोलतांना, डिजिटल माध्यमातून वाचन संस्काराचे क्षेत्र दिवसेंदिवस विकसित होत असल्याकडे लक्ष वेधलं.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने कर थकबाकी प्रकरणी
कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्यालय आणि सचिवांच्या दालनाला
काल सील ठोकलं. बाजार समितीकडे १० कोटी ३२ लाख ४७ हजार ४२३ रूपये कर थकलेला असल्यानं ही कारवाई करण्यात आली.
****
बीड इथं काल पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सामाजिक संपर्क माध्यमांवर आक्षेपार्ह व्हॉट्सअप स्टेटस, रिल्स, पोस्ट करणारे किंवा प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध
कायदेशीर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी आणि शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन कॉंवत यांनी केलं.
****
हिंगोली इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा
ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत काल कयाधू जिल्हास्तरीय सरस विक्री प्रदर्शनाला प्रारंभ झाला. यावेळी एक हजार ४१५ गटांना, तसंच स्वयं आधार
महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना एकूण १७
कोटी ३६ लाख रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले.
****
धाराशिव इथं काल जागतिक जलदिनानिमित्त जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. जलसंधारणाच्या
कामातून जिल्हा जलयुक्त करण्यासाठी सर्वांचा पुढाकार गरजेचा असल्याचं ते यावेळी म्हणाले.
****
बीड-गेवराई मार्गावर भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर पाच जण जखमी झाले.
****
No comments:
Post a Comment