Sunday, 23 March 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २३ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 23 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २३ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

भारताचं देशांतर्गत उत्पादन गेल्या दहा वर्षांत १०५टक्के वाढीच्या दरानं दुप्पट झालं

आहे. देशाचा जीडीपी २०१५ मध्ये दोन पूर्णांक एक दशांश ट्रिलियन डॉलरवरून २०२५ मध्ये चार पूर्णांक तीन दशांश ट्रिलियन डॉलर झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ही आकडेवारी जाहीर केली आहे. अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान नंतर जीडीपीच्या बाबतीत भारत आता जगातला पाचवा सर्वात मोठा देश बनला आहे. भारत लवकरच जपानला मागे टाकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

                                 ****

हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

                                 ****

गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात झालेल्या जिवीतहानीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या भागात वाघांचे हल्ले रोखण्यासाठी तीन महिन्यात आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यात, गेल्या पाच वर्षात वाघांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या नगिरकांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई, अतिरिक्त वाघांचं स्थलांतर आदींचा समावेश आहे. 

                                 ****

शासनाच्या विविध उपाययोजनांद्वारे मराठवाड्यावरील जलसंकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून  यात सगळ्यांचा सहभाग आवश्यक असल्याचं राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. जागतिक जल दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं शहरात पायी फेरी काढण्यात आली. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.याप्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाण्याच्या जपून वापराबाबत मार्गदर्शन करत जलसंवर्धनासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. विभागीय क्रीडा संकुल इथून सुरुवात होऊन संत गजानन महाराज मंदिर आणि  पुन्हा क्रीडा संकुल असा या फेरीचा  मार्ग होता. जल दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर, तसंच गंगापूर इथंही शेतकरी जलदुत समितीच्या वतीनं आज पायी जलदिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. 

                                 ****

तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं काल शिर्डीत उद्घाटन झालं. यानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदीर ते संमेलनस्थळापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. दिंडीची सांगता अश्व रिंगणानं झाली. समाज एकसंघ ठेवण्याचं सामर्थ्य संत विचारात असल्याचं राज्याचे  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केलं.वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित या संमेलनाला राज्यातून मोठ्या संख्येनं वारकरी- संत अभ्यासक उपस्थित आहेत. 

                                 ****

जिम्नॅस्टिक्स खेळात, भारताच्या प्रणिती नायक हिनं तुर्कीच्या अंताल्या इथं झालेल्या फेडरेशन इंटरनॅशनल डी जिम्नॅस्टिक - फिग विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या गटातलं कास्यपदक जिंकलं आहे. भारतातर्फे अशी कामगिरी करणारी प्रणिती पहिली खेळाडू आहे.

                                 ****

नवी दिल्लीत आयोजित  द्विव्यांगांच्या खेलो इंडिया क्रिडा स्पर्धेत काल तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी करत पाच सुवर्ण पदकं जिंकली आहेत. नेमबाजी- स्वरूप उन्हाळकर, भालाफेक - भाग्यश्री जाधव, पुरुष शंभर मीटर धावणे- प्रणव देसाई तर चारशे मीटर - दिलीप गावित  आणि  थाळीफेक -अक्कुताई उलभागट, यांनी सुवर्णपदक जिंकलं.

                                 ****

अठराव्या इंडियन प्रीमियर लीग - आएपीएल क्रिकेट स्पर्धेत काल पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. स्पर्धेत आज दुपारी साडेतीन वाजता सनराजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबाद इथं. तर,संध्याकाळी साडेसात वाजता चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडीयन्स यांच्यात चेन्नई इथं सामना खेळला जाणार आहे.

                                 ****

परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत त्यांच्याकडून चोरी केलेले सोयाबीनची दिडशे आणि हळदीची आठ पोती जप्त करण्यात आली. अटक केलेल्या चौघांवर जिल्ह्यातल्या विविध पोलिस पोलिस स्थानकात गुन्हे दाखल आहेत.

                                 **** 

छत्रपती संभाजीनगर इथं शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे काल बालगाव इथं पशुपालकांना शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात आली. किसान क्रेडिट कार्डची माहिती समजावून पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डचे अर्ज यावेळी वितरित करण्यात आले. 

                                 **** 

येत्या चोवीस तासांतील हवामानाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागांनं वर्तवली आहे. मात्र इतर हवामान कोरडं राहील.  

                                 ****

कृत्रिम बुद्धिमत्ता -ए.आय. तंत्रज्ञानानं कृषी उत्पादन खर्च कमी होवून, उत्पन्न वाढ होत असेल, तर या त्याला आमचा विरोध नाही. मात्र, हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना परवडणारं पाहिजे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील कृषी विज्ञान केंद्रावर ए.आय. तंत्रज्ञानाद्वारे केली जाणारी ऊस शेतीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

                                 **** 


No comments:

Post a Comment