Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यात भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील संजय केनेकर, नागपूर येथील संदीप जोशी यांच्यासह वर्ध्यातले दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
****
केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत फिट इंडिया महोत्सवाचं उद्घघाटन होत आहे. निरोगी आणि लठ्ठपणा मुक्त राष्ट्राच्या दृष्टिकोनातून सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देणं, हे या महोत्सवाचं उद्दिष्ट आहे. कार्यक्रमादरम्यान येत्या वीस तारखेपासून नवी दिल्लीत सुरू होत असलेल्या खेलो इंडियाच्या बोधचिन्ह आणि गीताचं अनावरणही यावेळी होईल.
****
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक जिल्हा न्यायालयानं दिलेल्या स्थगिती निर्णयाच्या विरोधात माजी न्यायाधीश सतीश वाणी यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी परवा मंगळवारपासून सुनावणी सुरु होईल.
****
सर्वसमावेशक असं ‘वाळू धोरण’ राज्य मंत्रिमंडळासमोर या आठवड्यात मांडण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. राज्यात लिलाव न झालेल्या तसंच ज्या ठिकाणी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे, अशा ठिकाणी वाळू घाट सुरू करण्याचा निर्णय, हे नवं वाळू धोरण मंजूर झाल्यावर घेतला जार्ईल असं ते म्हणाले. एम-सॅन्ड या योजनेत प्रत्येक जिल्ह्यात यंत्राद्वारे दगड बारीक करून वाळू तयार केली जाईल. या पर्यायी वाळूच्या उपलब्धतेमुळे नदीतल्या पारंपरिक वाळूची मागणी कमी होईल, असा दावा बावनकुळे यांनी केला.
****
देशाचा ईशान्य भाग इतर भागांशी जोडून विकास, शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. आसामच्या मिझोरममधल्या आसाम रायफल्स मुख्यालयाच्या स्थानांतर कार्यक्रमात ते बोलत होते. हे राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, गेल्या दहा वर्षात आसाममधले दहा हजारपेक्षा जास्त युवक शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात आले असून आसाम प्रगतीपथावर आहे, असंही गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. आसामच्याच गोलघाट जिल्ह्यातल्या डेरगाव इथं पोलिस अकादमीच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते.
****
छत्रपती संभाजीनगर परिमंडळात जवळपास चार लाख ग्राहकांकडे २१५ कोटी रुपयांची वीजदेयकं थकबाकी प्रकरणी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणनं सुरू केली आहे. या मोहिमेत वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची पडताळणीही करण्यात येत असून, अनाधिकृत वीज पुरवठा घेतल्याचं आढळल्यास थेट पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचा इशारा महावितरणच्या वतीनं देण्यात आला आहे.
****
बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेच्या ६४ सदस्यांनी काल तेलंगणात भद्रादी कोठागुडम् जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यात १६ महिलांचाही समावेश आहे. गेल्या दोन महिन्यात आत्मसमर्पण केलेल्यांची संख्या आता १२२ वर पोहोचली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मार्च रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १२० वा भाग असेल. नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना येत्या २८ मार्च पर्यंत १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
****
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करण्याच्या मागणीला काल झालेल्या अधिसभा सदस्यांच्या बैठकीत विरोध झाला. असा नामविस्तार झाल्यास त्याचं इंग्रजी लघुरुप वापरलं जाईल, त्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान होईल, असं मत अधिसभा सदस्यांनी मांडलं. कुलगुरुंनी नामविस्ताराच्या विरोधातला प्रस्ताव स्वीकारला.
****
देशभरात विविध ठिकाणी आज तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा चढलेला असून विदर्भात आगामी दोन दिवस उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
क्रिकेट
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी-ट्वेंटी स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि वेस्ट इंडीज संघात होणार आहे. छत्तीसगडच्या रायपूर इथं होणारा हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल.
****
महिला प्रीमियर लीग स्पर्धेचा किताब मुंबई इंडियन्सनं पटकावला आहे. मुंबईत कालच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर आठ धावांनी मात करत मुंबई इंडियन्सनं हे यश मिळवलं.
नाणेफेक जिंकून दिल्लीनं प्रथम क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर मुंबईनं वीस षटकांत सात बाद १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा डाव वीस षटकांत नऊ बाद १४१ धावांवर संपुष्टात आला.
****
इटलीच्या तुरीन इथं सुरू असलेल्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आणखी १५ पदक जिंकली आहेत. भारताच्या खात्यात आता २४ पदकं जमा झाली आहेत. दीपक ठाकूर आणि गिरीधर यांनी सुवर्णपदक तर अभिषेक कुमार, राधा देवी, जियारा पोर्टर यांनी रौप्य पदक जिंकलं.
****
No comments:
Post a Comment