Thursday, 6 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      यंदाचा जागतिक महिला दिन नारी शक्ती सह विकसित भारतया संकल्पनेवर साजरा करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय

·      तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने प्रशासनात पारदर्शकता येत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      भैयाजी जोशी यांच्या मराठीसंदर्भातल्या विधानाचे विधीमंडळात तीव्र पडसाद

·      महिलांना तक्रार करणं सुलभ होण्यासाठी महिला भवन उभारण्याची अमित देशमुख यांची मागणी

·      राज्यात बाईक टॅक्सी सेवेचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

आणि

·      मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्गमय पुरस्कार जाहीर-अजित दळवी यांना लोटू पाटील पुरस्कार

****

यंदाचा जागतिक महिला दिन 'नारी शक्ती सह विकसित भारत' या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज याबाबत घोषणा केली. या निमित्ताने नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका परिसंवादाचं आयोजनही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार विविध धोरणं आणि योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि लिंगभाव समानतेसाठी काम करत असल्याचंही अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे.

****

तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने प्रशासनात पारदर्शकता येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज ठाण्यात, स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स या विषयावरच्या चर्चासत्रात ते आज बोलत होते. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आपल्या कार्यक्षमतेतही वृद्धी करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले

(बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

****

भैयाजी जोशी यांनी मराठीसंदर्भात केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद आज विधीमंडळात उमटले, त्यावरून गदारोळ झाल्यानं, विधान परिषदेचं कामकाज वारंवार बाधित झालं. यासंदर्भात अनिल परब यांनी २८९ अन्वये चर्चेचा प्रस्ताव मांडला, तो सभापतींनी फेटाळून लावला, त्यावरून गदारोळ झाल्याने कामकाज दोन वेळा प्रत्येकी दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं, कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर भाई जगताप यांनी सभापतींच्या परवानगीने याच विषयावर मत मांडत जोशी यांच्यावर कारवाईची मागणी केली.

विधानसभेत भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईसह सगळ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच असल्याचं सांगत, इथे राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकून घ्यावी, हीच शासनाची भूमिका असल्याचं सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात सदनाबाहेर बोलतांना, जोशी यांनी माफी मागावी, असं म्हटलं तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशी यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली

(बाईट – आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे)

जोशी यांच्या या विधानाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुतात्मा स्मारकाजवळ निषेध केला, तसंच हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन ही मुंबई तुटू देणार नसल्याची शपथ घेतली.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जोशी यांच्या या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

****

दरम्यान भैयाजी जोशी यांनी आपल्या विधानावरून गैरसमज झाल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचा खुलासा, जोशी यांनी केला आहे

(बाईट – भैय्याजी जोशी)

****

विधान परिषदेत सकाळच्या विशेष सत्रात आज राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चा झाली. भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी प्रस्तावाच्या बाजूने तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रस्तावाच्या विरोधात भूमिका मांडली

****

राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग सुरू करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. टोरेस कंपनीकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.

****

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊ नये याची खबरदारी का घेतली नाही असा प्रश्न कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारला आहे. ते विधानसभेत पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत बोलत होते.

****

धान आणि कापूस उत्पादकांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक असून, मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

****

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्य अडचणी सोडवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचं कामकाज जास्तीत जास्त ऑनलाईन करण्याचा प्रयत्न असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितलं. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भर्ती झालेली नाही असंही दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं.

****

गाव आणि शहरात महिलांना तक्रार करता यावी यासाठी महिला भवन उभारावं अशी मागणी अमित देशमुख यांनी केली आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. महिलांना परिवहन विभागाच्या बसमधे मोफत प्रवासाची सुविधा द्यावी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवू नये, गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील लस मोफत उपलब्ध करावी, आदी मागण्याही देशमुख यांनी केल्या.

****

राज्यात बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ते आज विधान भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. यासाठीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, या माध्यमातून १० ते २० हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. ते म्हणाले

(बाईट – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक)

****

मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्गमय पुरस्कार आज जाहीर झाले. जालना इथले अण्णा सावंत यांच्या फुलटायमर या आत्मचरित्राला यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्गमय पुरस्कार जाहीर झाला असून, प्रसिद्ध नाटककार अजित दळवी यांना नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या २९ मार्चला छत्रपती संभाजीनगर इथं मसापच्या ना गो नांदापूरकर सभागृहात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.

****

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला जाणार आहे, मात्र एसएनडीटी विद्यापीठात फार आधीपासून इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती या मातृभाषा असलेल्या विद्यार्थिनींना मातृभाषेतून परीक्षेची सुविधा असल्याचं, या विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांनी केलं आहे.

बीड इथं, ई-लॅंग्वेज लॅब, सायन्स लॅब आणि फॅशन डिझायनिंग क्रिएशन लॅबचं उद्घाटन चक्रदेव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

दुग्ध उत्पादन क्षेत्रात सर्वांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केलं आहे. ते आज नांदेड इथं यासंदर्भातल्या एका कार्यशाळेत बोलत होते. सहकार क्षेत्रात सर्वांच्या हक्काचे रक्षण करत, पारदर्शकता महत्त्वाची असते. यातून एखाद्या जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो, असा विश्वास गोपछडे यांनी व्यक्त केला.

****

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी आणि भोकरदन शहरात बंद पाळण्यात आला. तर घनसावंगी इथल्या सुतगिरणी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. कुंभारपिंपळगाव बाजारपेठही बंद राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून जिल्हा परिषद मैदानावर बचत गटातल्या महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव होणार आहे. या तीन दिवसीय मेळाव्यात ५० पेक्षा जास्त स्टॉल्स लावण्यात येणार असून, दररोज विविध विषयावर परिसंवाद होणार आहेत.

****

 

No comments:

Post a Comment