Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 06 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
प्रतिज्ञापत्रांसाठीचं पाचशे रुपये मुद्रांक शुल्क माफ
करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
·
विधानसभेतून अबु आझमी यांचं निलंबन, तर विधान
परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा अविश्वास प्रस्ताव
·
सरकारी रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयात भेसळयुक्त
औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कारवाईचा इशारा
·
पशुधन रोग नियंत्रणासंदर्भातल्या योजनेच्या सुधारणेला
केंद्र सरकारची मंजुरी
आणि
·
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत रविवारी भारत-न्यूझीलंड
लढत
****
शासकीय
कार्यालयांमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी द्यावं
लागणारं पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
त्यामुळे शासनाची विविध प्रकारची प्रमाणपत्रं आता एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित
अर्थात सेल्फ अटेस्टेड अर्ज करून मिळू शकतील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी दिली,
‘‘आता यानंतरच्या
कुठल्याही कामाकरता जात पडताळणी प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचा
दाखला असेल, रहीवासी प्रमाणपत्र असेल, नॉन
क्रिमिलेयर प्रमाणपत्र असेल, राष्ट्रीयत्वाचं
प्रमाणपत्र असेल. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कार्याकरता जे-जे काही आमचा महसुली
विभाग प्रमाणपत्र देतात, त्या प्रमाणपत्राला कुठलाही
स्टॅम्प लागणार नाही, कुठलंही मुद्रांक शुल्क लागणार
नाही.’’
या निर्णयाची
तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात सरकारने कोणत्याही प्रकारचा
हस्तक्षेप केला नसल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. एका खासगी
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब नमूद केली. ते म्हणाले...
‘‘मैने सीआयडी के
लोगों को बोहोत स्पष्ट शब्दों मे कहां, देअर
वील बी नो इंटरफेअरन्स। और उन्होने बोहोत अच्छा इन्वेस्टिगेशन किया। हमारी
फॉरेन्सिक टीम ने जो मोबाईल गुमे थे, जिन मोबाईल को डिलिट कर
दिया गया था, उन मोबाईल को भी लेटेस्ट
टेक्नॉलॉजी के माध्यम से उसका पुरा डेटा रिट्रिव किया। चार्जशीट जीस दिन दाखील हुई, उसी
दिन मुझे पता चला की क्या इन्वेस्टिगेशन है।’’
धनंजय मुंडे
यांचा अत्यंत जवळचा माणूस हत्या आणि इतर प्रकरणात दोषी आढळल्याने, मुंडे यांचा
राजीनामा घेतल्याचंही मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत सांगितलं.
****
विधान परिषदेच्या
उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीनं अविश्वास प्रस्ताव दाखल केला
आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळ सचिवांकडे दिलेल्या
याबाबतच्या पत्रावर अनिल परब, भाई जगताप, आदींनी
स्वाक्षरी आहे.
****
औरंगजेबाच्या
समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं विधानसभेतून
अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभेत काल भाजप नेते चंद्रकांत
पाटील यांनी मांडलेला याबाबतचा प्रस्ताव सभागृहाने संमत केला. काँग्रेस विधीमंडळ नेते
विजय वडेट्टीवार यांनी अबू आझमी यांच्यावरच्या कारवाईला पाठिंबा दिला, मात्र छत्रपती
शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत
कोरटकर यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित
केला.
आमदार आदित्य
ठाकरे यांनीही अबू आझमी यांच्यावरच्या कारवाईचं समर्थन करत, अशाच प्रकरणात
इतरांवरही कारवाईची मागणी केली.
****
रायगडाच्या
पायथ्याशी असलेल्या पाचाड इथला राजमाता जिजाऊंचा राजवाडा अधिग्रहित करून त्या ठिकाणी
शिवसृष्टी उभी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं.
राज्यात पाच वेगवेगळ्या महसुली विभागात शिवसृष्टी उभारली जाणार आहे. छत्रपती संभाजी
महाराज यांना मुघल सैन्याने पकडलं, त्या संगमेश्वर इथल्या सरदेसाई
वाड्यात महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
राज्यातल्या
विविध सरकारी रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयात भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी
दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर
यांनी काल विधानसभेत सांगितलं. संबंधित दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची आग्रही मागणी
करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. आमदार सुनील प्रभू यांनी विधानभवनाबाहेर
वार्ताहरांशी बोलतांना ही भूमिका स्पष्ट केली.
‘‘महाराष्ट्रामध्ये
खोट्या कंपन्या आणि खोटी औषधं ज्या पद्धतीने वितरीत केली गेली, हा
मोठा भ्रष्टाचार आहे. ती कंपनी उत्तराखंडची होती, ती
कंपनी अस्तित्वात नसताना देखील ही औषधं खरेदी केली गेली. आणि अशा लोकांना पाठिशी
घालण्याचं काम हे सरकार करत आहे. सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचं काम करतंय.
आणि खोटी औषधं विकणार्या मंत्र्यांना आणि अधिकार्यांना हे सरकार पाठिशी घालतंय, असं
आम्ही विधानसभेत मांडून आज सभात्याग केलेला आहे.’’
****
जालन्यात
भोकरदन तालुक्यातल्या अनवा गावात कैलास बोराडे या तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी
आरोपींना मकोका लावण्यात येणार आहे. सभागृह नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल
विधानसभेत ही माहिती दिली.
****
मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या निकषांमध्ये
कोणत्याही प्रकारचे बदल केले नसल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे
यांनी सांगितलं आहे. काल विधानपरिषदेत सदस्य अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला
उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, राज्यपालांच्या
अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरही काल विधीमंडळात चर्चा झाली.
****
कृषिमंत्री
माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षे झालेल्या कारावासाच्या शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र
न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सुमारे २८ वर्षांपूर्वी मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यात
सदनिका मिळवण्यासाठी कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्यांना
दोन वर्ष कारावास आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिकच्या न्यायालयानं
ठोठावली होती, या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत कोकाटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर
न्यायालयानं काल हा निर्णय दिला.
****
शेतकऱ्यांच्या
पशुधनाचं आरोग्य आणि रोग नियंत्रणासंदर्भातल्या योजनेच्या सुधारणेला, केंद्र सरकारनं
मंजुरी दिली आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लसीकरण, देखरेख आणि आरोग्यसेवेत सुधारणा, यासह पशु औषधीचाही यात
समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी तीन हजार आठशे ऐंशी कोटी रुपयांच्या निधीची तरतूद
केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
****
आयसीसी
अजिंक्यपद करंडक स्पर्धेचा अंतिम सामना, येत्या रविवारी भारत आणि न्यूझीलंड संघात
होणार आहे. काल पाकिस्तानात लाहोर इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात
न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ५० धावांनी पराभव केला. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी
करत ३६२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ ५० षटकात ३१२ धावाच करु शकला.
****
धाराशिव
जिल्ह्यातल्या वाखरवाडी इथल्या रोहिणी सुरवसे या, जीवनोन्नती अभियान
अर्थात उमेदच्या माध्यमातून, स्वतःच्या शेतात सेंद्रीय शेतीच्या
माध्यमातून उत्पादन घेतात. २०१७ मध्ये त्यांनी अन्य आठ महिलांना सोबत घेऊन चोवीस गावातल्या
महिलांना सेंद्रीय शेतीसाठी प्रवृत्त केलं. त्यातून आता शेकडो लाभार्थी महिलांनी आपआपल्या
शेतात सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला असल्याचं, सुरवसे यांनी
सांगितलं..
‘‘माझे नाव रोहिणी सुरवसे. माझ्या अंडर आठ कृषी सखी आहेत. तर त्या आठ कृषी सखींना मी
स्वत: मार्गदर्शन करते. त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्येक कृषी सखीकडे
प्रत्येकी तीन गावं आहेत. तर त्या तीन गावातील लाभार्थींसोबत त्यांच्या कार्यशाळ, शेतीशाळा
घेऊन त्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रशिक्षण देते. आणि त्यासाठी आम्ही
लाभार्थ्यांना सेंद्रीय शेती करण्यासाठी प्रवृत्त करतो.’’
****
बीड जिल्ह्यातल्या
देवळा गावच्या अकरा कुटुंबातल्या महिलांनी एकत्र येत ऑरगॅनिक ग्रामीण किसान शेतकरी
गटाची स्थापना केली आहे. यामध्ये या महिला शेतीतली बीज प्रक्रियेपासून काढणीपर्यंतची
सगळी कामं एकत्र करत असून, अशा एकत्र कामांमुळे पैशांची मोठी बचत होत आहे. इतर गावातल्या
महिलांनाही अशा प्रकारचे गट तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.
****
पशुगणनेमध्ये
लातूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. शासनाने विहित केलेल्या कालावधीत
लातूर जिल्ह्यात दहा तालुक्यांमधल्या ९४१ गावं आणि १९८ शहरी वॉर्डमध्ये पशुगणना पूर्ण
झाली आहे. या कामासाठी जिल्ह्यातले १८१ प्रगणक, ३५ पर्यवेक्षक, १३२ संस्था प्रमुख, नेमण्यात आले होते.
****
बीडच्या
जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट पतसंस्था घोटाळा प्रकरणी मुख्य शाखा आणि धोंडीपुरा शाखेतल्या
तिजोरीतून २२ लाख २७ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आर्थिक गुन्हे
शाखेचे पोलिस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी गेल्या सप्टेंबरपासून
अटकेत असलेला मुख्य आरोपी बबन शिंदे यांच्याविरोधात अन्य काही कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात
आला आहे.
****
बालविवाह
ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी स्वयंप्रेरणेनं काम करणं आवश्यक असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. काल सोयगाव इथं यासंदर्भात झालेल्या आढावा
बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक गावात पोलीस पाटील, ग्रामसेवक
आणि तलाठ्यांनी संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
****
दरम्यान, जिल्हाधिकारी
स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना
आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी काल जिल्ह्यात दहावीच्या विविध परीक्षा
केंद्राची पाहणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी असलेली व्यवस्था,
पोलीस बंदोबस्त, पिण्याच्या पाण्याची सुविधा या
बाबींसह प्रत्यक्ष परीक्षा हॉल मध्ये जाऊन कॉपीमुक्त अभियानाच्या दृष्टीनंही पाहणी
करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment