Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०७ मार्च
२०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
सातवा जनऔषधी दिवस आज साजरा होत आहे.
जनेरिक औषधांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या योजनेविषयी जागरुकता
निर्माण कऱण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. किफायतशीर किंमतीत दर्जेदार जेनेरिक
औषधं उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे
नागरिकांना बाजार भावापेक्षा ५० ते ८० टक्के कमी किमतीत औषधं उपलब्ध होत आहेत.
****
सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक
सुरक्षा दलाचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. तामिळनाडूमध्ये तक्कोलम इथं आयोजित
सीआयएसएफ स्थापना दिन संचलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले होते.
****
गेल्या दहा वर्षांतली विक्रमी परकीय
गुंतवणूक महाराष्ट्रात केवळ नऊ महिन्यात आली असल्याचं, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या डी पी आय आय टी ने परकीय
गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला असून, राज्यात
२०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात आतापर्यंत एकूण एक लाख ३९ हजार ४३४
कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. महायुती सरकारने आपलाच २०१६-१७ या आर्थिक
वर्षाचा विक्रम मोडला असल्याचं सांगत त्यांनी या विक्रमी गुंतवणुकीबद्दल राज्यातल्या
जनतेचं अभिनंदन केलं.
****
देशातल्या नागरिकांच्या स्थलांतरावर आणि
धर्मांतरावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी टीका केली आहे. या मुद्द्यांकडे लक्ष
दिलं नाही तर आपलं अस्तित्व धोक्यात येईल असा इशारा त्यांनी दिली. मुंबईत मुरली
देवरा स्मृती संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी, लोकशाहीमध्ये संवाद
आवश्यक असल्याची गरज अधोरेखित केली.
****
एआय अर्थात आर्टिफिशिअ इन्टेलिजन्स
साठीचा एआय कोष,
एआय कॉम्प्यूट या वेबसाइटचं अनावरण केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स
आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. एआय कोष च्या
माध्यमातून विविध डेटा,
टूल्स आणि एआय मॉड़ेल्स संगणक तंत्रज्ञांना उपलब्ध होती. या
वेबसाइटवर जी पी यु आणि इतर क्लाऊड सुविधा विद्यार्थी, स्टार्टअप, संशोधक
आणि सरकारी विभागांना उपलब्ध होतील.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या
किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा राज्यातला पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल, असं
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर
झालेला पहिला किल्ला अशी ओळखही पन्हाळगड लवकरच निर्माण करेल़, अशी
ग्वाही त्यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा किल्ल्यावर 13
डी थिएटरचं लोकार्पण आणि पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचं अनावरण काल फडणवीस
यांच्या हस्ते झालं;
त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात
उत्तन इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथं आय़ोजित स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नेंस
कॉन्क्लेव्ह मध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी, येत्या तीन महिन्यात राज्य
सरकार अंतराळ धोरण तयार करणार असल्याचं जाहीर केलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
पुढच्या कालावधीमध्येही यशस्वीरित्या
राबवण्याची आणि चालू ठेवण्याची शासनाची भूमिका असून, पात्र लाभार्थी
महिलांवर अन्याय होऊ देणार नाही, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती
तटकरे यांनी म्हटलं आहे. विधानसभेत काल पुरवणी मागण्यांवरील चर्चेला त्या उत्तर
देत होत्या. लाडक्या बहिणींना २१००
रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
****
राज्यातल्या सर्व जिल्हा
रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील केमोथेरपी उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात
येणार असल्याचं,
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल
विधानसभेत सांगितलं. वर्ग तीन आणि चार ची रिक्त पदे ग्रामविकास विभागामार्फत
भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कंत्राटी स्वरूपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे
भरण्यासाठी जिल्हा पातळीवर अधिकार देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
बीड इथल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट
को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधल्या
ठेवीदारांना त्यांच्या ठेवी मिळवून देण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्न
करेल, असं सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज
भोयर यांनी विधानसभेत सांगितलं. या प्रकरणात संस्थेच्या संचालक मंडळाने
ठेवीदारांची फसवणूक केल्याचं स्पष्ट झाल्यानं, संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि
कर्मचाऱ्यांविरोधात २८ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचं भोयर यांनी सांगितलं.
****
समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या
गुजरातमधल्या नामे निराली या बोटीला अपघात झाला; यात पालघर
जिल्ह्यातल्या झाई इथल्या चार मच्छीमार खलाशांचा बुडून मृत्यू झाला. नामे निराली
ही बोट १८ फेब्रुवारीला दहा खलाशांसह खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. ती
परतत असताना या बोटीला भीषण अपघात झाला. दोन खलाशांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात
आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाच
शासकीय आदिवासी आश्रम शाळा,
पाच आदिवासी मुलांचं वसतिगृह आणि तीन आदिवासी मुलींच्या
वसतिगृहांवर ३६१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आदिवासी विकास आयुक्त लीना
बनसोड आणि इतरांच्या उपस्थितीत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment