Sunday, 16 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      अंमली पदार्थाचा धंदा करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवली जाणार नाही - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा

·      फिट इंडिया महोत्सवाचं केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन

·      विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे तीन उमेदवार जाहीर, छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर यांचा समावेश

आणि

·      श्रीक्षेत्र देहू इथं तुकाराम बीज सोहळा साजरा, ‘जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान

****

अंमली पदार्थाचा धंदा करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. समाज माध्यमावरच्या संदेशात आज त्यांनी, देशाला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी तपास संस्था चांगलं काम करत असल्याचं नमूद केलं. इम्फाळमधे नुकतेच ८८ कोटी रुपयांच्या मेथमफेटामाइन टॅब्लेट अमंली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केल्या, तसंच आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ रॅकेटशी संबंधित असणाऱ्या चौघांना अटक केली. गृहमंत्री शहा यांनी या कारवाईचं कौतुक केलं आणि अंमली पदार्थविरोधात कारवाई सुरूच राहील, असं सांगितलं. देशाला अमली पदार्थमुक्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

****

नशामुक्त अभियानांतर्गत नवी मुंबईतल्या गुन्हे शाखेनं आज केलेल्या कारवाईत दिघा इथल्या एका व्यक्तीकडून ३८ लाख ७९ हजार १३५ रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणात गांजा, मेफेड्रोनसारखे अंमली पदार्थ, तसंच गावठी दारू, देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. या आरोपीला न्यायालयानं येत्या १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

****

केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत फिट इंडिया महोत्सवाचं उद्घाटन झालं. निरोगी आणि लठ्ठपणा मुक्त राष्ट्राच्या दृष्टिकोनातून सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देणं, हे या महोत्सवाचं उद्दिष्ट आहे. कार्यक्रमादरम्यान येत्या वीस तारखेपासून नवी दिल्लीत सुरू होत असलेल्या खेलो इंडियाच्या बोधचिन्ह आणि गीताचं अनावरणही करण्यात आलं. मांडवीय यांनी यावेळी देशातल्या तरुणाईला मार्गदर्शन केलं. ते म्हणाले -

बाईट – डॉ.मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री

****

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरता भाजपनं तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यात छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर, नागपूरमधले संदीप जोशी आणि वर्ध्यातले दादाराव केचे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर उमेदवार देणार आहे. ही निवडणूक २७ मार्च रोजी होणार आहे आणि त्याचदिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल.

****

आज देशभर राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा होत आहे. १९९५ साली याच दिवशी प्रथमत: देशातून पोलिओ निर्मूलनासाठी तोंडाद्वारे लस द्यायला सुरुवात झाली होती. देशातल्या प्रत्येक बालकाचं रोगसंसर्गापासून संरक्षण करण्याच्या हेतूनं लसीकरण आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

निरोगी आयुष्याचे करुया रक्षण, लसीकरणाने मिळेल संरक्षण, या जागृती संदेशाद्वारे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटंबकल्याण, पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी समाजमाध्यमांवर माहिती सामाईक केली आहे.

****

नागपूरच्या सिव्हिल लाईन्स इथं मदर डेअरी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्याचं भूमीपूजन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. सुमारे ५५० कोटींच्या या प्रकल्पाद्वारे विदर्भातल्या दुग्ध उत्पादकांकडून दूध संकलित करून विविध दुग्ध उत्पादनांची निर्मिती नागपूरात होणार आहे. मदर डेअरीने आता पशुवैद्यकीय तज्ञांच्या मदतीने स्थानिक गोपालकांच्या गाईंच्या चांगल्या वाणांसाठी पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले. डेअरी मार्फत पशुवैद्यकीय तज्ञ एम्ब्रो ट्रान्सफर तसंच इन विट्रो फर्टीलायझेशन - आयव्हीएफ सारखे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत तसंच दुग्ध उत्पादकांपर्यंत पोहोचतील अशा रीतीने प्रयत्न करावे, यामधून सुमारे १२ ते १५ लिटर प्रतिदिन दूध देणाऱ्या गाई जर विकसित केल्या तर महाराष्ट्राला हरियाणा किंवा पंजाब इथल्या गाई आणण्याची गरज पडणार नाही, असं गडकरी म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिध्द पॉडकास्ट आणि कृत्रिम बुध्दिमत्ता संशोधक लेक्स फ्रिडमन यांच्याशी ‍ज्ञानवर्धक संवाद साधला. तीन तास चाललेल्या या चर्चेत, पंतप्रधानांनी त्यांचं बालपण, ‍हिमालयात व्यतीत केलेली सुरुवातीची वर्षं, सार्वजनिक जीवनातला त्यांचा प्रवास यासह विविध मुद्यांवर भाष्य केलं. आपल्या आयुष्यातलं सर्वात प्रभावी संभाषणांपैकी एक, असं वर्णन फ्रिडमन यांनी यासंदर्भात केलं आहे. हा पॉडकास्ट आज जारी करण्यात आला.

दरम्यान, पंतप्रधान मोदी येत्या ३० मार्च रोजी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १२० वा भाग असेल.

****

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं सदेह वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीज सोहळा आज पुणे जिल्ह्यात श्रीक्षेत्र देहू इथं साजरा होत आहे. यंदाचा हा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज सोहळा आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले असून, प्रशासनानं चोख बंदोबस्त केला आहे. देहू मध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, संत तुकाराम महाराज देहू संस्थानाच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ आज प्रदान करण्यात आला. वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा- सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि- निर्मल वारी, हरित वारी संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला आहे. तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपूर्वी मराठी भाषेत तत्त्वज्ञान सांगितलं, असं नमूद करत, तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांनी धर्माबरोबरच लोकशिक्षण आणि प्रबोधनाचं मोठं कार्य केलं, असं मनोगत शिंदे यांनी पुरस्कार स्वीकरताना व्यक्त केलं

बाईट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

****

राज्यातली सद्भावना तळाशी नेण्याचं काम भाजप आणि मित्रपक्षांनी केलं असून, ती पुन्हा जागृत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. ते आज रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाच्या राज्यभराच्या या दौऱ्यात आढावा बैठका आणि कार्यकर्त्यांशी संवादाच्या माध्यमातून पक्ष पुनर्बांधणी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रश्नच नाही; मात्र त्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडलं असल्याची निशाणी म्हणजे त्याची कबर आहे. ती कबर उखडणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या, मराठ्यांच्या शौर्याची निशाणी पुसून टाकण्यासारखं ठरेल, असं सपकाळ यावेळी म्हणाले.

कोकणात सापडलेली खनिजं आणि नैसर्गिक साधनसंपत्ती उद्योगपतींना देण्याचा सरकारचा मानस आहे, यासाठी इथलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं कारस्थान सत्ताधाऱ्यांकडूनच केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या मंगळवारी १८ तारखेला मेगा जॉब फेअर होणार आहे. सेंट्रल ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित केला असल्याचं, संयोजक डॉ. गिरीश काळे यांनी सांगितलं. विद्यापीठातल्या नायलेट इथं छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई इथल्या नामांकित कंपन्या या जॉब फेअर मध्ये सहभागी झाल्या असून, विविध पदविका, पदवी तसंच पदव्योत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरता नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

****

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात पिंपरी घुमरी इथं ट्रक चालक म्हणून कामावर असलेल्या तरुणाची अमानुषपणे हत्या केल्याची घटना घडली. मारहाण करणाऱ्या संबंधीत मालकाने मयत तरूणाच्या आई-वडिलांना फोन करून बोलावून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत पीट लाईन क्रमांक-दोनच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी आजपासून ३१ मार्चपर्यंत पंधरा दिवसांसासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या कामामुळे काही रेल्वे ठराविक तारखांना रद्द राहणार आहेत. यामध्ये परभणी-नांदेड एक्स्प्रेस ही १९ ते २३ तसंच २६, २७, २९ आणि ३० मार्च रोजी, तर नांदेड-औरंगाबाद एक्स्प्रेस २१ आणि २८ मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे. आवश्यक पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं केलं आहे.

****

No comments:

Post a Comment