Thursday, 20 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.03.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 March 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      भीम-यूपीआयद्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारची प्रोत्साहन योजना

·      छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित भारत गौरव रेल्वे सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

·      महाराष्ट्रात गुन्ह्यांमध्ये घट-गुन्हेगारीत देशात आठव्या क्रमांकावर-मुख्यमंत्र्यांची माहिती

·      छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा "जिल्हाधिकारी - तहसीलचे दारी" अभिनव उपक्रम

आणि

·      पैठण इथं आज संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा

****

भीम-यूपीआयद्वारे छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत कमी रकमेच्या प्रत्येक व्यवहारावर शून्य पूर्णांक १५ शतांश टक्के प्रोत्साहन देण्यात येईल. दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी हा नियम लागू असेल. या निर्णयामुळे छोटे व्यापारी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय यूपीआय सेवांचा लाभ घेऊ शकतील, असं वैष्णव यांनी सांगितलं.

नवी मुंबईत जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण - जे एन पी ए च्या ग्रीनफील्ड हायवेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली, हा महामार्ग जेएनपीए बंदराला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणार आहे.

याशिवाय सुधारित गोकूळ मिशनच्या कार्यान्वयनालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे दूध उत्पादनात, तसंच दूध उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.

****

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्थळांना जोडणारी भारत गौरव रेल्वे सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. नांदेड - पुणे रेल्वे गाडीला वंदे भारत मध्ये रुपांतरित करण्यासंदर्भात परभणीचे खासदार संजय जाधव यांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, देशातल्या अनेक मोठ्या शहरातल्या रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचं काम सुरु असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात गुन्ह्यांमध्ये घट झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल विधानसभेत अर्थ संकल्पातल्या गृह विभागाच्या अनुदानावरील चर्चेला उत्तर देत होते. गुन्हे सिद्धीचा १० टक्क्यांपेक्षा कमी असलेला दर आता ५० टक्क्यांपर्यंत वाढला असून, हा दर ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. गुन्हेगारीच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक आठवा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं,

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समाज माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेत, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमांत येत्या तीन महिन्यात बदल करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितलं. शासकीय कर्मचाऱ्यांकडून समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरावर बंधनं नसल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य डॉ. परिणय फुके, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी मांडली. शासकीय कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांचा उपयोग फक्त जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी करावा, यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्वं तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

राज्यातली वीज निर्मिती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून टप्प्याटप्प्यानं नवीन प्रकल्प कार्यान्वित होत असून, भविष्यात वीज पुरवठा अधिक सक्षम केला जाईल, असं ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं.

राज्यात रोग निदान प्रयोगशाळांसाठी स्वतंत्र कायदा आणणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिली. अवैध पद्धतीनं कोणी अशा तपासण्या करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणं, या कायद्यामुळे शक्य होणार असल्याचं ते म्हणाले.

****

कन्नड तालुक्याला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी आमदार संजना जाधव यांनी केली. अर्थसंकल्पाच्या अनुदान मागण्यांवरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. सरकारने स्वदेश दर्शन तसंच प्रसाद योजनांचा वापर करून पर्यटन विकासाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असं त्या म्हणाल्या.

****

मराठवाड्याला नदीजोड प्रकल्पातून पाणी देताना धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्याचा हिस्सा ठरवून द्यावा अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी काल विधानसभेत केली. या कामासाठी कालमर्यादा निश्चित करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. मांजरा आणि तेरणा धरणावर असलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याचं बॅरेजेस मध्ये रूपांतर करण्याची मागणही त्यांनी यावेळी केली.

****

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम येत्या ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना दिली जाईल, असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य राजेश विटेकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने "जिल्हाधिकारी - तहसीलचे दारी" हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातल्या नागरिकांना तालुकास्तरावरच दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येईल, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींचं निवारण जलदगतीने होण्यास मदत होईल.

****

पैठण इथं संत एकनाथ महाराजांचा नाथषष्ठी सोहळा आज साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून लहान मोठ्या अनेक दिंड्या पैठण शहरात दाखल झाल्या आहेत. नाथमंदिरात या निमित्तानं कीर्तन प्रवचन आणि छबीना मिरवणूकीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुऱ्यातल्या नाथ मंदिरातही भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

****

नाशिकमध्ये परंपरेनुसार काल रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला. नाशिकमधल्या पेशवेकालीन सात रहाडी अर्थात जमिनीच्या खाली असलेल्या हौदांचं पूजन करून त्यात नैसर्गिक रंग तयार करण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास शहराच्या मध्य भागातल्या रहाडीमध्ये मध्ये उत्सव सुरू झाला.

पंढरपूर इथं महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली.

धाराशिव जिल्ह्यात तुळजाभवानी मातेच्या मंदिरात महंत, पुजारी आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली. यावेळी देवीच्या महावस्त्रावर नैसर्गिक सप्तरंगांची उधळण करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात श्री क्षेत्र मढी इथं संत कानिफनाथांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी काल मोठी गर्दी केली होती. रेवड्याची उधळण करत पारंपारिक ढोल ताशा, शंख, आणि डफाच्या तालबद्ध आवाजात भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण मढी परिसर दुमदुमला होता.

****

छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा एक्सेलेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्यूबेसन कौन्सिल-मॅजिक या एन्क्यूबेशन केंद्राच्या पहिला स्टार्टअप असलेला पेस्टीसाइड स्प्रेची दखल उद्योजक बिल गेट्स यांनी घेतली आहे. ज्येष्ठ उद्योजक आशिष गर्दे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या युवा संशोधक योगेश गवांदे यांनी या स्टार्टअपच्या माध्यमातून निओ सोलर स्प्रे तयार केला आहे. या फवारणी यंत्राबाबत योगेश गवांदे यांनी अधिक माहिती दिली...

बाईट - योगेश गवांदे

****

२०२४ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी शासनाकडून मिळणारी मदत प्राप्त करून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या शेतक-यांनी ई-केवायसी प्रक्रिया येत्या पंचवीस तारखेपर्यंत करून घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या २४ हजार ३८२ शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी न केल्यानं २१ कोटी ७७ लाख रुपये इतका निधी वितरीत करणं बाकी असल्याचं, जिल्हाधिकारी कार्यालयानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात माहूर इथल्या स्कायवॉकच्या कामाची काल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणी केली. स्कायवॉक हा प्रकल्प माहूरच्या वैभवात भर टाकणारा असून, यामध्ये ज्या लोकांना आपली जागा द्यावी लागेल त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात विहिरीच्या कामादरम्यान जिलेटिनचा स्फोट झाल्यानं कामगाराचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले. अंबाजोगाई तालुक्यातल्या तळेगांव घाट शिवारात काल सकाळी ही दुर्घटना घडली. यातल्या दोन गंभीर जखमींवर लातूरच्या खाजगी रुग्णालयात तर एका जखमी कामगारावर अंबाजोगाई इथं उपचार सुरू आहेत.

****

हवामान

राज्यात काल सर्वात जास्त ४१ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३७ पूर्णांक सात, तर परभणी इथं ३९ पूर्णांक तीन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

****

No comments:

Post a Comment