Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
• नागपूर इथं शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
• यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना जाहीर
• केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळाकडून महावितरण कंपनीचा सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी गौरव
• म्हैसमाळ इथं सी-डॉप्लर रडार लवकरच कार्यान्वित करणार-खासदार डॉ भागवत कराड
आणि
• आएपीएलच्या १८व्या हंगामाला आजपासून प्रारंभ-कोलकाता आणि बंगळुरू संघात पहिला सामना
****
शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज नागपूर इथं आढावा बैठकीत बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडणार नाही, यादृष्टीने कार्यवाही करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या दंगलीमध्ये मालमत्ता तसंच वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या नुकसानासंदर्भात पंचनामे करुन येत्या तीन ते चार दिवसात नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. दंगलखोरांच्या मालमत्तेची विक्री करुन, संपूर्ण नुकसान भरपाई दंगलखोरांकडून वसुल करण्यात येईल, यासाठी महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांचा एकतेचा संदेश आज अधिक प्रासंगिक असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ब्रिटिश भारतीय युवा लेखक सचिन नंदा यांनी लिहिलेल्या 'हेडगेवार : अ डेफिनिटिव्ह बायोग्राफी' या डॉ हेडगेवार यांच्यावरील जीवन चरित्राचं प्रकाशन, आज मुंबईत राजभवनात राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. आपसात एकी नसल्यामुळे अवघ्या काही हजार ब्रिटिशांनी भारतावर अनेक दशके राज्य केलं, मात्र छत्रपती शिवाजी महाराज अशा फुटीर प्रवृत्तींना पुरून उरले होते, असं राज्यपालांनी नमूद केलं.
****
लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीने झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या पुनर्रचनेसंदर्भात तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी बोलावलेली पहिली सर्वपक्षीय बैठक आज चेन्नई इथं झाली. त्या पार्श्वभूमीवर सुळे मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर त्या राज्यांना अधिक लोकसंख्येच्या राज्यांच्या तुलनेत कमी प्रतिनिधीत्व मिळेल, असं त्या म्हणाल्या.
****
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना अर्थशास्त्रातल्या भरीव योगदानासाठी वर्ष २०२५साठीचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुष्यभूषण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. या पुरस्काराचं हे ३७वं वर्ष आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच होणार असून यात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार सैनिकांचा आणि एका वीरमातेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
****
केंद्रीय सिंचन आणि ऊर्जा मंडळातर्फे महाराष्ट्र वीज महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण कंपनी म्हणून गौरवण्यात आलं. काल नवी दिल्लीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर यावेळी उपस्थित होते. महावितरणच्या गौरवाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले तसंच महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
****
मुंबई - ठाणे आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, या उद्देशाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज दिल्ली इथं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. वैष्णव यांनी याबाबत सकारात्मकता दाखवत कृती आराखडा तयार करण्याचं आश्वासन दिलं, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हवामानाचा अचुक अंदाज घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या म्हैसमाळ इथं लवकरच सीडॉप्लर रडार कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती, खासदार डॉ भागवत कराड यांनी दिली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठवाडा हा हवामान बदल आणि त्याच्या परिणामाबाबत संवेदनशील असून अवर्षणप्रवण आणि टंचाई असलेला भूभाग आहे. हवामान बदल ही कृषी अर्थव्यवस्थेसमोरची चिंताजनक बाब असल्याचंही कराड यांनी सांगितलं. हे रडार बसवण्यासाठी वन विभागाने जागा उपलब्ध करून दिली असून हे देशातील ४० वं रडार असणार आहे. डॉप्लर बसवल्यानंतर चारशे किलोमीटरपर्यंत त्रिजेचे हवाई अंतर स्कॅन केलं जाणार असल्याची माहिती, डॉ कराड यांनी दिली.
****
जागतिक जल दिन आज साजरा झाला. माती आणि पाणी मानवी जीवनासाठी अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे, अन्न आणि पाणी नसेल तर सजीव पृथ्वीतलावर जीवंत राहू शकणार नाही, असं मत राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलं आहे. मृद आणि जलसंधारण विभागाच्या 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' आणि 'नाला खोलीकरण आणि रुंदीकरण' या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पोर्टलचं उद्घाटन आज यवतमाळ इथं राठोड यांच्याहस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर, गंगापूर इथं जागतिक जलदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फुलंब्री तालुक्यातल्या देभेगाव इथं शालेय विद्यार्थांना पाणी बचतीची शपथ देण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयात जागतिक जल दिनाचं औचित्य साधुन पाण्याचं महत्त्व पटवून देण्यात आलं.
****
संत साहित्य, विचारातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला असून संताची भूमिका लोककल्याणाची होती, असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. शिर्डी इथं आज वारकरी साहित्य परिषदेच्या १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात विखे पाटील बोलत होते. संत साहित्य टिकून राहिल्यामुळे समाजातील विषमता नष्ट होऊन एकता प्रस्थापित झाली, समाज एकसंघ ठेवण्याचं सामर्थ्य संत विचारांमध्ये आहे, असं विखे पाटील यांनी सांगितलं. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, संमेलनाध्यक्ष संजय महाराज देहूकर, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथल्या असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचा असलेला राष्ट्रीय स्मारक दर्जा रद्द करण्यासाठी नाशिक इथले सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्रशासनाने १९५१ मध्ये घेतलेल्या या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं असून, केवळ काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे हा दर्जा देण्यात आला होता, हा निर्णय घेताना तत्कालीन लोकप्रतिनिधींची संमती घेण्यात आलेली नव्हती, असं रतन लथ यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
****
हिंगोली इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आज कयाधू जिल्हास्तरीय सरस विक्री प्रदर्शनाला प्रारंभ झाला. यावेळी एक हजार चारशे १५ गटांना ८ कोटी ४९ लाख रुपये समुदाय गुंतवणूक निधी, २९९ गटांना ८ कोटी ५९ लाख रुपये, हिंगोली तालुक्यातल्या स्वयं आधार महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना १२ लाख ८७ हजार रुपये, असे एकूण १७ कोटी ३६ लाख रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले.
****
छत्रपती संभाजीनगर इथं कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मालमत्ता कर थकबाकी प्रकरणी महापालिकेनं कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्यालय आणि सचिवांच्या दालनाला सील ठोकलं. बाजार समितीकडे १० कोटी ३२ लाख ४७ हजार ४२३ रूपये कर थकलेला असल्याने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार तसंच उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत आज लोक अदालतीमध्ये ५४ लाख रुपयांची एकूण ४४ प्रकरणं निकाली काढण्यात आली. निकाली निघालेल्या प्रकरणात संबंधितांना व्याजात २५% सूट न्यायाधिकरणाने दिल्याचं, महानगरपालिकेच्या वृत्तात म्हटलं आहे
****
नागरिकांनी कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असं आवाहन महावितरणने केलं आहे. कुलरसाठी नेहमी थ्री-पिन प्लगचा वापर करावा, कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी कुलरचा वीजपुरवठा बंद करावा, ओल्या हाताने कुलरला कधीही स्पर्श करू नये, लहान मुलांना नेहमी कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावं, आदी खबरदारी घ्यावी घेण्याचं आवाहन महावितरणने केलं आहे.
****
थेट पशुपालकांशी संवाद या कार्यक्रमाद्वारे आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं बालगाव इथं शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. पशुपालकांना यावेळी शासनाच्या विविध योजना आपल्या दारी कशा येतील, यावर सूक्ष्म माहिती देण्यात आली. किसान क्रेडिट कार्डची माहिती समजावून पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डचे अर्ज वितरित करण्यात आले.
****
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आएपीएल क्रिकेटचा १८ वा हंगाम आजपासून सुरू होत आहे. आज या स्पर्धेचा पहिला सामना कोलकाता इथं, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत १० संघ एकूण ७४ सामने खेळतील. या स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार आहे.
****
स्वित्झर्लंडमध्ये बासेल इथं सुरु असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या शेंग शु लिऊ आणि टॅन निंग या अव्वल मानांकित जोडीशी होईल.
****
हवामान
राज्यात आज सर्वात जास्त ३८ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान सोलापूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३५ पूर्णांक दोन, परभणी तसंच धाराशिव इथं ३८ अंशांवर तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment