Sunday, 23 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

**** 


कांदा उत्पादक शेतकऱ्याला राज्य सरकार मदत करत राहिल - मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन करुन विकास आराखडा राबवणार

आर्थिक परिस्थीती सुधारल्यानंतर लाडकी बहिण योजनेचं अनुदान वाढवणार- उपमुख्यमंत्री अजित पवार 

आणि

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचं राजस्थान रॉयल्ससमोर २८७ धावांचं लक्ष्य

****

कांदा उत्पादक शेतकऱ्याला राज्य सरकार मदत करत राहिल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कांदा निर्यातीवरचं २० टक्के शुल्क एक एप्रिलपासून हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल, असं त्यांनी आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्याची पूर्वतयारी वेगानं करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात येत असून या संदर्भात प्रयागराजप्रमाणे लवकरच कायदा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नाशिकमध्ये आज फडणवीस यांनी २०२७ मध्ये होणाऱ्य कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कुंभमेळ्याची तयारी वेगानं सुरू असून त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी खासगीकरणातून कामं करण्यात येणार असून पुढच्या महिन्यात या कामाला सुरूवात हेाईल असं त्यांनी सांगितलं. कुशावर्त तीर्थाचं पाणी शुध्द करण्यासाठी नगरपालिकेनं तयारी केली असून त्यांना लवकर कामं करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. 

****

देशातलं सर्वात मोठं बंदर आता वाढवण इथं होत असून नाशिकहून वाढवणसाठी `ग्रीन फिल्ड रोड` तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमध्ये भारतीय उद्योग परिसंघ अर्थात सीआयआयच्या एका कार्यक्रमात दिली. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे वाटचाल करत असून त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा ३६ टक्के असेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

****

मराठवाड्याच्या विकासासाठी महायुती सरकार वचनबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातल्या नरसी इथं एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये देण्यात येतील, असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही तसचं राज्याची तिजोरी रिकामी झाली आहे, हा विरोधकांचा खोटा प्रचार असल्याचं सांगत आपण स्वतः राज्याचा सात लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातले तीन वीर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना संपूर्ण देश आज हुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली वाहत आहे. १९३१ मध्ये २३ मार्चला लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात या तीन वीरांना फाशी देण्यात आली होती. या दिवसाचं हुतात्मा दिन म्हणून स्मरण करण्यात येतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही वीरांना श्रद्धांजली वाहिली आहे. समाजमाध्यमावर मोदी यांनी भगत सिंह,

सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे. स्वातंत्र्य आणि न्यायासाठी या क्रांतीकारकांनी दाखवलेलं दुर्दम्य साहस आणि सर्वोच्च बलिदान देशवासियांना प्रेरित करेल, असं पंतप्रधान म्हणाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईत राजभवन इथं क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद दिनानिमित्त आज सकाळी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक संपर्क माध्यमांवर हुतात्मा क्रांतिकारकांना अभिवादन केलं आहे. 

****

ग्यानेश कुमार यांनी देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर एक महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रियांच्या बळकटीकरणासाठी ठोस पावलं उचलली आहेत. निवडणूक आयोगानं आज मुंबईत एका निवेदनाद्वारे याची माहिती दिली. निवडणूक कर्मचाऱ्यांचं सतत क्षमता वृद्धीसाठी डिजिटल प्रशिक्षण, पाच हजारांहून अधिक सर्वपक्षीय बैठकांचं आयोजन, याचा यात समावेश आहे. निवडणूक यादीतील दुरुस्ती आणि नावांचा समावेश करण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं आयोगानं कळवलं आहे. 

****

आज दुपारी तीन वाजेपासून नागपूर शहरातली संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे. तहसील, कोतवाली, गणेशपेठ आणि यशोधरा या चारही पोलिस ठाण्यांतर्गत संचार बंदी पूर्णतः उठविण्यात आली असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी दिली आहे.

****

सायबर फसवणुकीसाठीच्या एक नऊ तीन शून्य या हेल्पलाईनवर आलेल्या ११० तक्रारी २४ तासांच्या आत सोडवून मुंबई पोलिसांनी त्यातून सुमारे एक कोटी ४९ लाख रुपये जप्त केले आहेत. शुक्रवारी या हेल्पलाईनवर विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या ११० तक्रारी आल्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तत्काळ संबंधित बँकांशी संपर्क साधून पैसे फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया थांबवली. अशा प्रकारची फसवणूक झाल्यास नागरिकांनी या मदतवाहिनीवर तातडीनं मदत मागावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

****

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी, कायदा नवीन असल्यामुळं या कायद्याचं पालन करताना झालेल्या चुकांमुळं करदात्याला अधिकचा दंड बसू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं अभय योजना सुरू केली आहे. पात्र करदात्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल, असं वस्तू आणि सेवा कर विभागानं कळवलं आहे. करभरणा करताना करदात्यांकडून चुका झाल्यास किंवा वस्तू आणि सेवा कर संबंधित विवाद प्रकरणांना निकाली काढण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. आवश्यक स्पष्टीकरण किंवा मदतीसाठी आपल्या समन्वयक, क्षेत्रीय जीएसटी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असं आवाहन वस्तू आणि सेवा कर विभागानं केलं आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग क्रिकेटमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघानं आज राजस्थान रॉयल्स समोर हैदराबाद इथं विजयासाठी २८७ धावांचं कठीण आव्हान ठेवलं आहे. इशान किशन यानं ४७ चेंडुंमध्ये नाबाद १०६ धावा केल्या तर ट्रॅव्हीस हेडनं ३१ चेंडुंमध्ये ६७ धावांची खेळी केली. त्यामुळं सनराझर्सनं सहा बाद २८६ धावांचा पल्ला गाठला.

राजस्थान रॉयल्सच्या संघाची सुरुवात डळमळीत झाली असून संघानं पाचव्या षटकात तीन बाद ५० धावा केल्या होत्या. आजचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. चेन्नई इथं सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरू होईल.

****

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी कन्नड तालुक्यातील अंबाळा गावाला भेट देऊन आदिवासीच्या अडीअडचणी बाबत माहिती जाणून घेत आदिवासीच्या योजना तसंच सोईसुविधांबाबत योग्य त्या उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. अंबाळा ग्रामस्थांनी गावाचा रस्ता, प्रलंबित वनहक्क दावे, जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना, शिक्षण, शाळेसाठी संरक्षण भींत, ग्रामविकास, जन्मप्रमाणपत्र, बिबट्यांचा त्रास आदीं बाबत आपल्या अडचणी याप्रसंगी मांडल्या. जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा करण्यासोबतच योजना मंजूर असून अर्धा किलोमीटर या ठिकाणी भूमिगत जलवाहिनीचं काम करण्यासाठी वन विभागाची मंजुरी मिळण्याबाबत यावेळी चर्चा झाली. तसंच `प्रधानमंत्री किसान योजने`चा लाभ मिळवून देण्यासाठी गतीनं काम करावं, अशा सूचना विभागीय आयुक्त गावडे यांनी दिल्या. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी विविध उपयुक्त योजनांची माहिती यावेळी दिली. 

****

बीड जिल्ह्यातली सुमारे साडे पाच हजार प्रकरणं राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीनं निकाली निघाली आहेत. जिल्हा न्यायालयातल्या प्रलंबीत प्रकरणांपैकी एकूण ११ हजार ९२४  प्रकरणं लोकअदालीत ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भुसंपादन आदी प्रकरणांचा समावेश होता.

****


No comments:

Post a Comment