Tuesday, 25 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      संविधानाच्या अधिष्ठानामुळे संसदीय लोकशाही अधिक भक्कम-विधान परिषदेतल्या विशेष चर्चेत सभापतींचं प्रतिपादन

·      विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर;सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नियुक्त समितीच्या अहवालानुसार कारवाईची ग्वाही

·      जालना ते जळगांव प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी भुसंपादन सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती

·      बीड जिल्हा कारागृहात सतीश भोसलेची बडदास्त ठेवल्याप्रकरणी दोघे निलंबित

आणि

·      नांदेडचे डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या 'नवी लिपी' कविता संग्रहास नामदेव ढसाळ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर

****

संविधानाचं अधिष्ठान लाभल्यामुळे संसदीय लोकशाही अधिक भक्कम झाली आहे असं प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केलं आहे. विधानपरिषदेत भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर आज ते बोलत होते. महिलांना मतदानाचा अधिकार भारतात स्वातंत्र्यावेळीच दिला गेला, महिलांना संविधानाचं संरक्षण आहे असं उपसभापती निलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या. तर राज्याच्या अधिकारावर केंद्राचं अतिक्रमण होत आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी केला.

****

विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्ताववरच्या चर्चेला उत्तर दिलं.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविरोधात अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्याविरोधात कठोर कारवाईचं आश्वासनही त्यांनी दिलं.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शवविच्छेदन अहवालात विसंगती आहे, व्हीसेरा आणि बाह्य अहवाल वेगळा आहे, त्यामुळे या प्रकरणासाठी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करू, तसंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनाही सोडलं जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सहकारी उपनिबंधक कार्यालयातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्व कामकाज डिजिटल केलं जाणार आहे, त्यासंबंधी आधी तीन आणि नंतर सहा महिन्यात संबंधीत कार्यवाही पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.

****

मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला, यासंदर्भातले पुरावे त्यांनी आज सभापतींकडे सादर केले. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉपी मध्ये लोटस २४ नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएल साठी आले असल्याची माहिती दानवे यांनी अंतिम आठवडावरील प्रस्तावावरील भाषणात सभागृहाला दिली.

****

बीड जिल्हा रुग्णालयात कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी संबंधित तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करून त्यांची तीन महिन्यात चौकशी करू, इतर दोषींवरही कारवाई करू अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. मुंबईच्या किनारा नियंत्रण तसंच ना विकास विभागात बेकायदेशीरपणे केलेल्या २६७ बांधकामांविरोधात महापालिकेच्या वतीनं तातडीनं कारवाई करून ती पाडली जातील, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या प्रकरणात नकाशांमध्ये बेकायदेशीरपणे केलेल्या फेरफार आणि चूकीच्या परवानग्यांबद्दल विशेष चौकशी समिती स्थापन केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

येत्या गुढीपाडव्यापासून राज्यात परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश, मराठी भाषेत असले पाहिजेत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. वाहनांवरील सामाजिक संदेश, जाहिरात तसंच प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार तसंच प्रसार होईल, असं सरनाईक यांनी नमूद केलं.

****

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या ४५ तर माजलगाव तालुक्यातल्या २९ गावांच्या पाणीपुरवठ्याचं काम देण्यात आलेल्या प्रगती कन्स्ट्रक्शन या कंपनीला कामाची प्रगती असमाधानकारक असल्यामुळे काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ही माहिती दिली. सदस्य विजयसिंह पंडित यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

****

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नगरनाका ते केंब्रिज चौकपर्यंत तत्कालीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१५ साली प्रस्तावित केलेल्या रस्त्याच्या कामाबाबत, चालू अधिवेशन संपल्यानंतर सबंधित खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रस्ताव सादर करू, अशी माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आज दिली. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

****

लोकसभेनं आज वित्तविधेयक २०२५ पारित केलं. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देतांना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, करदात्यांच्या सन्मानासाठीआणि व्यवसाय सुलभतेसाठी करात सूट दिल्याचं सांगितलं. नवीन आयकर विधेयकावर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यताही अर्थमंत्र्यांनी वर्तवली.

****

एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावरील अभ्यास करणाऱ्या संसदेच्या संयुक्त समितीचा कार्यकाळ संसदेच्या पावसाळी सत्राच्या अंतिम आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी आज लोकसभेत यासंदर्भात सादर केलेल्या प्रस्तावाला सदनाने मंजुरी दिली.

****

जालना ते जळगांवपर्यंत रेल्वे मार्गासाठी गावनिहाय भूसंपादन अधिकारी यांचे नामांकन जालना जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालं असून त्यासाठी भूसंपादन सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आले आहेत. त्यानुषंगानं आज माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रगती तसंच या रेल्वे मार्गाच्या संदर्भात कामाचे स्वरुप याबाबत दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत आवश्यक सूचना केल्या.

****

गाव तसंच महापालिका हद्दीतील अकृषी कर रद्द करण्याचा निर्णय लवकरात लवकर काढण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असल्याचं लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी आज सांगितलं. लातूर महापालिकेने अकृषीकर भरला नाही म्हणून महसूल विभागाने लातूर इथलं यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल सील केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत काल भेट घेतली आणि शासनाने ४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयाबाबत शासन आदेश अद्याप निघालेला नसल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं.

****

भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले संवर्धन, देखभाल आणि दुरुस्तीसाठी राज्याच्या पुरातत्व विभागाकडे देण्यात यावेत अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हे किल्ले राज्य शासनाच्या अखत्यारित दिल्यास त्यांची देखभाल अत्यंत प्रभावीपणे करता येईल, असं शेलार यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक तथा लेखक-कवी डॉ. राजेंद्र गोणारकर यांच्या दुबईत प्रकाशित झालेल्या नवी लिपीकविता संग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा यंदाचा नामदेव ढसाळ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ.राजेंद्र गोणारकर यांचा हा दुसरा कवितासंग्रह असून त्यांची निळे आकाश’, ‘सूर्यपक्षी’, ‘मराठवाड्यातील आंबेडकरी प्रबोधन पर्व’, ‘दलित पॅंथर : सम्यक आकलनआदी १३ पुस्तकं प्रकाशित आहेत.

येत्या ३० मार्च रोजी नागपूर इथे विशेष समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.

****

जालना जिल्ह्यातल्या अंशत: विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांनी आज मोर्चा काढला. विना अनुदानित शिक्षकांना २० टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा देण्यात यावा या आणि इतर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं, दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका महिला शिक्षकेसह चार शिक्षकांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या सर्वांना ताब्यात घेतलं.

****

बीड जिल्ह्यातील विनाअनुदानित आश्रम शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या धनंजय नागरगोजे या शिक्षकाने अकरा दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. धनंजय नागरगोजे यांच्या पत्नीला सेवेत सामावून घेत नागरगोजे यांना न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी आश्रम शाळा शिक्षकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. याबाबतचं निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आलं आहे.

****

बिहारमधील बुद्धगया स्थित महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदेड इथं भिख्खू संघाच्या नेतृत्वाखाली आज शहरातल्या नवा मोंढा कृषी उत्पन्न बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील भिख्खू, विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांची सध्या पडताळणी सुरू आहे. त्याबरोबरच ज्या महिलांनी चुकीचे आधार क्रमांक दिले, त्यांचीही माहिती घेण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांच्या किंवा कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन आहे, अशा लाभार्थ्यांची यादी परिवहन विभागाकडून घेण्यात आली असून या यादीनुसार प्रत्येक जिल्ह्यात पडताळणी करण्यात येत आहे.

****

No comments:

Post a Comment