Friday, 28 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं उत्पादन योजनेला मंजुरी;केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढीचा निर्णय

·      हरभऱ्याच्या आयातीवर एक एप्रिलपासून १० टक्के आयात शुल्क लागू होणार

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० तारखेला नागपूर दौऱ्यावर

आणि

·      मर्यादेबाहेर साखरेचा साठा करणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा

****

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आज इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं उत्पादन योजनेला मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी २२ हजार कोटींहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ९१ हजारांहून अधिक प्रत्यक्ष रोजगार आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास वैष्णव यांनी वर्तवला. ते म्हणाले

बाईट – अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण मंत्री

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात दोन टक्के वाढीलाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. चालू वर्षी एक जानेवारीपासून ही वाढ लागू होईल. सुमारे ४८ लाख ६६ हजार कर्मचारी आणि ६६ लाख ५५ हजारावर निवृत्ती वेतनधारकांना या निर्णयाचा लाभ होईल.

****

केंद्र सरकारनं सायबर हल्ले रोखण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण पायाभूत रचना आणि माहिती सुरक्षित राखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. आज राज्यसभेत एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. डिजीटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट संमत केल्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

****

आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत, यावर्षी एक मार्च पर्यंत आठ कोटी नऊ लाखापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले, केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी, आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. आशा सेविकांसाठी दहा लाखांहून अधिक आयुष्मान कार्डस् आणि अंगणवाडी सेविकांसाठी १४ लाखांहून अधिक कार्डस् तयार केले गेले आहेत. या योजने अंतर्गत १३ हजार आठशे ६६ खाजगी तर १७ हजार ९१ सार्वजनिक रुग्णालयांसहीत एकूण ३० हजार नऊशे ५७ रुग्णालयांचा समावेश करण्यात आल्याची माहितीही नड्डा यांनी यावेळी दिली.

****

हरभऱ्याच्या आयातीवर एक एप्रिलपासून १० टक्के आयात शुल्क लावायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हरभऱ्याची देशातली उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी मे महिन्यात सरकारनं हरभऱ्याच्या निःशुल्क आयातीला परवानगी दिली होती. याची कालमर्यादा येत्या ३१ मार्च रोजी संपणार आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार २०२४-२५मध्ये १ कोटी १५ लाख टन हरभऱ्याचं उत्पादन झालं आहे.

****

केंद्र सरकारच्या आपत्ती निवारण विषयक उच्च स्तरीय समितीनं राज्यासाठी ६१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अग्निशमन सेवांचा विस्तार आणि सुधार यासाठी हा निधी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रासह एकूण ५ राज्यांना मिळून सोळाशे कोटी रुपयांहून अधिक निधी या समितीनं मंजूर केला. सिक्कीममध्ये २०२३ मध्ये आलेल्या मोठ्या पुरामुळं झालेल्या नुकसानानंतर पुनर्वसन कार्य हाती घेण्यासाठी ५५५ कोटी रुपयांचा निधी या समितीनं मंजूर केला आहे.

****

छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेली ४५ किलो स्फोटकं सुरक्षा दलांनी आज सकाळी निकामी केली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २२२व्या बटालियनने आज सकाळी ही कामगिरी पार पाडली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० तारखेला महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर असणार आहेत. महाराष्ट्रात ते नागपूरला भेट देतील आणि स्मृती मंदिराचं दर्शन घेतील. त्यानंतर ते दीक्षाभूमीला भेट देतील. त्यानंतर ते माधव नेत्रालयाच्या विस्तारीत इमारतीचं भूमिपूजन करतील आणि सभेला संबोधित करतील. पंतप्रधान शहरातील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड इथं लॉइटरिंग म्युनिशन टेस्टिंग रेंज आणि यूएव्हीसाठी रनवे सुविधेचं देखील उद्घाटन करतील.

दरम्यान, पंतप्रधान मोदी ३० तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा १२०वा भाग असेल.

****

साखरेच्या मासिक साठ्याची मर्यादा निश्चित असून या मर्यादेबाहेर साखरेचा साठा करणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध सरकार कठोर कारवाई करेल, असा इशारा अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिला आहे. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि दरवाढ नियंत्रित करण्यासाठी एप्रिल महिन्याची साठ्याची मर्यादा २३ लाख ५० हजार टन इतकी निश्चित करण्यात आली आहे. दर महिन्यासाठी मर्यादा घालून दिलेली असतानाही काही सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी या मर्यादेचं उल्लंघन केल्याचं आढळलं आहे. त्यामुळे नवीन मार्गदर्शक तत्वं जारी करण्यात आली असून त्यात पहिल्यांदा उल्लंघन केल्यास जास्तीच्या साखरेच्या १०० टक्के भरपाई पुढच्या महिन्याच्या कोट्यातून वजा केली जाईल. त्यानंतर होणाऱ्या उल्लंघनांसाठी ही टक्केवारी वाढवण्यात येणार आहे.

****

राज्यात यंदा २०० कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यापैकी आतापर्यंत १०२ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. गेल्या वर्षाच्या अति पावसामुळे ऊस लागवडीवर परिणाम झाल्याने यंदा गाळपाला आलेला ऊस तुलनेने कमी आहे. राज्यात आतापर्यंत आठ कोटी १४ लाख ९२ हजार टन उसाचं गाळप झालं असून, त्यातून ७६ लाख ४३ हजार टन साखरेचं उत्पादन झालं आहे. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अंदाजानुसार राज्यात यंदा सुमारे ८६ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात २४ लाख टनांची घट अपेक्षित आहे. या महिना अखेरपर्यंत राज्यातला गाळप हंगाम संपण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

****

राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट २५५५ कोटी रुपये विमा नुकसान भरपाई जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला आहे, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली आहे. शासनानं विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून २८५२ कोटी रूपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या अंतर्गत खरीप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ या हंगामांसाठी २ कोटी ८७ लाख, खरीप २०२३ साठी १८१ कोटी, रब्बी २०२३-२४ साठी ६३ कोटी १४ लाख  आणि खरीप २०२४ साठी २३०८ कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार असल्याचं कोकोटे यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्याचं आयोजन करण्यात आलं आहे. १३ ते २४ एप्रिल या कालावधीत पुण्यात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जगातील अव्वल बुद्धिबळ पटू सहभाग नोंदवणार आहेत.

****

२०२५-२६ या वर्षात होणाऱ्या अग्नीवीर भरतीसाठी अविवाहित पुरुष तसंच अविवाहित महिला उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची अधिसूचना जॉईन इंडिया आर्मी डॉट एनआयसी डॉट इन या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार १० एप्रिलपर्यंत यासाठी अर्ज करू शकतात. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घेऊन १० एप्रिलपूर्वी नोंदणी करावी, असं आवाहन बीडचे, निवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कर्नल शरद पांढरे यांनी केलं आहे.

****

संपूर्ण मे महिन्यात संयुक्त महाराष्ट्राचा ६५ वा वर्धापन दिन महाराष्ट्र महोत्सवम्हणून साजरा केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मुंबईत तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं

****

मराठवाड्यातील नागरिक सार्वजनिक समस्यांबाबत जागरूक झाल्याचं, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील ५३ गावांच्या शेतकरी तसंच अन्य नागरिकांची त्यांनी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.या गावकऱ्यांनी दानवे यांच्यासमोर विविध तक्रारी मांडल्या. सदरील सर्व समस्या तातडीने मार्गी लावण्याची सूचना दानवे यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली.

****

बीड तालुक्यातील वासनवाडी फाटा इथं आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजता घडली. प्रेम सतीश क्षीरसागर हे त्याचं नाव असून वासनवाडी गावाजवळ असणाऱ्या तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी उतरला असताना, तळ्यातील गाळात तो अडकला. त्यातून बाहेर येऊ न शकल्याने त्याचा मृत्यू झाला.

****

No comments:

Post a Comment