Saturday, 29 March 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 March 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      वैद्यकीय विद्यार्थ्यांनी ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी सतत शिकत राहावं-राज्यपालांचं आवाहन

·      तुळजाभवानी विकास आराखड्यासाठी तत्काळ निधी जारी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

·      छत्रपती संभाजी महाराज यांना ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमातून अभिवादन

·      आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना जालना पोलिसांकडून अटक

आणि

·      उद्या गुढीपाडवा-विविध साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

****

वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी सतत शिकत राहावं असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला ते आज संबोधित करत होते. विद्यार्थ्यांनी जनुकीय, स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी संबंधित आजारांवर अधिक संशोधन करून उपचारात्मक पद्धती विकसित कराव्यात असं आवाहन राज्यपालांनी केलं.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. पूर्व विदर्भात आढळणाऱ्या थॅलेसेमिया आणि सिकलसेल ॲनिमिया यांसारख्या आजारांवर आधुनिक उपचारांची गरज त्यांनी व्यक्त केली. बोन मॅरो प्रत्यारोपणासारख्या उपचारांना राज्य सरकारच्या योजनांमधून एम्समध्ये सवलत मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधत एम्स नागपूरनं आरोग्य क्षेत्रात बजावलेल्या भूमिकेचं कौतुक केले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत. रेशीमबागेतल्या स्मृती मंदिर इथं डॉ केशव बळिराम हेडगेवार यांना ते आदरांजली वाहतील. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला, त्या दीक्षाभूमीलाही ते भेट देऊन आदरांजली वाहणार आहेत. माधव नेत्रालयाच्या विस्तार केंद्राची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड इथं युद्धपयोगी सामग्री चाचणी तळ आणि यूएव्हीसाठी धावपट्टीचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमातून पंतप्रधान उद्या देशवासियांशी संवाद साधतील. या कार्यक्रम मालिकेतला हा १२० वा भाग आहे.

****

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी तत्काळ निधी जारी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते आज तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर बोलत होते, यावेळी मंदिर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कवड्याची माळ घालून मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला. ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचं तुळजापूर इथल्या हेलिपॅडवर तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, यांच्यासह इतर मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. फडणवीस यांनी मंदिर परिसरात पुरातत्व विभागाकडून सुरू असलेल्या कामांची तसंच मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराची पाहणी केली, तसंच ऐतिहासिक स्तंभ कलाकृतीचं अनावरण केलं. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त आज पुणे जिल्ह्यातल्या वढू बुद्रुक इथं विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन अभिवादन केलं. तुळापूर आणि वढू इथं संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम हाती घेतलं असून त्याचा भव्यतेचा सर्व शंभू प्रेमींना अभिमान वाटेल असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी वर्तवला आहे. ते म्हणाले

बाईट - उपमुख्यमंत्री अजित पवार

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह गाण्यासाठी विनोदवीर कुणाल कामरा याच्याविरोधात मुंबईतील खार पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, जळगाव शहराच्या महापौरांनी एक तक्रार दाखल केली असून, नाशिकमधील एक हॉटेल व्यावसायिक आणि एका उद्योजकानं अन्य दोन तक्रारी नोंदवल्या आहेत. खार पोलिसांनी कामरा याला दोनवेळा चौकशीसाठी बोलावलं, मात्र त्यानं हजेरी लावलेली नाही. आता त्याला पुन्हा परवा ३१ तारखेला खार पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

****

छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत १७ नक्षली ठार झाले. केरलापार पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या जंगलात जिल्हा राखीव दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं काल रात्री नक्षली विरोधी मोहीम राबवली होती. चकमकी दरम्यान सुरक्षा दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले. या कारवाईत ठार झालेल्या १७ नक्षलींचे मृतदेह ताब्यात घेतल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

****

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, वर्षप्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण उद्या साजरा होत आहे. या निमित्तानं ठिकठिकाणच्या बाजारपेठा विविध पूजासाहित्यानं फुलून गेल्या आहेत. गुढी उभारण्यासाठी वेळूच्या काठ्या, वस्त्र, विविध प्रकारची धातुची भांडी, साखरगाठ्या आणि इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाल्याचं दिसून येत आहे.

****

जालना इथं दु:खी राज्य काव्य पुरस्कार आणि ना. धों. महानोर राज्य साहित्य पुरस्काराचं वितरण, तसंच चित्र प्रदर्शन आणि नामवंत कवींची काव्यमैफल अशा त्रिवेणी संगमाची पर्वणी रसिकांना उद्या अनुभवता येणार आहे. दु:खी राज्य काव्य पुरस्काराचं हे २७ विसावं वर्ष असून यावर्षी लासलगाव इथले शेतकरी कवी-गीतकार प्रकाश होळकर यांना दु:खी राज्य काव्य पुरस्कार, तर कोल्हापूरचे ज्येष्ठ लेखक रफीक सूरज यांना ना. धों. महानोर राज्य साहित्य पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. जे. ई. एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

****

बीड इथं श्री संस्थान कोरडे गणपती मंदिर इथं हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवानिमित्त द्राक्ष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात जवळपास ७०० किलो द्राक्षांचा वापर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ही द्राक्षं प्रसाद म्हणून वितरित केली जाणार असल्याचं मंदिर व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आलं आहे.

****

श्री तुळजाभवानी चरणी अज्ञात भक्ताकडून एक किलो १०० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किट अर्पण करण्यात आली आहेत. देवीजींच्या मूळ गाभाऱ्यासमोर असलेल्या चोपदार दरवाजातील सिंहासन पेटी क्रमांक २ मध्ये ही सोन्याची बिस्कीटं आढळली, अशा प्रकारचं दान करतांना भाविकांना सुरक्षित वातावरण मिळावं, तसंच भाविकांचे दान योग्य ठिकाणी जाईल याबाबत मंदिर संस्थानचे सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी योग्य दक्षता घेत असतात. याबद्दल कौतुकाची थाप म्हणून मंदिर संस्थानने कर्तव्यावरच्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार केला.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कालच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना जालना पोलिसांनी आज जालना तसंच हिंगोली इथून अटक केली. गोविंद गुप्ता, सचिन जैन, विशाल बनकर, संतोष लहाने, शेख मुस्तकीन अशी या सर्वांची नावं असून, सर्वजण जालन्याचे रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉपसह इतर साहित्य, असा एकूण आठ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हिंगोली इथूनही काही संशयित आयपीएल सामन्यावंर सट्टा लावत असल्याचं या तपासात समोर आलं आहे.

****

पारंपरिक इंधन आयात करण्यासाठी देशाच्या परकीय चलन गंगाजळीतील मोठा हिस्सा खर्च करावा लागतो. त्यात बचत करण्यासाठी सौर ऊर्जा तसंच अपारंपारिक ऊर्जेच्या अन्य पर्यायांचा वापर करावा, असं आवाहन अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण आणि ऊर्जा दक्षता ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिक वाहन फेरी काढण्यात आली, त्यावेळी सावे बोलत होते. या फेरीत दुचाकी, तीन चाकी रिक्षा, मालवाहू वाहने, अशा विविध ३५० हून अधिक ईलेक्ट्रिक वाहनांनी सहभाग घेतला.

****

No comments:

Post a Comment