Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 31 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
· देशवासियांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्याला सरकारचं प्राधान्य-पंतप्रधानांचं
प्रतिपादन
· रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्षपूर्ती सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
मुंबई दौऱ्यावर
· गुढीपाडवा सर्वत्र उत्साहात साजरा-आज ईद-उल-फित्र;विशेष
नमाजसह स्नेहमिलनाचं आयोजन
आणि
· सोलापूरचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता
****
देशवासियांना उत्तम आरोग्य सुविधा
पुरवण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे. नागपूर इथं काल माधव नेत्रालय संशोधन केंद्राच्या इमारतीची पायाभरणी का
पंतप्रधानांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते.
आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे
नागरिकांना मोफत उपचार दिले जात असून, वैद्यकीय
महाविद्यालयांची संख्या तसंच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा देखील वाढल्या
असल्याचं त्यांनी सांगितलं.
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
संघटन, समर्पण
आणि सेवेची त्रिवेणी भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचं सूत्र ठरणार असून, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी याचा अवलंब
करावा,
असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
डॉ. मोहन भागवत,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना, अनेकांचं जीवन प्रकाशमान करण्याचं काम माधव नेत्रालयानं केलं असून, मोठ्या प्रमाणात नेत्रदान होत असताना अशा प्रकारची संस्था देशात असणं अत्यंत
महत्त्वाचं असल्याचं सांगितलं.
नागपूर इथं रेशीमबाग भागातील स्मृती
मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर तसंच दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांना काल पंतप्रधानांनी अभिवादन केलं. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई
ससाई यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी, स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई
यावेळी उपस्थित होते.
दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि गरजूंसाठी समान हक्क आणि न्यायाच्या व्यवस्थेसह पुढे जाण्याची ऊर्जा
प्रदान करते. एक विकसित आणि सर्वसमावेशक भारत घडवणं हीच बाबासाहेबांना खरी
आदरांजली ठरेल’,
असा संदेश पंतप्रधानांनी अभिप्राय नोंदवहीत लिहिला.
कालच्या या दौऱ्यात पंतप्रधानांनी
नागपूर- अमरावती मार्गावर बाजारगाव परिसरातल्या सोलर एक्सप्लोसीव्ह इथं टेस्ट रेंज
आणि रनवे सुविधेचं उद्घाटन तसंच सोलर ग्रुप द्वारा निर्मित अत्याधुनिक सुरक्षा
यंत्रणेचं अवलोकन केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल
आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या
मालिकेतला एकशे विसावा भाग होता. यावेळी बोलताना त्यांनी, उन्हाळ्याच्या
पार्श्वभूमीवर जलसंवर्धनावर भर दिला. या मोहिमेअंतर्गत गेल्या सात ते आठ वर्षांत
पावसामुळे वाहून जाणारं अकरा अब्ज घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्यात आल्याची
माहिती त्यांनी दिली.
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी आणि
युवा वर्गानं नवी कौशल्यं शिकावीत यावर पंतप्रधानांनी मन की बात मध्ये भर दिला.
आरोग्याविषयी बोलताना त्यांनी दिल्लीतल्या फिट इंडिया कार्निव्हल` विषयी सांगितलं. आपापल्या परिसरात अशा प्रकारचे उत्सव आयोजित करण्याचं आवाहन
त्यांनी केलं. आपल्या सणांतून दिसणारी एकतेची भावना बळकट करायची असल्याचं सांगत
पंतप्रधानांनी,
गुढीपाडवा, ईद यासह विविध सणांच्या
शुभेच्छा दिल्या.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आणि उद्या
मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईत आगमन होईल. उद्या भारतीय
रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभाला राष्ट्रपती
उपस्थित राहणार आहेत.
****
छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या
५० नक्षलवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं. यापैकी १३ नक्षलवाद्यांवर एकूण ६८ लाख
रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबद्दल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला आहे. इतर नक्षलवाद्यांनाही
हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन त्यांनी समाज माध्यमावरून
केलं आहे.
****
वर्षप्रतिपदा, अर्थात
गुढी पाडव्याचा सण काल सर्वत्र उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा झाला. रेशमी
वस्त्र,
कडुनिंब आणि साखरेच्या गाठ्यांच्या माळांनी सजवलेली गुढी
घरोघरी उभारण्यात आली.
मराठवाड्यात विविध सांस्कृतिक
कार्यक्रमांनी गुढीपाडवा साजरा झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं गुढी
पाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. पैठण इथं, सातकर्णी
सम्राट शालिवाहनाच्या प्रसिद्ध तीर्थस्तंभ परिसरातही विशेष कार्यक्रम घेण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावरील
रेणुका देवीच्या चैत्र नवरात्र महोत्सवास गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काल उत्साहात
प्रारंभ झाला. काल दुपारी घटस्थापना करून देवीची महाआरती करण्यात आली.
****
गुढीपाडव्यानिमित्त धाराशिव शहरात सकल
हिंदू समाजाच्या वतीने वाहन फेरी काढण्यात आली. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन करण्यात आलं.
****
जालना इथल्या रुक्मिणी परिवाराच्या
वतीने चैत्र पालवी हा सांगितिक कार्यक्रम काल घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर
इथल्या ध्यास परफॉर्मिंग आर्ट्सच्या संचालक केतकी नेवपूरकर यांच्या
विद्यार्थिनींनी शारदा वंदना आणि श्रीराम स्तुतीवर आधारित नृत्य सादरीकरण केलं
गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक
मुहूर्त मानला जातो. त्यामुळे सोन्या चांदीच्या आभुषणांसह, इलेक्ट्रॉनिक्स
तसंच गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी दुकानांमध्ये काल गर्दी दिसून आली.
****
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी
होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठण करण्यात येणार
आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी देशात
आणि परदेशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना, विशेषतः मुस्लिम
बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. हा उत्सव बंधुता, सहकार्य
आणि करुणेचा संदेश देतो, असं त्यांनी आपल्या संदेशात
म्हटलं आहे.
यानिमित्त लातूर शहरात वाहतुकीत बदल
करण्यात आला आहे. बार्शी रोडवरील इदगाह मैदानावर नमाज पठणासाठी गर्दी होत असल्याने
सकाळी सात ते अकरा या वेळेत वाहतुक मार्गात बदल
राहील असं प्रशासानानं कळवलं आहे.
****
सोलापूरचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी
कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत इथं काल झालेल्या
अंतिम लढतीत शेळके यानं मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याच्यावर सात गुणांनी मात केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वेताळ शेळके याला मानाची गदा प्रदान करण्यात
आली.
****
जॉर्डनमध्ये अम्मान इथं सुरु आशियाई
कुश्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू उदित आणि दीपक पुनिया यांनी फ्रीस्टाईल प्रकारात
अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उदितनं चीनच्या वानहाओ झोउचा २-० असा, तर दीपक पुनियानं जपानच्या ताकाशी इशिगुरोचा ८-१ असा पराभव केला. पुरुषांच्या
फ्रीस्टाइलमध्ये ८६ किलो वजनी गटात मुकुल दहियानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग- आयपीएल क्रिकेट
स्पर्धेत काल गुवाहाटी इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर
किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. तर अन्य एका सामन्यात दिल्ली कॅपिल्सने
सनराईजर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स
आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे.
****
भारताच्या निहाल सरीननं उझबेकिस्तानच्या
ताश्कंद इथं ताश्कंद खुल्या अग्झामोव स्मारक बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं
आहे. वीस वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरनं दहापैकी आठ गुणांसह हे विजेतेपद मिळवलं. या
विजयामुळं निहालला ७.१ दशांश एलो रेटिंग गुण प्राप्त झाले आहेत.
****
लातूर पोलीस दलातर्फे काल घेण्यात
आलेल्या मॅरेथॉनमध्ये सुमारे आठ हजार धावपटुंनी सहभाग घेतला. वाढती सायबर
गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात जनजागृतीसाठी ही मॅरेथॉन
काढण्यात आली.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राज्य
पोलिस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांच्या सामाजिक कार्यावर
आधारित मराठी माहितीपट `इदं द मम’चं लोकार्पण काल
छत्रपती संभाजीनगर इथं झालं. या माहितीपटाचे लेखक, दिग्दर्शक
दत्ता जोशी यावेळी उपस्थित होते.
****
उन्हाळी सुट्यांची गर्दी लक्षात घेता
नांदेड-हजरत निझामुद्दीन-नांदेड विशेष गाडीच्या २६ फेऱ्या होणार असल्याची माहिती
दक्षिण मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली. ही गाडी पाच एप्रिल ते २८ जून दरम्यान दर
शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी दोन वाजता
निझामुद्दीन इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सहा एप्रिल ते २९ जून दरम्यान
धावेल. या गाडीचं आरक्षण कालपासून सुरु झालं.
****
राज्यात काल सर्वात जास्त ४२ अंश
सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३८
पूर्णांक चार,
तर परभणी इथं ३९ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
झाली. पुढचे दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस
पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment