Wednesday, 5 March 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 05 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं विधानसभेतून अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभेत आज यासंदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला, त्याला सभागृहाने संमती दिली. 

****

राज्यातल्या वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर लावण्यावर बंदी आहे, त्याऐवजी पोस्टपेड सिस्टीम मीटर लावले जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. आधी सगळे फिडर आणि ट्रान्सफॉर्मर वर हे सिस्टम मीटर लावू नंतर ग्राहकांना हे मीटर लावले जातील, लवकरच याचं वेळापत्रक जाहीर करू, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांना अटक झाली त्या संगमेश्वर इथल्या सरदेसाई वाड्यात त्यांचं स्मारक उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

****

पंचायत राज राज्यमंत्री एस.पी.सिंह बघेल तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित एका राष्ट्रीय संमेलनात, आदर्श महिला-अनुकूल ग्राम पंचायत योजनेची सुरुवात केली. यावर्षीच्या महिला दिनाच्या औचित्यानं ही योजना मंत्रालयानं सुरू केली आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक आदर्श महिला-अनुकूल ग्राम पंचायत स्थापन करणं, हा या योजनेचा उद्देश आहे.

****

शासकीय कार्यालयांमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी द्यावं लागणारं पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यामुळे, जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह इतर सर्व प्रकारची प्रमाणपत्रं आता एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित अर्थात सेल्फ अटेस्टेड अर्ज करून मिळू शकतील. दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी लागणारा एकूण तीन ते चार हजारांचा खर्च या निर्णयामुळे वाचणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले आहेत.

****

शेतकऱ्यांनी थकीत पीक कर्जाचं नुतनीकरण ३१ मार्चपर्यंत पूर्ण करुन घ्यावं, त्यासाठी संबंधित बॅंकेशी संपर्क साधण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात आतापर्यंत पीक कर्ज वाटप झालेल्या चार लाख २१ हजार शेतकऱ्यांपैकी एक लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी नुतनीकरण केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. २०२५-२६ या वर्षाचा १४ हजार ८२८ कोटी रुपयांच्या वार्षिक पतआराखड्याला यावेळी मंजुरी देण्यात आली.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आणि सेनगाव तालुक्यात प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणलोट कामांविषयी जनजागृती करण्यासाठी नऊ तारखेपासून वॉटरशेड यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा कळमनुरी आणि सेनगाव तालुक्यातल्या सहा गावात जाणार असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आज शिरुर तालुक्यात बंद पाळण्यात येत आहे. काल बीड आणि केज तालुक्यात कडकडीत बंद पाळून नागरीकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.

****

 

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात दहा मार्च रोजी विभागीय लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हास्तरावरील सर्व प्रश्नांची सोडवणूक यावेळी करण्यात येणार आहे. विभागीय लोकशाही दिन संपल्यानंतर पिडीत महिलांसाठी विभागीय माहिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आल्याचं, विभागीय आयुक्त कार्यालयानं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

नांदेड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोन च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. परभणी - नांदेड एक्स्प्रेस आज, उद्या तसंच आठ आणि नऊ मार्चला, तर नांदेड - औरंगाबाद एक्स्प्रेस सात मार्चला रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रवाशांची मागणी लक्षात घेवून राजकोट- मेहबूब नगर - राजकोट विशेष गाडीच्या १८ फेऱ्या करण्याचं नियोजन दक्षिण मध्य रेल्वेनं केलं आहे. ही गाडी राजकोट इथून मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या प्रत्येक सोमवारी दुपारी पावणे दोन वाजता सुटेल आणि महबूबनगर इथं दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मेहबूबनगर इथून ही गाडी मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी सुटेल.

****

No comments:

Post a Comment