Tuesday, 18 March 2025

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १८ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 18 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातल्या लोकांनी संयम राखवा, एकमेकांप्रती आदर बाळगावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूरमध्ये काल उद्भवलेल्या घटनेसंदर्भात आज त्यांनी विधानसभेत निवेदन दिलं. राज्यात पोलिसांवर हल्ला सहन करणार नाही, कायदा आणि सुव्यवस्था कोणालाही हाती घेऊ देणार नाही, दंगा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नागपूरमधली ही घटना पूर्वनियोजित असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना या घटनेचा निषेध केला. ही घटना एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी पूर्वनियोजित असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, या घटनेमध्ये ३४ पोलिसांना दगडफेकीमध्ये दुखापत झाली असून, पाच नागरिकांनाही इजा झाली आहे. ४५ वाहनांची तोडफोड झाली असून, याप्रकरणी पोलिसांनी ४० ते ४५ जणांना अटक केली असल्याची माहिती, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. ज्यांनी अफवा पसरवली त्यांचा शोध सुरु आहे, ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशीच सरकारची भूमिका असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

दरम्यान, या घटनेवरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांच्या परिसरात अशा प्रकारची घटना घडणं ही यंत्रणेचं अपयश असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. आज विधिमंडळात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, युती सरकार सत्तेत आल्यानंतर समाजातलं वातावरण बिघडत असल्याचा आरोप केला.

पोलिसांवर दबाव असल्यामुळे ते योग्य काम करत नसल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

नागपूरमध्ये उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रविंदर सिंघल यांनी शहरातल्या काही ठिकाणी संचारबंदीचं कलम १६३ लागू केलं आहे. काल संध्याकाळच्या सुमारास धार्मिक प्रतिकांची कथित तोडफोड झाल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, यात दगडफेक करण्यात आली, तसंच काही गाड्या जाळण्यात आल्या.

****

राज्यातल्या छोट्या गुंतवणुकदारांचे पाच लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित रहावे यासाठी फसवणूक करणाऱ्या मल्टिस्टेट पतसंस्थांना देखील सहकारी बँकांप्रमाणे संरक्षण द्यावं, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सदस्य प्रकाश सोळंके, नाना पटोले, बबनराव लोणीकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.

बीड जिल्ह्यातल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेकडून फसवणूक झालेल्या सहा लाख ठेवीदारांचे पैसे हे जप्त करण्यात आलेल्या ८० मालमत्तांचा लिलाव करून परत केले जातील, असं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेतल्या लाभार्थ्यांना यापुढे पंतप्रधान आवास योजनेतल्या घरकुलांचे लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं, इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य नाराय कुचे यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.

राज्यातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून सकस, स्वच्छ आणि ताजं अन्न दिलं जात आहे, अशी माहिती या विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी दिली. पूर्वी देत असलेल्या अन्नाबद्दल अनेक तक्रारी आल्यानं ही सेंट्रल किचनची संकल्पना राबवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

विधानपरिषदेत आज सकाळच्या विशेष सत्रात राज्यातल्या पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक तसंच गृहनिर्माण, पुनर्विकास प्रकल्प, प्रदूषण यांसारख्या मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम २६० अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावांवर एकत्रित चर्चा झाली. भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेला सुरुवात करताना, राज्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीत विरोधकांकडून अडथळे आणण्यात आल्याची टीका केली. महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातही उद्योग सुरू होत आहेत. उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे गुंतवणूक देखील वाढली अशल्याचं ते म्हणाले.

****

उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं नुकत्याच झालेल्या महाकुंभमेळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं. जनतेचा, जनतेसाठी हा कुंभमेळा होता, असं ते म्हणाले. या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांनी, जनतेचे विशेषत: प्रयागराज मधल्या नागरिकांचे आभार मानले.

****

केंद्र सरकारने राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पंधराव्या वित्त आयोगाचं अनुदान जारी केलं आहे. सुमारे ६२० कोटी रुपयांचं हे अनुदान चार जिल्हा परिषदा, ४० पंचायत समित्या आणि २१ हजार पाचशे ५१ ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात येणार आहे. स्वच्छता, घरगुती कचरा व्यवस्थापन आणि प्रक्रिया, पाणी पुरवठा, पावसाच्या पाण्याची साठवणूक आणि पाण्याचा पुनर्वापर या कामांसाठी हा निधी खर्च करण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र परस्परांना जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेबाबत विचारविनिमय करण्यासाठी निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत एक महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मतदार ओळखपत्र आणि आधारकार्ड परस्परांना जोडण्याविषयीच्या चर्चेसह या संदर्भातल्या विविध पैलूंवर विचारविनिमय करण्यात येणार आहे. आधार प्रक्रियेमुळे बनावट ओळखीला आधीपासूनच चाप बसला आहे.

****

No comments:

Post a Comment