Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 April 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ एप्रिल
२०२५ दुपारी १.०० वा.
****
डिजिटल आर्थिक व्यवहारांमध्ये भारताला जागतिक
पातळीवर अग्रणी बनवण्यात भारतीय रिझर्व्ह बँकेनं महत्वाची भूमिका बजावल्याचं, राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्षपूर्ती
सोहळ्याचा समारोप राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
नाबार्ड, आयडीबीआय आणि नॅशनल हाऊसिंग बँक यासारख्या संस्था स्थापन करून भारतीय रिझर्व्ह
बँकेनं देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी दिल्याचं, तसंच भारताच्या आर्थिक
विकासात रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची भूमिका असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. यावेळी
त्यांनी आरबीआयच्या आर्थिक स्थैर्य राखण्याच्या कार्याची महत्त्वपूर्ण दखल घेतली. आर्थिक
उदारीकरण, कोविड संकट आणि शेतकरी,
लघू उद्योगांना दिलेल्या आधाराबद्दल देखील राष्ट्रपतींनी यावेळी
भाष्य केलं.
या समारंभाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, रिझर्व्ह
बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे,
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, बँकेच्या नव्वदाव्या
वर्षानिमित्त सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर आणि सक्षम करण्यासाठी वर्षभर
कार्यक्रम आणि मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी
प्रश्नमंजुषा तसंच विविध क्रीडा स्पर्धाही घेण्यात आल्या.
****
नक्षलवाद मुक्त भारत घडवण्याच्या दृष्टीनं
सरकारनं मोठी प्रगती केली असून, नक्षलप्रभावित जिल्ह्यांची संख्या बारा वरुन
सहा झाली असल्याचं,
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नक्षलवादाविरोधात
कठोर कारवाई करत एक सशक्त,
सुरक्षित आणि समृद्ध भारत घडवणं आणि देशाचा सर्व व्यापक विकास
करणं, यासाठी सरकार काम करत असल्याचं, त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे. पुढच्या वर्षाच्या मार्च अखेरपर्यंत देशातून नक्षलवादाचं समूळ
उच्चाटन करण्याचा सरकारचा निश्चय असल्याचंही शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे.
****
वक्फ सुधारणा विधेयकाचं उद्दिष्ट कोणाची
संपत्ती जप्त करणं,
हे नसून, न्याय देणं, हे
आहे, असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. आज संसदभवनाच्या बाहेर पत्रकारांशी
संवाद साधताना त्यांनी,
याबाबतीत विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला.
दुसरीकडे, काँग्रेस खासदार उज्ज्वल रामन यांनी, हे विधेयक घाईगडबडीनं पारित
न करता यावर विस्तृत चर्चा व्हायला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.
****
भारताच्या व्याघ्र प्रकल्पाला आज बावन्न
वर्षं पूर्ण झाली आहेत. १९७२ साली आजच्या दिवशी तात्कालीन सरकारनं देशभरातल्या वाघांच्या
घटत्या संख्येमुळे व्याघ्र संरक्षणासाठी ही योजना सुरू केली होती. वन्यजीव संरक्षणाच्या
जगभरातल्या सर्वात यशस्वी प्रकल्पामध्ये आता भारताच्या या प्रकल्पाची गणना होते.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक
डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची आज जयंती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर हेडगेवार यांना आदरांजली वाहिली.
****
व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या
किंमतीत तेल कंपन्यांनी कपात केली आहे. यानुसार दिल्लीत प्रती सिलिंडरच्या किमतीत ४१
रुपये, कोलकाता मध्ये ४४ रुपये ५० पैसे, तर मुंबईत ४३ रुपये ५० पैशांची
कपात करण्यात आली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या
लातूर विभागात बी एस-6 मानांकनाच्या अत्याधुनिक पाच नव्या एसटी बस दाखल झाल्या आहेत. याचा लोकार्पण सोहळा
भाजप नेत्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या हस्ते काल लातूर बस स्थानकात झाला. येत्या
काळात आणखी पाच बसेस लातूर विभागात दाखल होतील, असं त्यांनी सांगितलं.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव इथल्या पद्मभूषण
बाळासाहेब भारदे हायस्कुलचे उपक्रमशील शिक्षक उमेश घेवरीकर यांच्या शेती आणि शिक्षण
यांचे महत्व अधोरेखित करणाऱ्या ‘गुरुदक्षिणा’ या
लघुपटाला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार काल शिलाँग इथं प्रदान करण्यात
आला. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तसंच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन
संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय बाल शैक्षणिक इ-कंटेंट स्पर्धा आयोजित
करण्यात आली होती.
****
बिहारमध्ये हॉकी इंडियाच्या सहकार्याने १२
व्या पुरुष हॉकी हिरो आशिया चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. पाटण्यामध्ये काल
यासंदर्भात हॉकी इंडिया आणि बिहार राज्य क्रीडा प्राधिकरण यांच्यात एक सामंजस्य करार
झाला. ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान आयोजित केली जाणार आहे. दक्षिण
कोरिया, भारत आणि पाकिस्तान यासारख्या आशियातल्या विविध देशांमधले एकूण आठ संघ या स्पर्धेत
सहभागी होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment