Wednesday, 16 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 16 April 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीने काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या प्रकरणी या दोन नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून आज देशभर आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपनं काँग्रेसवर टीका केली असूनची काँग्रेसचा आरोप तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस सरकारच्या काळातच हा खटला दाखल झालं असून, राजकारण करण्याचा कोणताही अधिकार काँग्रेसला नाही असं भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटलं आहे. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी यावेळी बोलताना, काँग्रेस पक्षाकडून ईडीला धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. यंग इंडिया संघटनेच्या नावाखाली पक्षाने बेकायदेशीरपणे जमीन मिळवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****

वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारने कॅव्हिएट दाखल केलं असून, कायदा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर या सुनावणीत चर्चा होईल. पाच एप्रिलला संसदेत मंजूर झालेला हा कायदा आठ एप्रिलपासून देशभरात लागू झाला.

****

छत्तीसगडच्या बस्तर भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले. दोन्ही नक्षलवाद्यांवर पोलिसांकडून १३ लाख रुपयांचं बक्षीस होतं. काल संध्याकाळी कोंडागाव आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील किलम-बरगम गावांच्या जंगलात जिल्हा राखीव रक्षक दलाचं पथक नक्षलवादविरोधी कारवाईवर असतांना ही चकमक झाली. घटनास्थळावरून एक एके-४७ रायफल आणि इतर शस्त्रे तसच स्फोटकं जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्हज परिषद ही जागतिक मनोरंजन परिसंस्थेला जोडण्यासाठी उचललेलं क्रांतिकारी पाऊल असल्याचं, प्रतिपादन अभिनेता आमीर खान यानं एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना केलं आहे. मनोरंजन क्षेत्रातल्या व्यावसायिकांना व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तसंच नवीन संधींच्या शोधात असलेल्यांना यात सहभागी होता येत आहे. त्यामुळे वेव्हज बाजार हा माध्यम आणि मनोरंजन उद्योगांसाठी व्यवसायवाढीचं केंद्र बनल्याचं आमीर खान याने म्हटलं आहे.

****

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामं कमी केली जाणार असून, येत्या वर्षभरात शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाल्याचं दिसून येईल, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शालेय शिक्षण विभाग सदैव समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठिशी असल्याचं, ते म्हणाले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईचा अभ्यासक्रम स्वीकारताना राज्य शिक्षण मंडळ कायम राहणार असून, नवीन अभ्यासक्रमात मराठी भाषा, राज्याचा इतिहास, भूगोल यांच्याशी तडजोड केली जाणार नसल्याचं भुसे यांनी स्पष्ट केलं.

****

राज्यातल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यायच्या एफ आर पी बाबत राज्यशासनानं २१ फेब्रुवारी २०२२ ला जारी केलेला शासन निर्णय रद्द केला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. ऊसाच्या एफआरपीसंदर्भात शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि इतरांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाच्या आदेशामुळे हा निर्णय घेण्यात आला.

****

राज्यातला ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून, बहुतांश कारखान्यांनी ऊस गाळप बंद केलं आहे. यंदाच्या गाळप हंगामासाठी ३१ मार्चअखेर साखरेचं उत्पादन ८० लाख २६ हजार टनपर्यंत पोहोचलं आहे, मागील हंगामाच्या तुलनेत या वर्षी साखरेचं उत्पादन सुमारे ३० लाख मेट्रिक टन कमी आहे. साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार राज्यातल्या एकूण १९२ साखर कारखान्यांनी ऊस गाळप समाप्त केलं आहे.

****

हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून राहुल गुप्ता यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या‌ मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड आदींनी गुप्ता यांचं स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी जिल्हा यंत्रणेच्या विविध प्रमुखांशी संवाद साधला.

****

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’कडून सुरू करण्यात आलेल्या पर्यटन रेल्वे सेवेच्या अंतर्गत येत्या सतरा तारखेला पुण्याहून ‘उत्तर भारत देवभूमि यात्रा’, ही विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. हरिद्वार, हृषीकेश, कटरा, मथुरा आणि वृंदावन, यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देऊन दहा दिवसांनी ती पुन्हा पुण्यात येणार आहे. या गाडीची आसनक्षमता साडेसातशे असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, या तत्वानुसार आरक्षण देण्यात येणार आहे.

****

बीड तालुक्यात नवगण राजुरी इथं परवा शुक्रवारी कुस्त्यांचे सामने खेळवले जाणार आहेत. सय्यद जानपीर उर्सनिमित्त आयोजित या कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातले तसंच जिल्ह्याबाहेरील कुस्तीगीर मल्लांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

****

पेरु इथं आयोजित ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने काल प्रत्येकी एक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली.

****

No comments:

Post a Comment