Wednesday, 16 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 April 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      महाज्ञानदीप’ या देशातील पहिल्या डिजिटल शिक्षण पोर्टलचं अनावरण-महाराष्ट्राची डिजिटल शिक्षणाच्या दिशेनं वाटचाल सुरू

·      एसटी प्रवाशांना किफायतशीर सुविधा न देणारे हॉटेल-मोटेल थांबे रद्द करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

·      राज्यातल्या तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या स्थापन

आणि

·      अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार-मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

****

शैक्षणिक सुविधा लोकाभिमुख करण्यासाठी ‘महाज्ञानदीप’ या देशातील पहिल्या डिजिटल शिक्षण पोर्टलचं आज मंत्रालयात उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं, डिजिटल शिक्षणाच्या दिशेनं महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असल्याचं प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केलं. महाज्ञानदीप’ उपक्रमांतर्गत एक हजार तज्ज्ञ प्राध्यापक घडवण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत दिडशे प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून, त्यांनी भारतीय ज्ञान प्रणाली – जेनेरिकहा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार केल्याची माहिती पाटील यांनी दिली.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा न देणारे हॉटेल-मोटेल थांबे रद्द करण्याचे निर्देश, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गावर एसटीच्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसांत सादर करण्याची सूचना सरनाईक यांनी केली. प्रवाशांच्या आरोग्याशी तडजोड न करता अशा थांब्यावर कारवाईचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी एसटी प्रशासनाला दिले.

****

अमरावती विमानतळाचं लोकार्पण आज केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या विमानतळावरच्या प्रवासी सेवेलाही प्रारंभ झाला असून पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं. यावेळी एअर इंडिया उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या विमान उड्डाणाची प्रात्यक्षिकंही सादर करण्यात आली.

****

राज्यातल्या तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या गठित करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. या समित्या फडमालक आणि कलावंतांच्या समस्या समजून घेऊन, उपाययोजना सुचवतील, अशी माहिती शेलार यांनी दिली.

****

राज्यात येत्या २२ ते २५ एप्रिल या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव राबवण्यात येणार आहे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. या महोत्सवात आदर्श गावही संकल्पना राबवण्यात येणार असून, शासनाच्या सर्व विभागांनी तसंच जिल्हास्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा, असे निर्देश लोढा यांनी दिले.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातली कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती येत्या ३१ मे रोजी साजरी होणार असून, त्यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते. चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, असंही शिंदे यांनी सूचित केलं आहे.

****

मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची कर्मभूमी असलेलं अंबाजोगाई हे कवितांचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज बीड इथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. अमरावती इथल्या नियोजित मराठी विद्यापीठाची सहा उपकेंद्रं राज्यभरात होणार आहेत, त्यापैकी एक उपकेंद्र अंबाजोगाई इथं व्हावं, अशी विनंती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. मुकुंदराजांच्या विवेकसिंधू या ग्रंथाची शासनामार्फत उपलब्धता तसंच राज्य शासनाच्या विविध वाङ्गमय पुरस्कारांमध्ये मुकुंदराजांच्या नावे पुरस्कार देण्यासंदर्भातही सामंत यांनी माहिती दिली, ते म्हणाले

बाईट – उदय सामंत, मराठी भाषा मंत्री

 

प्रसिद्ध साहित्यक दगडू लोमटे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत, या निर्णयामुळे वाचन संस्कृतीला अधिक चालना मिळेल, तसंच वाचकांना आणि मराठी साहित्याच्या अभ्यासकांना याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले

बाईट – दगडू लोमटे

 

अंबाजोगाईत गेली वीस वर्ष पुस्तक वाचक चळवळ चालवणारे आणि त्यातूनच पुस्तकपेटी उपक्रम राबवणारे अभिजीत जोंधळे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. हा समस्त वाचक वर्गाला आनंद देणारा निर्णय असल्याचं जोंधळे यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट – अभिजीत जोंधळे

दरम्यान, बीड इथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा गुंतवणूक परिषद घेण्यात आली. या परिषदेच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांनी ९०० कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून असंख्य रोजजगार निर्मिती होईल, असा विश्वास उद्योगमंत्री सामंत यांनी वर्तवला. बीड इथं कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

****

नांदेडच्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातल्या अनुसूचित जाती आणि नवबौध्द विद्यार्थांची शैक्षणिक सहल आज नांदेडहून श्रीहरिकोटाकडे रवाना झाली. माहूर, हदगाव, उमरी, नायगाव तालुक्यातले ६० विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले आहेत. १६ ते १९ एप्रिल दरम्यान या विद्यार्थ्यांचा हा अभ्यास दौरा असणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाणीप्रश्नी आंदोलन करण्यात येत आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या आंदोलनादरम्यान विविध ठिकाणच्या भिंतीवर पाणी समस्येसंदर्भातल्या घोषणा, रिकाम्या हंड्यांचे तोरण लावून सरकारचे लक्ष वेधलं जात आहे.

****

राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर इथं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या परीक्षेतील कायदेशीर आणि तांत्रिक त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना मुबलक वेळ देण्यात यावा, किमान ४५ दिवस ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थांनी केली आहे.

****

नांदेड पोलीस परिक्षेत्रीय कार्यालयाच्या संकेतस्थळाचं आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते लोकार्पण झालं. या संकेतस्थळामुळे पोलीस विभाग समाजाभिमुख होईल असा विश्वास कुलगुरू चासकर यांनी व्यक्त केला.

****

मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचं नाव देण्यात येणार आहे. इतर दोन स्टँडला बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि माजी क्रिकेटपटू दिवंगत अजित वाडेकर यांची नावं देण्यात येणार आहेत. यापूर्वी या स्टेडीयमच्या काही स्टँडचं क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विजय मर्चंट आणि दिलीप वेंगसरकर या दिग्गजांच्या नावे नामकरण करण्यात आलेलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेच्या गुंटकल विभागात रेल्वेच्या कामांसाठी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अमरावती तिरूपती अमरावती ही गाडी पाच ते सतरा मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर अकोला तिरूपती अकोला ही गाडी काही दिवस मार्ग बदलून धावणार आहे.

दरम्यान, औरंगाबाद- गुंटूर ही रेल्वेगाडी आज आपल्या नियमित वेळेऐवजी चिकलठाणा स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटणार आहे.

****

हवामान

राज्यात आज सर्वाधिक ४३ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ४० पूर्णांक आठ अंश, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक सहा अंश तर परभणी इथं ४१ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Post a Comment