Thursday, 17 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.04.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 17 April 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचं उच्चाटन होईल आणि यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल - सीआरपीएफची महत्वपूर्ण भूमिका असेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशातल्या नीमच इथं आज सीआरपीएफच्या ८६व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोबरा बटालियनचे सैनिक देशाला नक्षलमुक्त बनवण्यासाठी कार्य करत असून, त्यांच्या साहसाच्या बळावरच नक्षलमुक्त भारताचा संकल्प पूर्ण होईल, असं शहा म्हणाले. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांशी लढण्यात, ईशान्येकडील राज्यात शांतता राखण्यात आणि नक्षलवाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच विशेष योगदान असल्याचं, त्यांनी नमूद केलं. तत्पूर्वी शाह यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव उपस्थित होते.

****

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उद्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी साडेचार वाजता विशेष विमानाने ते शहरात पोहोचतील, सिडको परिसरातल्या कॅनॉट इथल्या उद्यानात उभारण्यात आलेल्या शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते उद्योजकांशी संवाद साधतील. त्यानंतर ते विशेष विमानाने लखनऊ कडे रवाना होणार आहेत.

****

सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा विधेयक २०२५ बाबत आज सुनावणी सुरू राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या पीठानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी केंद्र सरकारनं वेळ मागून घेतल्यानं काल दिला जाणारा निर्णय स्थगित करण्यात आला होता. वक्फ मंडळांचे आणि केंद्रीय वक्फ परिषदेचे सर्व सदस्य मुस्लिमच असायला हवेत, असा आदेश देणार असल्याचं पीठानं स्पष्ट केलं.

****

अमरावतीमधून विमानसेवा सुरु झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अमरावती विमानतळ आणि उडान अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेअंतर्गत अमरावती - मुंबई प्रवासी विमानसेवेचा काल प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी, या विमानतळामुळे या भागात अर्थव्यवस्थेला आणि दळणवळणाला चालना मिळेल, असं म्हटलं आहे.

****

शेतीविषयक विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती विभागातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात सानुग्रह अनुदानाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात वर्ष २००६ ते २०१३ दरम्यान सरळ खरेदीनं झालेल्या भूसंपादनात जमिनीचा कमी मोबदला मिळालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता दिली असून, हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केलं जाईल असं त्यांनी सांगितलं.

****

माजलगाव मतदारसंघातल्या वीज, रस्ते आणि आरोग्य विषयीच्या समस्या गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केल्या आहेत. माजलगाव विधानसभा मतदारसंघातल्या विविध समस्यांबाबत घेतलेल्या एका बैठकीत त्या बोलत होत्या. माजलगाव परिसरातल्या ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणं, नवीन उपकेंद्रांची उभारणी, जीर्ण झालेल्या वीजवाहिन्यांची पुनर्बांधणी करणं, आदी कामं समाधानकारक असून उर्वरित कामं गतीने पूर्ण करण्याचे निर्देश, त्यांनी यावेळी दिले.

****

लातूर जिल्ह्यात विविध गावात पोषण पंधरवाड्यानिमित्त गर्भवतींसह ग्रामस्थांना विविध कार्यक्रमातून माहिती दिली जात आहे. साई गावातल्या ग्राम दरबारात काल झालेल्या कार्यक्रमात १४ गर्भवतींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

पोषण पंधरवड्याच्या माध्यमातून गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. जन्माला येणारं बाळ कुपोषित राहू नये, तसंच नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी याअंतर्गत विविध उपाययोजना केल्या जात असल्याचं, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी यावेळी सांगितलं. पोषण पंधरवड्यात भेटणारी माहिती आणि किटमुळे आपणास फायदा झाल्याचे क्रांती पवार या गर्भवतीने स्पष्ट केलं.

****

नांदेड इथं जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात काल दुसऱ्या दिवशी गुणनियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्ह्यातल्या जलव्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत विविध मान्यवर तसंच शेतकरी, पाणी वाटप संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विभागस्तरावरील शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. आज याअंतर्गत विविध कार्यालयांमध्ये स्वच्छ आणि सुंदर माझे कार्यालय तसंच जलपूर्नभरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

****

जल व्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असून, याअंतर्गत येत्या २२ तारखेला उपसा सिंचनाच्या पाणी परवाना तक्रारींचं निवारण केलं जाणार आहे. लाभक्षेत्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

No comments:

Post a Comment