Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 April 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ एप्रिल
२०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा
विधेयक २०२५ बाबत आज सुनावणी सुरू राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचं तीन
न्यायमूर्तींचं पीठ काल या विधेयकाबाबत अंतरिम आदेश देणार होतं, मात्र
पीठानं विचारलेल्या तीन प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी केंद्र सरकारनं वेळ मागून
घेतल्यानं तो निर्णय स्थगित करण्यात आला. वक्फ मंडळांचे
आणि केंद्रीय वक्फ परिषदेचे सर्व सदस्य मुस्लिमच असायला हवेत, असा
आदेश देणार असल्याचं पीठानं स्पष्ट केलं.
****
भविष्यातल्या आजाराच्या साथींकरता जगाला
सज्ज करण्यासाठी WHO
अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांनी एका
ऐतिहासिक कराराला अंतिम स्वरुप दिलं. नियमन, परवाना करार, आणि
अनुकूल वित्तीय शर्तींद्वारे तंत्रज्ञानाच्या हस्तांतराला प्रोत्साहन देण्याचं
आवाहन या करारात केलं आहे. पुढच्या महिन्यात जागतिक आरोग्य परिषदेत या
प्रस्तावांवर विचार होईल.
****
गेल्या आर्थिक वर्षात ग्राहक किंमत
निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर चार पूर्णांक सहा दशांश टक्यांपर्यंत खाली
आला असल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. गेल्या सहा वर्षातला हा निचांकी
दर आहे. दरवाढीला आळा घालतानाच अर्थिक वाढीला चालना देण्यासाठी केलेल्या
सातत्यपूर्ण प्रयत्नांचं प्रतिबिंब या आकडेवारीतून दिसतं, असं
सांगत, यासाठी रिझर्व्ह बँकेनं बजावलेल्या भूमिकेची प्रशंसा अर्थ मंत्रालयानं केली
आहे.
****
दररोज उच्चांकी पातळी गाठण्याची चढाओढ
सोन्या- चांदीच्या दरात कायम आहे. सोनं आणि चांदी काल सुमारे दीड हजार रुपयांनी
महाग झालं. मुंबईच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोनं ९७ हजार ४१७ रुपये तोळा, २२
कॅरेट सोनं ९५ हजार रुपये तोळा, तर चांदी सुमारे ९९ हजार ५०० रुपये किलो
दराने मिळत होती. भारतीय वायदे बाजारात सोन्यानं पहिल्यांदाच ९५ हजार रुपयांची
पातळी ओलांडली आहे.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना जमीन मालकीचा
पुरावा तसंच ओळख क्रमांक देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे. या
योजनेचा आतापर्यंत ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. राज्यातल्या
प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या ७५ टक्के लाभार्थ्यांना ओळख क्रमांक देण्यात
आल्याची माहिती पुणे भूमी अभिलेख संचालक डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली.
अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना ओळख क्रमांक दिले असून त्यानंतर पुणे
जिल्ह्याचा क्रमांक आहे.
****
संवाद मराठवाड्याशी या उपक्रमाअंतर्गत
विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल शेतकऱ्यांशी वेबिनारद्वारे थेट संवाद साधून, शेतरस्ते शिव रस्ते, पाणंद रस्ते याबाबतच्या समस्या जाणून घेतल्या. अतिक्रमित आणि बंद झालेले शेत
रस्ते, पाणंद रस्ते गाव
नकाशाप्रमाणे मोकळे करुन देण्यासाठी तालुका पातळीवर सस्ती अदालत उपक्रम राबवण्याचे
निर्देश गावडे यांनी दिले. शेतकरी बांधवांनी शेतरस्ते मोकळे देण्यासाठीच्या या
उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहनही गावडे यांनी केलं.
****
राज्य सरकारने शिवजयंतीची सुट्टी जाहीर
करावी, त्याचप्रमाणे राजभवनात शिवस्मारक उभारावं, असं आवाहन माजी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी केलं. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या
निर्धार मेळाव्यात ते काल बोलत होते. आमच्या पक्षानं कोणत्याही प्रकारे हिंदुत्व
सोडलेलं नाही. राज्यात मराठी म्हणून तर देशामध्ये हिंदुत्ववादी म्हणूनच आम्ही
ओळखले जातो,
असं ते म्हणाले. राज्यात पुन्हा मतपत्रिकांच्याद्वारे मतदान
घेतलं तर सत्तेत येऊ असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातल्या
हाडोळी इथं एक दिवस गावकऱ्यांसाठी या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकरी
आणि महिलांच्या सामूहिक प्रयत्नातून गावांचा कायापालट शक्य असल्याचं, त्या
यावेळी म्हणाल्या. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी चार
बचत गटांना एकूण १३ लाख ६० हजार रुपयांचा धनादेश कावली यांच्या हस्ते प्रदान
करण्यात आला.
****
भूजल पुनर्भरणासाठी जलतारा अभियान
मोठ्या प्रमाणात राबवणारा राज्यात वाशिम जिल्हा एकमेव असून, या
अभियानासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगाने
जिल्ह्यातल्या सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वत्सगुल्म जलतारा स्पर्धा २०२५
अंतर्गत जिल्हा प्रशासन वाशिमच्या वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल पाणीप्रश्नी आंदोलन करण्यात आलं. विधान
परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे
यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनादरम्यान विविध ठिकाणच्या भिंतीवर पाणी
समस्येसंदर्भातल्या घोषणा,
रिकाम्या हंड्यांचे तोरण लावण्यात आले.
****
पेरु मध्ये सुरु असलेल्या जागतिक
नेमबाजी संघटनेच्या म्हणजे आय एस एस एफ च्या विश्वकरंडक स्पर्धेत आज महिलांच्या
स्किट स्पर्धेत भारताची रायझा धिल्लों अंतिम स्पर्धेत कौशल्य दाखवणार आहे. काल या
स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात भारताचे इंदरसिंग सुरूची आणि सौरभ
चौधरी यांनी सुवर्णपदक जिंकलं.
****
No comments:
Post a Comment