Friday, 18 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.04.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 18 April 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: १८ एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता.

****

गुडफ्रायडे आज पाळला जात आहे. प्रेषित येशू ख्रिस्ताला आजच्या दिवशी सुळावर चढवल्याचं मानलं जातं. या निमित्तानं विविध ठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडे निमित्त प्रभू येशुच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे. हा दिवस आपल्याला प्रेम, सहानुभूती, दयाळूपणा आणि करुणेची प्रेरणा देत असल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

जागतिक वारसा दिन आज साजरा होत आहे. या निमित्तानं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं देशभरातल्या सर्व वारसा स्थळांवर आज मोफत प्रवेशाची घोषणा केली आहे. आपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात असलेला वारसा, ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे.

****

केंद्रीय राखीव पोलिस बलाने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना सामोरं जाण्यासाठी विशेष कोबरा बटालियन स्थापन करण्याची घोषणा केली आहे. १७ वर्षांपूर्वी नक्षलग्रस्त राज्यांमध्ये घनदाट जंगलांमध्ये कारवाईसाठी कोबरा बटालियनची सुरुवात झाली होती. सीआरपीएफचे महानिदेशक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी ही माहिती दिली. जम्मू काश्मीरमध्ये कोबरा बटालियनच्या स्थापनेमुळे सीआरपीएफचं अभियान अधिक सशक्त होईल आणि विशेषत: वन क्षेत्रात दहशतवादी कारवाया कमी होण्यास मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत एक हजार २७ सेवा अधिसूचित केल्या आहेत, त्यापैकी ५२७ सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात, यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभागांच्या प्रमुखाला दरदिवशी एक हजार रुपयांचा दंड लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना केल्या आहेत. मुंबईत काल विविध सामाजिक क्षेत्रांची वॉररुम बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, अॅग्रीस्टॅक उपक्रम यांचा आढावा घेण्यात आला.

****

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी काल नवी दिल्लीत गोड पाण्यातल्या जैववैविध्यतेच्या संरक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या डिजिटल व्यासपीठाचा आरंभ केला. या माध्यमातून गंगा, कावेरी आणि गोदावरी सारख्या प्रमुख नद्यांच्या भौगोलिक संरचना, जैव विविधता आणि सार्वजनिक सहभागातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती मिळणार आहे. राष्ट्रीय स्वच्छ गंगा प्रकल्पातंर्गत त्यांनी देशातल्या वन्यजीव संस्थांच्या विविध योजनांचा यावेळी आढावा घेतला.

****

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं आय आय टी - जे ई ई, नीट आणि इतर स्पर्धापरीक्षांचं प्रशिक्षण देणाऱ्या काही कोचिंग क्लासेसना विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. कोचिंग क्लासेसनी आपल्या जाहिरातींमध्ये परीक्षेत यशाची खात्री देणारी किंवा नोकरी मिळवून देण्याची आश्वासने देऊ नयेत, सर्व अटी आणि शर्ती ठळकपणे छापाव्यात आणि जाहिरातीत छापल्याप्रमाणे सर्व आश्वासनं पाळावीत अशा सूचना प्राधिकरणाने दिल्या आहेत.

****

काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई राजकीय हेतूने केली असल्याची टीका, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने काल मुंबईत या कारवाईविरोधात आंदोलन करण्यात आलं, यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा गैरवापर करत विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप चेन्नीथला यांनी केला.

दरम्यान, धाराशिव इथं काल काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

****

छत्तीसगड पोलिसांनी काल विविध ठिकाणांहून एकूण २२ नक्षलवाद्यांना अटक केली. यावेळी विविध स्फोटकं आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आलं. बिजापूर, बेलचार, नेलनसार भागातून या नक्षलवाद्यांना पकडण्यात आलं.

****

राज्य सरकारतर्फे २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं वितरण आज पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते होत आहे. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल या समारंभाच्या तयारीची पाहणी केली.

****

धाराशिव जिल्हा परिषदेच्या वतीने "AI तंत्रज्ञानाचा वापर" या विषयावर एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम काल घेण्यात आला. शासकीय कामकाजात, शिक्षण व्यवस्थेत तसंच कार्यालयीन प्रक्रियांत AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल, याविषयी यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं.

****

लातूर शहर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत शहरातल्या बेघर नागरिकांसाठी बेघर निवारा सुरु करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त देविदास जाधव यांनी काल सदर निवाऱ्याची पाहणी केली.

****

बीड जिल्ह्यातल्या केज शहरात चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाची विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून हत्या झाली. रेहान कुरेशी असं मृत अल्पवयीन मुलाचं नाव असून, याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

****

No comments:

Post a Comment