Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 April 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०
****
· विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याच्या संकल्पाचा मुख्यमंत्र्यांकडून
पुनरुच्चार-टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना उपाययोजना राबवण्याचे आदेश
· गडचिरोली जिल्ह्यात चार जहाल नक्षलवाद्यांना पोलिसांकडून अटक
· जंगलात वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करण्याचे वन मंत्री गणेश नाईक यांचे निर्देश
आणि
· रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड इथं पुस्तकाचं गाव उपक्रमाचं उद्या उद्घाटन
****
समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टीएमसी पाणी
गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला मान्यता दिली असून या वर्षाअखेर किंवा पुढल्या
वर्षाच्या सुरुवातीला हे काम सुरू होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिली. बीड जिल्ह्यातल्या घाटशील पारगाव इथं ‘नारळी सप्ताह’ सांगता समारोहात
ते आज बोलत होते. कृष्णा कोयनेच्या पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या योजनेलाही मंजुरी
दिली असून पुढल्या महिन्यात याची निविदा काढली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
या योजनांच्या माध्यमातून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी
व्यक्त केला. ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार
सुरेश धस, आमदार नमिता मुंदडा,
आमदार मोनिका राजळे, यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला
उपस्थित होते. गहिनीनाथ गडाच्या विकासाचा मुद्दा पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर
मांडला. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, गडासह
गडावर येणाऱ्या भाविकांच्या विकासाची ग्वाही दिली. ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती
संभाजीनगर इथं वार्ताहरांशी संवाद साधला. राज्यातल्या अनेक भागातली पाणी टंचाई दूर
करण्यासाठी आराखडा तयार करत असून, टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना
यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चकमकीत सहभागी असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांना आज गडचिरोली
पोलिसांनी अटक केली. त्यात रघु आणि जैनी या दाम्पत्यासह झाशी तलांडे आणि मनिला गावडे
यांचा समावेश आहे. चारही नक्षलवाद्यांवर ४० लाख रुपयांचं बक्षीस होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
****
परधान जातीची संस्कृती, परंपरा
जोपासली पाहिजे,
त्यासाठी चिंता आणि चिंतन करा, अन्यथा
परधान जात संपुष्टात येईल,
असं आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी म्हटलं आहे. यवतमाळ
इथं आज राज्यस्तरीय आदिवासी परधान जमात साहित्य आणि सांस्कृतिक कला महोत्सवाचं उद्घाटन
उईके यांच्या हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत विनायक तुमराम हे या
महोत्सवाचे अध्यक्ष होते.
****
मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी
सगळी किरकोळ भांडणं सोडून सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं असं माजी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत कामगार सेनेच्या मेळाव्याला संबोधित करतांना त्यांना
हे आवाहन केलं. ते म्हणाले –
बाईट - माजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र मोठा आहे आणि त्याच्या अस्तित्वाच्या
समोर उद्धव ठाकरे यांच्यासोबतची भांडणं फार किरकोळ असल्याचं मत मनसे प्रमुख राज ठाकरे
यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं, त्यावर उद्धव ठाकरे यांनी नाव
न घेता ही प्रतिक्रिया दिली आहे.
****
जंगलातली वनसंपदा ‘वणवा’ लागून नष्ट होऊ
नये, यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी
प्रयत्न करावेत,
असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. ते आज महाबळेश्वर
इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. वणवे रोखण्यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टरसह
इतर अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करावा, वन विभागाच्या ज्या जमिनीवर
झाडं उगवत नाहीत,
अशा जागांवर सोलर पार्क उभारण्याचा राज्य शासनाचा मानस असून
वन विभागातली सर्व रिक्त पदं भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या
वतीने उद्या रविवारी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं सांगितिक मानवंदना कार्यक्रम होणार
आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, वैशाली सामंत, उर्मिला
धनगर, आदर्श शिंदे,
नंदेश उमप, अवधूत गुप्ते, शाहीर
राजा कांबळे हे कलाकार सहभागी होणार आहेत.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड इथं पुस्तकाचं
गाव या उपक्रमाचं उद्या उद्घाटन होणार आहे. कवी केशवसुत स्मारकात या उपक्रमाचं उद्घाटन
होणार असून राज्याचे मराठी भाषामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या
हे उद्घाटन हस्ते होणार आहे. ज्येष्ठ साहित्यीक मधू मंगेश कर्णिक यांच्यासह अनेक मान्यवर
त्या वेळी उपस्थित राहणार आहेत. कोकणातल्या साहित्यिकांची माहिती देणाऱ्या कोकण साहित्य
सन्मान दालनाचं उद्घाटनही या वेळी होणार आहे. या उपक्रमात मालगुंडमधल्या ३०, तर
गणपतीपुळे गावातल्या पाच घरांचा समावेश करण्यात आला आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या तुळजाभवानी
महाविद्यालयात आज पदवीप्रदान समारंभ झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे
सिनेट सदस्य तथा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक यांची प्रमुख उपस्थिती
यावेळी होती. आत्मनिर्भर भारत हा तरुणांच्या माध्यमातूनच घडणार असून वैश्विक बाजार
हा आज कौशल्यावर आधारित आहे, ही बाब आपण लक्षात घेणं गरजेचे आहे, असं
पाठक यावेळी म्हणाले. महाविद्यालय विकास समिती सदस्य अप्पासाहेब पाटील, महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. जीवन पवार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
****
परभणी महानगरपालिकेच्यावतीने मालमत्ता कर
विभाग आणि नगररचना विभागाशी संबंधित अर्जांवर तत्पर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने
येत्या १ मे ते ७ मे या कालावधीत प्रभागनिहाय शिबिरं आयोजित करण्यात येणार आहेत. या
शिबिरांचं यशस्वीरित्या नियोजन करण्याची सूचना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी
मनपा आयुक्तांना केली आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन साकोरे-बोर्डीकर
यांनी केलं.
****
संसदेने बहुमताने मंजूर केलेल्या वक्फ सुधारणा
कायद्याचं पालन करणार नाही असे म्हणणं असंवैधानिक, अतांत्रिक
आणि विद्रोह असून पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार
बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी विश्व हिंदू
परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी केली आहे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना
याबाबत निवेदन देण्यात आलं. यावेळी विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ,
धर्म जागरण मंच, भारतीय किसान संघ, महाकाल
प्रतिष्ठान,
भारतीय मजदूर संघासह अनेक संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित
होते.
****
लघु उद्योग भारती या राष्ट्रीय उद्योजक संघटनेच्या
महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री पदी धाराशिवच्या प्रवीण काळे यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल धाराशिव जिल्ह्यातल्या उद्योजक आणि लघुउद्योग भारतीच्या वतीने त्यांचा
आज धाराशिव इथं सत्कार करण्यात आला.
****
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंर्तंगत आज
हिंगोली जिल्ह्यातल्या आठशे भाविकांना घेऊन हिंगोली - अयोध्या ही रेल्वे हिंगोली रेल्वेस्थानकावरून
सकाळी ११ वाजता रवाना झाली. आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, अपर
जिल्हाधिकारी अनिल माचेवाड,
अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा
दाखवला. विविध रंगाच्या फुग्यांनी सजवलेल्या १४ डब्बे असेलेल्या या गाडीतल्या भाविकांनी
'जय श्री राम'
अशा यावेळी घोषणा दिल्या. या भाविकांसोबत एक वैद्यकीय अधिकाऱ्यांसह
सात जणाचं आरोग्य पथक आणि २५ कर्मचारी पाठवण्यात आले.
****
लातूर इथले फुले शाहू आंबेडकर परिवर्तनवादी
चळवळीतील ज्येष्ठ नेते,
लेखक विलास माने यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे काल निधन झालं.
ते ६८ वर्षांचे होते. ‘कत्ती’ या पुस्तकाचं लेखन केल्यानंतर
त्यांना ‘कत्ती’कार या नावानं ओळखलं
जात होतं. कत्ती आत्मकथन,
वीजनेच्या पाऊलखुणा, गरिबीचा निरंतर करुणा या पुस्तकाचं
विलास माने यांनी लेखन केलं. विविध समाजाच्या विविध प्रश्नांसाठी माने यांनी सतत मोर्चे
काढून आंदोलनंही केली. त्यामुळे भटक्या विमुक्तांचा आवाज हरपला अशा शब्दात अनेकांनी
त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पार्थिव देहावर निलंगा इथल्या शांतीवन स्मशानभूमीत
काल अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उन्हाचा
पारा आता ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. उन्हाच्या या वाढत्या तीव्रतेमुळं पैठण
इथल्या जायकवाडी धरणाच्या पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. या बाष्पीभवनामुळं
धरणातील जलसाठा झपाट्यानं कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मागीलवर्षी समाधानकारक पाऊस
झाला होता. त्यामुळे जायकवाडी धरण १०० टक्के भरलं होतं.
****
हवामान
राज्यात आज सर्वाधिक ४४ पूर्णांक एक अंश
सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment