Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 April 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ एप्रिल
२०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
दोन हजार रुपयांपेक्षा अधिक
रकमेच्या युपीआय व्यवहारांवर जीएसटी आकारण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचं
वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. काही आर्थिक व्यवहारांमध्ये
लागू होणाऱ्या शुल्कांवरच मर्चंट डिस्काउंट रेट-एमडीआर आकारला जातो, मात्र कोणत्याही थेट युपीआय व्यवहारांवर असा कुठलाही कर आकारला
जात नाही, असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
भारतीय वायु दलाचे ग्रुप कॅप्टन
शुभांशु शुक्ला आगामी ऍक्झिऑम अंतराळ मोहीमेत सहभागी होतील, अशी माहिती अंतराळ आणि अणु ऊर्जा राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र
सिंग यांनी दिली आहे. इस्रोच्या आगामी योजनांच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर नवी दिल्लीत
काल ते बोलत होते. अंतरिक्ष मोहीमेद्वारे भारतीय अंतराळ क्षेत्रात एक नवा अध्याय लिहीला
जाईल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
केंद्र शासनानं लागू केलेलं
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मागे घ्यावं या मागणीसाठी मालेगाव शहरातील मुस्लिम समाजाकडून
आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून मालेगावमधल्या सर्व मशिदींमध्ये काल दुपारी
दंडावर काळ्या फिती बांधून नमाज पठण करत निषेध आंदोलन करण्यात आलं.
****
लातूर इथले फुले शाहू आंबेडकर
परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते, लेखक 'विलास माने यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळं काल
निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. कत्ती' या पुस्तकाचं लेखन केल्यानंतर त्यांना 'कत्ती'कार या नावानं ओळखलं जात होतं. कत्ती आत्मकथन, वीजनेच्या पाऊलखुणा, गरिबीची निरंतर करुणा या पुस्तकाचं विलास माने यांनी लेखन केलं. कैकाडी, घिसाडी, फासेपारधी कोंची, करवी, वासुदेव पाथरूड, पाथरवट साप वाले, गारुडी, कोल्हाटी नंदीबैलवाले या समाजाच्या विविध प्रश्नांसाठी
माने यांनी सतत मोर्चे काढून आंदोलनंही केली. त्यामुळे भटक्या विमुक्तांचा आवाज हरपला,अशा शब्दात अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. विलास माने
यांच्या पार्थिव देहावर निलंगा इथल्या शांतीवन स्मशानभूमीत काल अंत्यसंस्कार करण्यात
आले. माजी आमदार उपराकार लक्ष्मण माने यांच्यासह, अनेक साहित्यिक, लेखक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेकांची यावेळी मोठ्या संख्येने
उपस्थिती होती.
****
लातूर जिल्ह्यात विविध गुन्ह्यात
जप्त केलेला जवळपास एक कोटी रुपये किमतीचा गांजा लातूर पोलिसांनी जाळून काल नष्ट केला.
२००१ पासून एकूण २२ गुन्ह्यातील हा ४९६ किलो गांजा पोलिस मुख्यालयात ठेवण्यात आला होता.
त्या सर्व २२ गुन्ह्यातील न्यायालयीन निकाल लागल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय
मुंडे यांच्या आदेशाने अंमलीपदार्थ विल्हेवाट समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या
सदस्यांच्या उपस्थितीत लातूर तालुक्यातील मुरुड इथल्या माळरानावर हा गांजा जाळून नष्ट
करण्यात आला.
****
कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन
विभागानं, भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटी मंडी हिमाचलप्रदेश
या केंद्र शासनाच्या तंत्रज्ञान संस्थेसोबत सामंजस्य करार केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी
अमोल येडगे यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा, बहुआपत्ती प्रवण जिल्हा असून या जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, जंगलात लागणारे वणवे अशा नैसर्गिक आपत्तींची प्रवणता आहे, तसंच रस्ते अपघात, औद्योगिक दुर्घटना, मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येण्याची धार्मिक ठिकाणं
आणि मानवनिर्मित आपत्तींचीही प्रवणता आहे. आयआयटी मंडी या संस्थेकडे अतिउच्च स्वरूपाचं
प्रगत तंत्रज्ञान त्याचबरोबर तंत्रशुद्ध प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असून या संस्थेमार्फत
संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांना शासकीय विभागांना तांत्रिक मदत करण्याचं
काम केलं जातं. या बाबी लक्षात घेऊन हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
****
मे महिन्यात काही दिवसांसाठी
रद्द करण्यात आलेली अमरावती-तिरुपती-अमरावती एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी पूर्ववत सुरु
करण्यात आली आहे. अमरावती-तिरुपती-अमरावती एक्स्प्रेस नियमित वेळापत्रकानुसार आता मार्ग
बदलून धावणार आहे. ही रेल्वेगाडी तिरुपती, रेनुगुंठा, गुत्ती आणि धोणे जंक्शन मार्गे धावेल, तर पकाला, पिलर, मांडण्पल्ले रोड, कादिरी, धर्मावरम्, अनंतपूरम या रेल्वे स्थानकांवर थांबणार नाही.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज
गुजरात टायटन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल. अहमदाबाद इथं दुपारी साडेतीन वाजता
हा सामना होईल. तर जयपूरमध्ये संध्याकाळी सायंकाळी साडेसात वाजता होणाऱ्या दुसऱ्या
सामन्यात, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमने-सामने
असतील. काल चेन्नईमध्ये पडलेल्या पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू
संघानं १४ षटकांत ९५ धावा केल्या. पंजाबनं ११ चेंडू शिल्लक असताना ९६ धावांचे लक्ष्य
गाठले.
****
No comments:
Post a Comment