Sunday, 20 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.04.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 April 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      महिलांसाठी पिंक ई- रिक्षा योजनेला नागपूर इथं सुरुवात

·      राज्य मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी सरकार वचनबद्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची ग्वाही

·      स्थळ’, ‘स्नो फ्लॉवरआणि खालिद का शिवाजीचित्रपटांची कान महोत्सवासाठी निवड

आणि

·      अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामाला गती

****

पिंक ई-रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल पडल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर इथं जिल्ह्यातल्या ५० पात्र महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी पिंक ई-रिक्षा वितरित केली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर या आठ जिल्ह्यांत शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य आणि ई-रिक्षा चालवण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत पाच हजार रिक्षा वितरीत करण्याचं उद्दिष्ट आहे. आगामी काळात विमानतळ, पर्यटन स्थळं अशा ठिकाणीही पिंक ई-रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलं.

****

नागपूर महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर इथं झालं. या वेळी त्यांनी हैदराबाद हाऊस इथं सार्वजनिक जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. यात राज्यभरातील नागरिक सहभागी झाले.

****

वयोवृद्धांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता टाळण्यासाठी मोतीबिंदू मुक्त राज्य अभियान यशस्वी करण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शासनाचे हे अभियान पूर्णत्वास नेण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या संस्थेनं सर्वतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे, ही कौतुकास्पद बाब असल्याचं त्यांनी नागपूर इथं बोलताना नमूद केलं. ही संस्था विदर्भातील ग्रामीण भागांत शिबीरं घेऊन रुग्णाचे निदान करून त्यांच्यावर मोफत उपचार करेल. इतर स्वयंसेवी संस्था देखील या कामात पुढाकार घेतील, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

****

देशात सध्‍या २२ लाख प्रशिक्षित चालकांची कमतरता असून केंद्र सरकारतर्फे १५ हजार चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्‍यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्‍ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यांच्या हस्ते काल या अंतर्गत एका प्रशिक्षण केंद्राचं नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यात सावरमेंढा इथं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रशिक्षित चालकांची देशाला मोठ्या प्रमाणात गरज असल्याचं गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं. अशा प्रकल्‍पांतून युवकांना रोजगार मिळेल आणि चांगले चालक उपलब्‍ध होतील असा विश्वास राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी व्यक्त केला.

****

विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून दहा लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. त्यांच्या उपस्थितीत आज रत्नागिरी जिल्ह्यातलं मालगुंड हे पुस्तकांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. कोकण आणि रत्नागिरी हे साहित्याच्या दृष्टीनं प्रगत आहे. ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी केलं, तर ती खऱ्या अर्थानं केशवसुतांना श्रद्धांजली ठरेल, असं सामंत म्हणाले. कोकणातल्या साहित्यिकांची माहिती देणाऱ्या कोकणसाहित्य सन्मान दालनाचं उद्घाटनही या वेळी झालं. या उपक्रमात मालगुंडमधल्या ३०, तर जवळच्या गणपतीपुळे गावातल्या पाच घरांचा समावेश करण्यात आला आहे. या घरांमध्ये पुस्तकं ठेवली जाणार आहेत. त्यापैकी दोन दालनांचं आज प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन झालं. या दालनांमध्ये पर्यटकांना दिवसभर वाचनाचा आनंद घेता येणार असून, त्यांच्या आदरातिथ्यातून संबंधित कुटुंबांच्या अर्थार्जनालाही हातभार लागणार आहे.

****

राज्य चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात स्थळ’, ‘स्नो फ्लॉवरआणि खालिद का शिवाजीया तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर जुनं फर्निचरया चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याची घोषणा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज दादर इथं पत्रकार परिषदेत केली. फ्रान्समध्ये येत्या १४ ते २२ मे या कालावधीत कान चित्रपट महोत्सव होणार आहे. महामंडळामार्फत सन २०१६ पासून कान महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठवले जात आहेत. या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली होती. आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक, अपूर्वा शालिग्राम यांचा यात समावेश होता.

****

गेल्या चार वर्षात भारताचा परकीय चलनसाठा बाजार दुपटीनं वाढल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज बाली इथं एका परिषदेमध्ये मार्गदर्शन करताना या संदर्भातली माहिती दिली.

****

ईस्टर म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आज सर्वत्र भक्तीभावात साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टरनिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक कार्यक्रम सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर इथंही ईस्टरनिमित्त विशेष प्रार्थना सभा तसंच मिरवणुका आणि उपक्रम सुरू आहेत.

****

माध्यम समुदायाकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट-वेव्हज २०२५ साठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी मुदत तीन दिवस वाढवण्यात आली आहे. उद्या सोमवारपासून बुधवार पर्यंतही यासाठी नोंदणी करता येणार आहे. वेव्हज-२०२५ चं आयोजन येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार आहे. वेव्हज इंडीया डॉट ऑर्ग येथे नोंदणीसाठी संपर्क साधावा, असं संयोजन समितीतर्फे कळवण्यात आलं आहे.

****

अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली असून बीडपर्यंत रेल्वे रूळाचं काम पूर्ण झालं आहे. बीड ते परळी या महत्वाच्या टप्याचं काम देखील आता वेगात सुरू असून आज सकाळी बीड ते वडवणी रेल्वे इंजिनची चाचणी सुरू करण्यात आली. बिंदुसरा नदीवरील रेल्वे पुलावरून हे इंजिन वडवणीकडं निघालं आहे. दहाच्या वेगानं या इंजिनची चाचणी सुरू असून इंजिनला जोडून असलेल्या मालगाडीत नवीन रुळ आणि सामग्री आणण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी ही चाचणी पाहण्यासाठी गर्दी केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चंदीगढ इथं सुरू सामन्यात पंजाब किंग्ज संघानं रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघासमोर विजयासाठी १५८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा बंगळुरू संघानं आठव्या षटकात एक बाद ६५ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत आज साडेसात वाजता मुंबईमध्ये मुंबई इंडीयन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यानचा सामना होणार आहे.

****

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश संघटनेतर्फे राज्यभरात १२२१ मंडळं स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याचं पक्षातर्फे कळवण्यात आलं आहे. कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली असून या अंतर्गत मराठवाड्यात २०७ मंडळं स्थापन करण्यात आल्याचं पक्षातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

भारतीय जनता पक्ष जालना महानगर जिल्हा अंतर्गत चार मंडळाच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये महानगर ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी संजय डोंगरे, नवीन जालना मंडळ अध्यक्ष सुनील खरे, जुना जालना मंडळ अध्यक्ष महेश निकम, पूर्व जालना मंडळ अध्यक्ष अमोल धानुरे यांची निवड करण्यात आली असल्याचं पक्षातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

पत्ताकोबीचे दर कोसळले असून वीस ते तीस रुपये किलो दर असलेली पत्ताकोबी ठोक बाजारात आता दोन ते तीन रुपये किलो दरानं विकली जात असल्यानं गोंदिया जिल्ह्यात शेतकरी वर्ग चिंतेत आहे. यात शेतकऱ्यांचा मुद्दल खर्चही निघत नसल्यानं ते अडचणीत आले आहेत. भाजी उत्पादक शेतकऱ्यांकरिता शासनानं सबसिडी देऊन त्यांना मदत करण्याची मागणी आता शेतकरी वर्ग करत आहे.

****

गोंदिया तालुक्यातील अदासी गावात सुरु असलेली मद्य विक्री बंद करण्यासाठी गावात काल विशेष ग्राम सभा बोलवण्यात आली होती. यात उपस्थित गावकरी महिलांनी मद्य विक्री विरुद्ध मोठं मतदान केलं. एकूण ११२० महिलांपैकी ७८८ महिलांनी मद्य विक्री बंद करण्याच्या बाजुनं मतदन केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

भंडारा शहरातल्या राजीव गांधी चौका जवळ असलेल्या झोपडपट्टी परिसरातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी आंदोलनाचा इशारा खासदार प्रशांत पडोळे यांनी दिला आहे. त्यांनी या वसाहतीला भेट दिल्यानंतर हा इशारा दिला आहे.

****

No comments:

Post a Comment