Wednesday, 23 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 April 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा मृत्यू-राज्यशासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर

·      पर्यटकांना राज्यात सुखरुप परत आणण्याला शासनाचं प्राधान्य-मुख्यमंत्र्यांची ग्वाही  

·      पोषण पंधरवडा उपक्रमात हिंगोली जिल्ह्याचा राज्यातून दुसरा क्रमांक

·      छत्रपती संभाजीनगर इथल्या अजिंठा अर्बन सहकारी बँकेचा परवाना रद्द

आणि

·      जिंतूरच्या विनया देशमुख यांनी शेणापासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक रंगांला उत्तम प्रतिसाद

****

जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांच्या कुटुंबांना राज्यशासनानं प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. जम्मू काश्मीर राज्य प्रशासनानेही या हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर केली आहे. डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने, पुण्याचे कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे तसंच नवी मुंबईचे दिलीप डिसले या पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.

यापैकी दोघांचे मृतदेह राज्यात आणण्यात आले असून, इतरांचे मृतदेहही परत आणण्यात येत आहेत. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्यात सुखरुप परत आणण्याला शासनाचं प्राधान्य असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काश्मीरमधे गेलेल्या महाराष्ट्रातल्या इतर पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातले अनेक पर्यटक अजूनही जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकल्याची शक्यता असल्यानं त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्याची विनंती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारकडे केली.

पर्यटकांना परतण्यासाठी एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी उड्डाणांची संख्या वाढवल्याची माहिती केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी समाजमाध्यमावर दिली आहे.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याचं राज्य प्रशासनानं सांगितलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेलेल्या इतर पर्यटकांची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत २७५ पर्यटकांशी संपर्क झाला आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने या पर्यटकांची निवासव्यवस्था आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक ते समन्वय केले जात असल्याचंही, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये आपले परिचित गेलेले असतील, तर संबंधित जिल्हा प्रशासनाला त्याची माहिती देण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं ७३ ५० ३३ ५१ ०४ आणि ०२४० २ ३३ १० ७७ या क्रमांकावर, बीड इथं ९० ११ २० ९० ०८, परभणी इथं ९९ ७५ ०१ ३७ २८ आणि ७० २० ८२ ५६ ६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पहलगाम इथं घटनास्थळाची पाहणी केली. याठिकाणी काल झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये नौदलाच्या अधिकाऱ्यासह दोन परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात २० पर्यटक जखमी झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. शहा यांनी त्यापूर्वी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज सकाळी दिल्ली विमानतळावर उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अमित शहा यांच्याशी चर्चा केली, आणि दहशतवाद विरोधी लढाईत कॉंग्रेस पक्ष, केंद्र सरकारच्या पूर्ण पाठीशी असल्याचं सांगितलं. दहशतवाद्यांना कडक शासन झालं पाहिजे, असं खरगे यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे, तर या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

****

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज तिन्ही दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काश्मीर खोऱ्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्याच्या स्थितीची माहिती सिंह यांना दिली.

****

लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हल्ला झालेल्या परिसरात सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं असून, शोधमोहीम राबवण्यासाठी सैन्याचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या भ्याड हल्ल्याच्या सूत्रधारांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी आपली शोधमोहीम तीव्र केली असल्याचंही, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

जगभरातल्या विविध देशांनीही या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली आहे.

****

राज्यभरात राबवण्यात आलेल्या पोषण पंधरवड्यामध्ये हिंगोली जिल्ह्याने राज्यातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने एक हजार एकशे सत्त्याण्णव अंगणवाड्यांमधून तब्बल ७४ हजार उपक्रम राबवले. विशेष म्हणजे या उपक्रमात कर्करोग संशयित महिलांच्या आरोग्य तपासणी बाबत जनजागृतीवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आला. पोषण रॅली, स्वस्थ बालक-बालिका स्पर्धा, बालकांची आरोग्य तपासणी, गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, महिला मेळावे, किशोरवयीन मुलींचे आरोग्य मेळावे, पोषण आहार, पाककृती प्रदर्शनी, मुलींच्या जन्माचे स्वागत, गरोदर महिला ओटी भरण, बालगोपाळ पंगत, गृहभेटी आदी उपक्रमांचा यात समावेश करण्यात आला.

या पोषण पंधरवड्यात नांदेड जिल्ह्याचा राज्यात अकरावा क्रमांक आला. जिल्ह्यात तीन हजार ७२३ अंगणवाड्यात एक लाख ५४ हजार २३७ उपक्रम राबवण्यात आले. ३०० परिचारिका, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देऊन स्तन्यदा माता तसंच गरोदर माता यांना आहार आणि बाळाच्या वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या अजिंठा अर्बन सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेतला आर्थिक गैरव्यवहार आणि त्या प्रकरणी अध्यक्ष सुभाष झांबड यांच्या अटकेनंतर आता, बँकेकडे अपुरं भांडवल आणि उत्पन्नाची शक्यता नसल्याने बँकेचा परवाना रद्द करण्यात आला. महाराष्ट्र सहकारी संस्था निबंधक यांना सदर बँक बरखास्त करून बँकेवर अवसायक नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

****

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात बोरी इथल्या उच्च शिक्षित रहिवासी विनया देशमुख यांनी शेणापासून आकर्षक आणि पर्यावरण पूरक रंग तयार केला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या सहकार्याने त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. यासाठीचं प्रशिक्षण त्यांनी जयपूर इथं घेतलं आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत भारतीय स्टेट बँकेकडून २३ लाख रुपये कर्ज घेऊन आपला प्रकल्प उभारला. प्रकल्पातली सर्व उपकरणं सौर ऊर्जेवर चालत असल्यामुळे वीज बिलातही कपात होते. विनया देशमुख यांनी ‘खादी प्राकृतिक पेंट’ नावाने हे उत्पादन बाजारात आणले असून, या अनोख्या रंगाला गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश अशा राज्यातून चांगली मागणी असल्याचं, त्यांनी आकाशवाणीला सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत पाणी प्रश्नाचा मुद्दा अत्यंत गंभीर झाला असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. शहराला दररोज २०० एम एल डी पाण्याची आवश्यकता आहे, मात्र शहरात दर ११ दिवसानंतर १४० एम एल डी पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी समस्येला सामोरं जावं लागत असल्याचं दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांनी बियाणं आणि खतं खरेदी करताना अधिकृत परवाना धारकांकडून पक्की पावती घेऊनच खरेदी करावी, असं आवाहन नांदेडच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांनी केलं आहे. बी-बियाणं आणि खतांची विक्री करणारे अनधिकृत विक्रेते आढळल्यास संबंधित तालुक्याच्या तालुका कृषि अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

****

पहलगाम इथल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह माजी नगरसेवक तसंच महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

अहिल्यानगर इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा निषेध करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं धुळ्यात निदर्शनं करण्यात आली.

****

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना थेट लाथ हस्तांतरण प्रक्रियेद्वारे अर्थसहाय्याचं वितरण केलं जाणार आहे. बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना इथं उद्या २४ एप्रिलला, नाथापूर इथं २६ एप्रिलला, कुर्ला इथं २८ एप्रिलला, पेंडगाव इथं ३० एप्रिलला तर ५ मे रोजी कुक्कडगाव इथं डीबीटी कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे, लाभार्थ्यांनी या डीबीटी कॅम्पला उपस्थित राहण्याचं आवाहन, आमदार विजयसिंह पंडित यांनी केलं आहे.

****

पुण्यातल्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था-एफ.टी.आय.आय. या संस्थेला केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान केला आहे.

****

No comments:

Post a Comment