Thursday, 24 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 April 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही कठोर शासन करण्याचा पंतप्रधानांचा सज्जड इशारा-पाकिस्तानी नागरिकांना जारी व्हिसा तत्काळ प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय

·      जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातले पर्यटक विशेष विमानाने परतण्यास प्रारंभ

·      शून्य गोवर-रुबेला मोहिमेला सुरुवात -जागतिक लसीकरण सप्ताहालाही प्रारंभ

आणि

·      पंचायती राज दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा

****

पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही कठोर शासन करण्याचा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ते आज बिहारमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं पर्यटकांवर झालेला हल्ला हा भारताच्या आत्म्यावर झालेला हल्ला असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली, ते म्हणाले

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर सर्व पाकिस्तानी नागरिकांचा विसा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आला आहे. सामान्य पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा २७ एप्रिलपर्यंत तर वैद्यकीय कारणांसाठी दिलेला व्हिसा २९ एप्रिलपर्यंतच वैध असेल. या मुदतीपूर्वीच भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ परत जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचप्रमाणे भारतीयांना पाकिस्तान दौऱ्यावर न जाण्याची तसंच पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांनाही तत्काळ परत येण्याची सूचना देण्यात आली आहे.

पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना आठवडाभरात भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर, भारताने इस्लामाबादमधल्या भारतीय उच्चायुक्तालयातून भारतीय संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार परत बोलवण्याची घोषणा केली आहे.

वाघा-अटारी सीमा बंद करण्यात आली असून, सीमा चौक्यांवर होणारे बीटिंग द रिट्रीट सारखे कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत.

****

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या अबीर गुलाल या चित्रपटच्या भारतातल्या प्रदर्शनावरही बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या नऊ तारखेला प्रदर्शित होणार होता.

****

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारतर्फे बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक संसद भवनात सुरु आहे. या हल्ल्यानंतर सरकारच्या भूमिकेबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माहिती देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

काँग्रेस कार्यकारिणीनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. नवी दिल्ली इथं कार्यकारिणीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली.

****

जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानाने आज पहाटे साडेतीन वाजता मुंबई विमानतळावर सुखरूप पोहचली. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं.

१८४ पर्यटकांना मुंबईला घेऊन जाणारं दुसरं विमानही श्रीनगरहून मुंबईकडे रवाना झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगर इथं या पर्यटकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि सुरक्षित प्रवासासाठी या सर्वांना आश्वस्त करून निरोप दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आज काश्मीरमधल्या जखमी पर्यटकांच्या उपचार आणि वैद्यकीय व्यवस्थेचा आढावा घेतला. गिरीश महाजन यांनी काश्मीरमध्ये लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉलवरून मुख्यमंत्र्यांचा संबंधित जखमींशी संवाद घडवून आणला. या सर्वांवर उपचार करणाऱ्या लष्करी डॉक्टरांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

****

अमरावती, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर इथं नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. शासकीय रुग्णालयांमध्ये मानवी अवयव पुनर्प्राप्ती केंद्रांची स्थापना आणि त्या ठिकाणी समन्वयकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं आबिटकर यांनी सांगितलं.

****

शून्य गोवर - रुबेला मोहिमेला आज नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान देशातले ३२२ जिल्हे गोवरमुक्त तर ४८७ जिल्हे रुबेलामुक्त करण्यात यश आल्याचं आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. हे फक्त लसीकरण अभियान नसून देशातल्या कोट्यवधी बालकांचं आयुष्य अधिक गुणवत्तापूर्ण करण्याचा मार्ग असल्याचं, नड्डा म्हणाले.

****

जागतिक आरोग्य संघटनेकडून राबवल्या जाणाऱ्या जागतिक लसीकरण सप्ताहाला आजपासून जगभरात सुरुवात झाली. हा सप्ताह ३० एप्रिलपर्यंत राबवला जाईल. ‘लसीकरण सर्वांसाठी मानवीदृष्ट्या शक्य आहे,’ अशी यंदाच्या सप्ताहाची संकल्पना आहे. लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा सप्ताह दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाळला जातो.

****

भारताचा पोलाद उद्योग हा नव्या आत्मविश्वासाने भविष्याकडे बघत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये भरवलेल्या इंडिया स्टील २०२५ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन पंतप्रधानांनी आज दूरस्थ पद्धतीने केलं, त्या वेळी ते बोलत होते. येत्या २०३० पर्यंत देशातलं पोलाद उत्पादन ३० कोटी टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्यांचही ते यावेळी म्हणाले. तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत जागतिक पोलाद मूल्य साखळीतील आघाडीचे देश एकत्र येऊन, भविष्यातल्या वाटचालीवर चर्चा करणार आहेत.

दरम्यान, देशाचा विकास गावखेड्यांच्या विकासातून साकार होतो, या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर पंचायती राज योजना राबवण्यात येत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिहारमध्ये मधुबनी इथे पंचायती राज दिनानिमित्त एका कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या दशकभरात दोन लाखांहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या, त्यामुळे अनेक आवश्यक दस्तऐवज मिळणं सुलभ झालं. तसंच गेल्या दहा वर्षांत पंचायतींना २ लाख कोटींहून अधिक निधी मिळाला आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते १३ हजार ५०० कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्धाटन आणि लोकार्पण करण्यात आलं. यात जयनगर ते पाटणा दरम्यान धावणाऱ्या नमो भारत रॅपिड रेल्वे आणि सहरसा ते मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस पर्यंत धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसचा समावेश आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या ‘मन-की-बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा १२१ वा भाग असेल. नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना उद्यापर्यंत १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेच्या कार्यालयात पंचायत राज दिन साजरा करण्यात आला. पंचायतराज व्यवस्थेमध्ये महिला वर्गांनी पुढे येऊन गावाची धुरा सांभाळावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी यावेळी केलं. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करोडी, दुधड, कुंभेफळ, वळदगाव, पैठण तालुक्यातील शिवराई, वाहेगाव, नारायणपूर, कन्नड तालुक्यातील बहिरगाव, नादरपूर तर सोयगाव तालुक्यातील जरंडी या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.

****

बीडचे जिल्हाधिकारी म्हणून विवेक जान्सन यांनी आज पदभार स्वीकरला. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जान्सन यांचं प्रशासनातर्फे स्वागत केलं. जान्सन हे २०१८ च्या तुकडीचे सनदी अधिकारी असून यापूर्वी त्यांनी चंद्रपूर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

****

जागतिक ग्रंथ दिनाच्या औचित्याने लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं ग्रंथप्रेमी चळवळीच्या वतीने पाच वाचकांचा ग्रंथप्रेमीवाचक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या उदगीर शाखेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहयोग बँकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर इथं पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांतर्फे आंदोलन करण्यात आलं. संघटनेच्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी बंद पुकारण्यात आला तर मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डोंबिवली शहरात आज या हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळला आहे. बीड जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त उद्या होणारा भीमसंगीताचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. लातूर शहरात मुस्लीम समाजाने मेणबत्त्या पेटवून हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

****

हवामान

राज्यात आज सर्वाधिक ४५ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक दोन अंश, धाराशिव ४२ पूर्णांक आठ, बीड इथं ४३ पूर्णांक चार अंश तर परभणी इथं ४४ पूर्णांक एक अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Post a Comment