Thursday, 24 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.04.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 24 April 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २४ एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता.

****

भारताने पाकिस्तानचे सर्वोच्च राजदूत साद अहमद वॉरैच यांना बोलावून त्यांच्या लष्करी राजदूतांसाठी एक वैयक्तिक नॉन-ग्राटा नोट दिली आहे. यानुसार पाकिस्तानच्या दिल्लीतल्या उच्चायुक्त कार्यालयातल्या संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संपर्क अधिकाऱ्यांना एका आठवड्याच्या आत भारत सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कडक पावलं उचलल्यानंतर काल रात्री हे समन्स बजावण्यात आलं.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संध्याकाळी ही बैठक होण्याची अपेक्षा आहे. 

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब राज्याने आपली पाकिस्तानच्या बाजूची सीमा बंद केली असून, राज्यात अतिदक्षतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसंच पंजाबमधल्या पर्यटन स्थळांवरची सुरक्षा व्यवस्था देखील कडक करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. राज्याच्या सीमा पाकिस्तानला आणि काश्मीरला लागून असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

जम्मू काश्मीरमधे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था केली जाईल, असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. आज पहाटे राज्यातल्या पर्यटकांनी पहिली तुकडी विशेष विमानाने मुंबईत दाखल झाली. श्रीनगरहून मुंबईला आज आणखी दोन विमानं येणार असून, यात १८२ पर्यटक येणार आहेत. यासाठी इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांची व्यवस्था झाली असून याचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं.

दरम्यान, या हल्ल्यात मृत पुण्याचे कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचं पार्थिव शरीर आज पहाटे पुण्यात दाखल झालं. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

****

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी परभणी शहरात आज विविध संघटनांच्यावतीने बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. हा बंद शांततेत पार पडावा, असं आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारला भेट देणार असून, मधुबनी इथं राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होतील. या प्रसंगी, १३ हजार ४८० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार असून, रेल्वे आणि वीज क्षेत्रातल्या काही प्रकल्पाचं लोकार्पणही होणार आहे. यात, जयनगर ते पाटणा दरम्यान धावणाऱ्या नमो भारत रॅपिड रेल्वे आणि सहरसा ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसचा समावेश आहे.

****

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया स्टील २०२५ या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्टील प्रदर्शनाचं दूरस्थ माध्यमातून उद्घाटन होणार आहे. तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत जागतिक पोलाद मूल्य साखळीतील आघाडीचे देश एकत्र येऊन, भविष्यातील वाटचालीवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छत्तीसगड आणि ओडिशाचे मुख्यमंत्री सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

****

राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयाच्या नियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत. मुंबईत काल मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

****

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई सत्र न्यायालयानं, अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला १४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अंबाजोगाईकरांनी मोर्चे काढून या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.

****

भारताची बुद्धिबळपटू कोनेरु हंपी हिनं पुण्यात झालेल्या फिडे महिला ग्रां.प्री. बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तीने अंतिम फेरीत बल्गेरियाच्या खेळाडुचा पराभव केला. तर भारताची दिव्या देशमुख ही या स्पर्धेत तिसर्या स्थानावर राहिली.

****

केरळमध्ये कोचि इथं सुरु असलेल्या वरीष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत विद्या रामराजनं सुवर्ण पदक जिंकलं. तीने ५६ पूर्णांक शून्य चार सेकंदाचा वेळ घेऊन नवीन विक्रम प्रस्थापित केला, तसंच आशियाई चॅम्पियनशीप २०२५ स्पर्धेत पात्रता मिळवली आहे.

****

पुण्यामध्ये सोळा वर्षाखालील गटाची अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धा सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची विजयी घोडदौड कायम आहे. मुलांच्या गटात अथर्व शुक्ला याने पश्चिम बंगालच्या संकल्प सहानीचा पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. वरद पोळ, शिवराज भोसले, आरव पटेल यांनी तिसरी फेरी तर मुलींच्या गटात इरा त्रिपाठी आयुशी तरंगे, विरा हरपुडे यांनी दुसरी फेरी गाठली.

****

No comments:

Post a Comment