Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 25 April 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानविरुद्ध
घेतलेल्या निर्णयांचं सर्वपक्षीय बैठकीत समर्थन
·
पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही
कठोर शासन करण्याचा पंतप्रधानांचा सज्जड इशारा-पाकिस्तानी नागरिकांना जारी व्हिसा तत्काळ
प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय
·
जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातले पर्यटक विशेष
विमानाने परतण्यास प्रारंभ
·
शून्य गोवर-रुबेला मोहिम तसंच जागतिक लसीकरण सप्ताहाला
सुरुवात
आणि
·
परभणी इथं ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद, मराठवाड्यात
आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची हवामान विभागाची माहिती
****
पहलगाम
दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या निर्णयांचं सर्व विरोधी
पक्षांनी समर्थन केलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत, विरोधी पक्षांच्या
नेत्यांनी, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सरकारला पूर्ण सहकार्य
करण्याचं आश्वासन दिलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
या बैठकीत, सिंह यांनी दहशतवादी हल्ला आणि भारताने घेतलेल्या
निर्णयांची माहिती दिली. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांची
माहिती या बैठकीत दिल्याचं, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू
यांनी सांगितलं. या कारवाईत सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचं, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं.
द्रविड मुनेत्र कळघन, बिजू जनता दल, एमआयएम
यांच्यासह विविध १५ पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते.
****
पर्यटकांवर
हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही कठोर शासन करण्याचा सज्जड इशारा, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ते काल बिहारमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. जम्मू
काश्मीरमध्ये पहलगाम इथं पर्यटकांवर झालेला हल्ला हा भारताच्या आत्म्यावर झालेला हल्ला
असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली, ते म्हणाले...
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर
सर्व पाकिस्तानी नागरिकांचा विसा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आला आहे. सामान्य पाकिस्तानी
नागरिकांचा व्हिसा २७ एप्रिलपर्यंत तर वैद्यकीय कारणांसाठी दिलेला व्हिसा २९ एप्रिलपर्यंतच
वैध असेल. या मुदतीपूर्वीच भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ परत जाण्याचे
निर्देश देण्यात आले आहेत. याचप्रमाणे भारतीयांना पाकिस्तान दौऱ्यावर न जाण्याची तसंच
पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांनाही तत्काळ परत येण्याची सूचना देण्यात आली आहे.
पाकिस्तानी
अभिनेता फवाद खान याच्या अबीर गुलाल या चित्रपटच्या भारतातल्या प्रदर्शनावरही बंदी
घालण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या नऊ तारखेला प्रदर्शित होणार होता.
****
पहलगाम
हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून
गेल्या दोन दिवसात आतापर्यंत सुमारे ५०० पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने
इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली होती, त्यातून १८४
पर्यटक मुंबईत दाखल झाले. आणखी २३२ प्रवाशांसाठी आज एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य
सरकारने केली आहे.
****
दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या
पार्श्वभूमीवर आज मुंबईत नियोजित ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, राज कपूर तसंच व्ही.शांताराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार सोहळा तसंच
‘राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा’ पुढे ढकलण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याची
नवीन तारीख यथावकाश जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक
कार्यमंत्री आशिष शेलार यांनी समाज माध्यमावरून दिली आहे.
****
मास्टर
दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा लता मंगेशकर पुरस्कार काल ज्येष्ठ उद्योजक कुमार मंगलम
बिर्ला यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान
करण्यात आला. मुंबईत झालेल्या या सोहळ्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं अभनेत्री
श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णी, अभिनेते सुनील शेट्टी,
सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, रीवा राठोड, आरंभ ग्रुप यांना सन्मानित करण्यात आलं.
मंगेशकर कुटुंबियांसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
मुख्यमंत्री
सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या आतापर्यंतच्या अंमलबजावणीबद्दल, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा खात्याचे अधिकारी, आणि सर्व संबंधित
कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. मुंबईत उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते काल बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते यावेळी योजनेच्या अधिक गतिमान अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या सिंगल विंडो पोर्टलचे
उद्घाटन करण्यात आलं.
****
शून्य गोवर
- रुबेला मोहिमेला काल नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत
सुरुवात झाली. यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान देशातले ३२२ जिल्हे गोवरमुक्त तर
४८७ जिल्हे रुबेलामुक्त करण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक आरोग्य संघटनेकडून
राबवल्या जाणाऱ्या जागतिक लसीकरण सप्ताहालाही कालपासून सुरुवात झाली. हा सप्ताह ३०
एप्रिलपर्यंत राबवला जाईल. ‘लसीकरण सर्वांसाठी मानवीदृष्ट्या शक्य आहे,’ अशी यंदाच्या
सप्ताहाची संकल्पना आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेच्या कार्यालयात पंचायत राज दिन काल साजरा करण्यात आला.
पंचायतराज व्यवस्थेमध्ये महिला वर्गांनी पुढे येऊन गावाची धुरा सांभाळावी असं आवाहन
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी यावेळी केलं. छत्रपती
संभाजीनगर तालुक्यातल्या करोडी, दुधड, कुंभेफळ,
वळदगाव, पैठण तालुक्यातल्या शिवराई, वाहेगाव, नारायणपूर, कन्नड तालुक्यातल्या
बहिरगाव, नारदपूर तर सोयगाव तालुक्यातल्या जरंडी या ग्रामपंचायतींच्या
सरपंचांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
****
नांदेड
इथं जिल्ह्यातल्या विविध विकास योजना तसंच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय आणि
सनियंत्रण समिती- दिशाची बैठक काल पार पडली. विविध योजना तसंच उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी
काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश खासदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात
कासराळी इथं मिरची आणि सोयाबीन क्लस्टर, तर अर्धापूर शिवारात केळी क्लस्टर उभारण्याची
मागणी या बैठकीत करण्यात आली.
****
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर केंद्रातील कार्यक्रम विभागाचे सहायक संचालक नारायण पवार यांनी नुकतीच
स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. कार्यालयाच्या वतीनं त्यांना काल सन्मानपूर्वक निरोप देण्यात
आला. १९८९ पासून छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव,
मुंबई आकाशवाणी केंद्रांवर त्यांनी कार्यक्रम अधिकारी आणि कार्यक्रम
प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली.
****
धाराशिव
जिल्ह्यातल्या विविध तालुक्यांमध्ये “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार”
आणि नाला खोलीकरण तसंच रुंदीकरण योजनेबाबत जनजागृती आणि अंमलबजावणी कार्यशाळा घेण्यात
आल्या. भारतीय जैन संघटना आणि राज्यशासन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या
या कार्यशाळांमध्ये संबंधित ग्रामसेवक तसंच सरपंचांना योजनेची सविस्तर माहिती देण्यात
आली.
****
धाराशिव
जिल्ह्यातल्या तेर इथं संतश्रेष्ठ श्री गोरोबा कुंभार यांच्या ७०९ व्या संजीवन समाधी
उत्सवानिमित्त राज्यभरातून अनेक दिंड्या दाखल झाल्या आहेत. काल पहाटे जिल्हा परिषदेच्या
माजी अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री गोरोबाकाका कुंभार यांच्या
समाधीला अभिषेक करण्यात आला. यानिमित्ताने पुढील तीन - चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम
होणार आहेत.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काल हिंदुत्ववादी संघटनांतर्फे
आंदोलन करुन,विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. एम आय
एम पक्षाच्या वतीनंही माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात
आलं. यावेळी पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकीस्तानचा झेंडा जाळून निषेध करण्यात
आला.
बीड जिल्ह्यात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज होणारा भीमसंगीताचा
कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
लातूर शहरात
मुस्लीम समाजाने मेणबत्त्या पेटवून या हल्ल्यात मृत्यूमुखी पावलेल्यांना श्रद्धांजली
अर्पण केली आणि या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
धाराशिव
इथंही सकल हिंदू समाजाच्या वतीनं मेणबत्ती मोर्चा काढत दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक
पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
परभणी इथं
दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत हिंदू, मुस्लिम सामाजिक संघटनांकडून काल बंद
पाळण्यात आला, या हल्ल्यासंदर्भात हिंदू मुस्लिम संघटनांकडून
विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं.
जालना शहरातल्या
सामाजिक संस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात या हल्ल्यातल्या मृतांना श्रध्दांजली
अर्पण करुन 'सायलेंट प्रोटेस्ट मार्च' काढण्यात आला.
या हल्ल्याच्या
निषेधार्थ आज सर्वपक्षीय नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
****
हवामान
राज्यात
काल सर्वाधिक ४५ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान ब्रह्मपुरी इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात
छत्रपती संभाजीनगर इथं सुमारे ४२ पूर्णांक दोन, धाराशिव ४२ पूर्णांक आठ, बीड इथं ४३ पूर्णांक चार तर परभणी इथं ४४ पूर्णांक एक अंश सेल्सियस तापमानाची
नोंद झाली. दरम्यान, मराठवाड्यात आज उष्णतेची लाट राहिल,
अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
****
No comments:
Post a Comment