Saturday, 24 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

पाकिस्तानकडून दहशवाद्यांना मिळणारे पाठबळ, सीमापार दहशतवादी कारवाया आणि ऑपरेशन सिंदूरसंदर्भात पाकिस्तानकडून होणाऱ्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व पक्षीय भारतीय शिष्टमंडळ आज विविध देशांत पोहचलं. यानंतर दुसरं शिष्टमंडळ आज सायंकाळी रवाना होणार असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं नीति आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय परिषदेची बैठक सुरू आहे. 'विकसित भारतासाठी विकसित राज्ये २०४७' अशी या वर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे. या बैठकीत देशासमोर येणाऱ्या आव्हानांवर विचार-विमर्श करण्यात येत आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात राज्यांची भूमिका आणि विकसित राज्य म्हणून नावारुपाला येण्यात सर्वसमावेशक -दिर्घकालीन उपाययोजना यासह, उद्यमशीलतेला चालना, कौशल्य वाढ, देशांतर्गत रोजगार निर्मिती यासाठीच्या व्यासपीठाची उपलब्धता याअनुषंगानं बैठकीत चर्चा होणार आहे.

या बैठकीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष, सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित आहेत.

****

भारत गेल्या अनेक दशकांपासून सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत असल्याचं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी म्हटलं आहे. सशस्त्र संघर्षांमध्ये नागरिकांच्या संरक्षणावरील खुल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या कुख्यात दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानातील वरिष्ठ सरकारी, पोलिस आणि लष्करी अधिकारी उपस्थित असल्याचं जगानंही पाहिलं असल्याचं पी. हरिश यांनी म्हटलं. नागरिक आणि दहशतवादी यांच्यात पाकिस्तान फरक करत नाही, हे याचे द्योतक आहे, त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षाविषयक चर्चेत पाकिस्तानचा सहभाग हा चिंतेचा विषय असल्याचं भारतानं म्हटलं आहे. तसंच याबाबत भारतानं निषेध व्यक्त करत काही प्रश्नही उपस्थित केले. दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्ताननं वारंवार नागरिकांचा ढाल म्हणून वापर केला असून पाकिस्तानी सैन्यानं या महिन्याच्या सुरुवातीला जाणूनबुजून भारतीय सीमावर्ती गावांना लक्ष्य केलं होतं, असंही पी. हरिश यांनी म्हटलं आहे.

****

युवकांनी दुरदृष्टी, वेळेचे नियोजन आणि नितीमुल्यांचा अंगिकार करण्याचं आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज आयोजित युवकांशी संबंधित एका कार्यक्रमाच्या उद्घघाटनाप्रसंगी ते बोलत होते. तरुणांनी समाजासमोरच्या आजच्या प्रश्नांना समजून घेत त्याची उकल करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि समाजकार्यात योगदान द्यायला हवं असंही ते म्हणाले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी अकरा वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रमाचा १२२ वा भाग असणार आहे. आकाशवाणीसह दुरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.

****

भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सैनिकांच्या सन्मानार्थ सोलापूर इथं आज सकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी ऑपरेशन सिंदूरध्ये कर्तव्य बजावलेल्या सैनिकांच्या शौर्याची आठवण करुन दिली. या यात्रेत नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत, आज पंजाब किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्स बरोबर जयपूर इथं होणार आहे. हा सामना आज सायंकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल. दोन्हीही संघ प्ले-ऑफच्या लढतीसाठी याआधीच अपात्र ठरले आहेत, हा सामना आज केवळ औपचारिक असणार आहे. दरम्यान, लखनऊ इथं काल रात्री झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ४२ धावांनी विजय मिळवला.

****

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या आगामी इग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठीचा संघ आज जाहीर होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ- बीसीसीआयची निवड समिती मुंबई इथं संघ जाहीर करणार आहे. शुभमन गिल याचं नाव या संघाच्या कर्णधारपदासाठी आघाडीवर आहे. या दौऱ्यासाठी नव्या वेगवान गोलंदाजांची निवडही होऊ शकते असं वृत्त आहे.

****

२००९ नंतर यंदा प्रथमच नैऋत्य मान्सून भारतात दाखल होत आहे. नैऋत्य मान्सून पुढील २४ तासांत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत केरळ, आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच दक्षिण कोकण, कर्नाटकच्या किनारी भाग, मध्य महाराष्ट्र, गोवा इथं मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

****

उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने हुजूर साहिब नांदेड  - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हुजूर साहिब नांदेड या विशेष गाडीच्या दोन फेऱ्यांचे नियोजन केले आहे. गाडी क्रमांक ०७०५९  हुजूर साहिब नांदेड  - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी आज रात्री अकरा वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि हि गाडी, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं रविवारी दुपारी  अडीच वाजता पोहोचेल.

तर परतीच्या प्रवासात याच मार्गाने गाडी क्रमांक ०७०६० छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -  हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी उद्या दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरून सुटेल.

****

No comments:

Post a Comment